संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

डीआरडीओ आणि आयआयटी दिल्लीने अभेद नामक हलक्या वजनाची बुलेट प्रुफ जॅकेट्स विकसित केली

Posted On: 25 SEP 2024 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 सप्‍टेंबर 2024

 

डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील वैज्ञानिकांनी आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथील संशोधकांच्या सहकार्याने अभेद (ऍडवान्सड बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट) नामक हलक्या वजनाची बुलेट प्रुफ जॅकेट्स विकसित केली आहेत. आयआयटी दिल्ली या संस्थेतील डीआरडीओ उद्योगविषयक शैक्षणिक उत्कृष्टता केंद्रात (डीआयए-सीओई) ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत.

पॉलीमर्स आणि स्वदेशी बोरॉन कार्बाईड सिरॅमिक मटेरियल्स पासून ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या रचनेची जुळवणी जास्तीचा ताण सहन करू शकणाऱ्या विविध साहित्यांमध्ये असलेल्या विशिष्ट गुणांवर आधारित असून त्यानंतर डीआरडीओच्या सहयोगासह त्याचे सुयोग्य नमुने आणि प्रतिकृती तयार करण्यात आले.

  

जॅकेट्ससाठी वापरण्यात आलेल्या आर्मर प्लेट्सनी नियमावलीनुसार संशोधन आणि विकासविषयक सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. ही जॅकेट्स उच्च पातळीच्या धोक्याला तोंड देऊ शकतात आणि ती भारतीय लष्करातील सामान्य कर्मचारीवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणात्मक पात्रता निकषांतील कमाल वजन मर्यादेपेक्षा हलकी आहेत. वेगवेगळ्या बीआयएस स्तरांवर 8.2 किलो आणि 9.5 किलो किमान वजन असलेली ही अत्याधुनिक रचनेची जॅकेट्स पुढच्या आणि मागच्या बाजूसह 360 अंशातील संरक्षण देऊ करतात.  

निवड-निकष पद्धतीच्या आधारे तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच मार्गदर्शनासाठी  काही भारतीय उद्योगांची निवड करण्यात आली. तीन उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी केंद्र सज्ज आहे.

या यशस्वी कामगिरीबद्दल डीआयए-सीओईचे अभिनंदन करत, केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभाग सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत म्हणाले की या हलक्या वजनाच्या बुलेट प्रुफ जॅकेट्सच्या निर्मितीने डीआरडीओतर्फे यशस्वी संरक्षण संशोधन आणि विकासविषयक परिणामकारक परिसंस्थेचे उदाहरण घालून दिले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांना सहभागी करून घेण्यासाठी वर्ष 2022 मध्ये आयआयटी दिल्ली या संस्थेत असलेल्या डीआरडीओच्या संयुक्त प्रगत तंत्रज्ञान केंद्रात बदल घडवून आणून डीआयए-सीओईची उभारणी करण्यात आली होती. हे केंद्र आता डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्पांवर सक्रियतेने कार्य करत आहे.

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058754) Visitor Counter : 37


Read this release in: English , Tamil , Hindi