अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

एसीटीआरईसी येथील टाटा मेमोरियल सेंटरची प्रोटॉन थेरपी सुविधा देशातील तसेच शेजारी देशांमधील पात्र रूग्णांना अत्याधुनिक उपचार सुलभरीत्या करून देत आहे उपलब्ध


टीएमसीच्या एसीटीआरईसी येथे प्रोटॉन बीम थेरपी उपचार सुरु झाल्यापासून एका वर्षात अनेक रूग्णांना मिळाले मोफत उपचार

Posted On: 26 SEP 2024 7:52PM by PIB Mumbai

मुंबई, 26 सप्‍टेंबर 2024

 

नवी मुंबईमधील  खारघर  येथील ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (एसीटीआरईसी) येथे टाटा मेमोरियल सेंटरच्या नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 मे 2023 रोजी लोकार्पण करण्यात आले होते. ही अत्याधुनिक सुविधा असून 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रारंभ झाल्यानंतर गेल्या वर्षभरात  इंटेन्सिटी मॉड्युलेटेड प्रोटॉन थेरपी (आयएमपीटी) वितरीत करण्यास सक्षम अत्याधुनिक  पेन्सिल बीम स्कॅनिंग (पीबीएस) तंत्रज्ञानाने युक्त  360 डिग्री रोटेशन गॅन्ट्री असलेले तीन रुग्ण उपचार कक्ष इथे आहेत. एसीटीआरईसी येथील टीएमसी  प्रोटॉन थेरपी सुविधेत एका वर्षात  119 रूग्णांनी उपचार घेतले आहेत.

बासष्ट टक्के रुग्ण हे सर्वसाधारण श्रेणीतील तर  अडतीस टक्के रुग्ण  खासगी होते. अठ्ठावीस रुग्णांवर (एकूण 24%) पूर्णपणे मोफत उपचार  किंवा रुग्णालयाने "रुग्ण कल्याण निधी" किंवा "कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी" च्या माध्यमातून उभारलेल्या निधीतून उपचार करण्यात आले. बालरोग वयोगटात 22 रुग्ण (18%) होते. ॲनेस्थेसियाची आवश्यकता असलेल्या अगदी लहान मुलांसाठी लवकरच उपचार सुरू होतील. प्रोटॉन थेरपीचा जास्तीत जास्त लाभ  सुनिश्चित करण्यासाठी आणि कमीत कमी दुष्परिणामांसह त्यांचे उपचार पूर्ण करण्यासाठी आत्तापर्यंत केंद्रात उपचार घेतलेल्या सर्व रूग्णांची तज्ञ उपचार गटांद्वारे  कसून तपासणी करण्यात आली आहे.

जागतिक आकडेवारीतून असे दिसून येते  की रेडिएशन थेरपी प्राप्त करणाऱ्या अंदाजे 15-20% रूग्णांना  प्रोटॉन बीम वापरून उपचारांचा संभाव्य फायदा होऊ शकतो. भारतात दरवर्षी सुमारे  60,000 मुलांना कर्करोगाचे निदान होते.  त्यापैकी अंदाजे 4000 मुलांना  प्रोटॉन बीमचा फायदा होईल. त्याचप्रमाणे प्रौढ वयोगटातील बहुसंख्य  रुग्णांना देखील प्रोटॉन बीम थेरपीचा फायदा होईल. टीएमसी , मुंबई येथील सुविधेचा लाभ सशुल्क आणि निःशुल्क अशा दोन्ही श्रेणीतील  (टीएमसी  मध्ये 40:60) रुग्णांना होईल. सध्या अमेरिकेत प्रोटॉन बीम थेरपी उपचाराच्या एका कोर्सचा खर्च अंदाजे दीड लाख - अडीच लाख अमेरिकी डॉलर्स (1-1.5 कोटी रुपये) आहे. टीएमसी मधील थेरपी सुविधेच्या उपलब्धतेमुळे हे अत्याधुनिक उपचार देशातील मोठ्या संख्येने पात्र रूग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत आणि शेजारील देशांतील रूग्णांची गरज देखील पूर्ण करत आहेत.

एसीटीआरईसी मधील सर्व उपचार कक्ष रोबोटिक ट्रीटमेंट काऊचेसनी सुसज्ज आहेत जे अधिक अचूकतेसह उपचार पुरवण्यात जास्तीत जास्त लवचिकता आणतात. उपचार कक्षांमध्ये अगदी लहान मुलांसाठी उपचारादरम्यान भूल देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या सध्याच्या प्रयत्नांना अनुरूप टीएमसी येथे स्थापित उपकरणांपैकी 20% उपकरणे भारतात तयार केली गेली आहेत.

सेवा, संशोधन आणि शिक्षणासाठी हे प्रगत उपचार तंत्रज्ञान पुरवणारे टाटा मेमोरियल सेंटर हे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील पहिले सर्वसमावेशक कर्करोग उपचार  केंद्र आहे.

टीएमसीमध्ये दरवर्षी सुमारे 75 हजार कर्करोगाच्या नवीन रुग्णांची नोंदणी होते.

जागतिक स्तरावर कर्करोगाच्या उपचारांसाठी पार्टिकल थेरपीचा वापर वाढत असून, कर्करोगाच्या उपचारांच्या परिणामांवर या तंत्रज्ञानाच्या प्रभावाचा गांभीर्याने आढावा घेण्यासाठी सखोल संशोधन करण्याची नितांत गरज आहे. टीएमसी मधील प्रोटॉन थेरपी सुविधेमध्ये मोठ्या संख्येने रुग्णांवर उपचार केले जातील अशी  आम्हाला अपेक्षा आहे, आम्ही प्रौढ आणि मुलांमध्ये विविध लक्षणांसाठी पार्टिकल थेरपीचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी मजबूत, उच्च दर्जाचे वैज्ञानिक पुरावे तयार करण्यासाठी यासंदर्भात  संशोधन करण्याचे ठरवले आहे. या दिशेने टीएमसी इन -हाऊस संशोधन प्रकल्प सुरू करेल आणि जागतिक संशोधकांसोबत देखील सहयोग करेल.

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा:

प्रा.सिद्धार्थ लस्कर

उप संचालक , शैक्षणिक आणि प्रोटॉन थेरपी टीएमसी

दूरध्वनी : 022 24177167 (कार्यालय )

मोबाईल : +91 9920460890

Email: laskarss@tmc.gov.in

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059157) Visitor Counter : 66


Read this release in: English