युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताचा विचार देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढेल - अनुराग सिंह ठाकूर
'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत अनुराग ठाकूर यांनी साधला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2024 6:25PM by PIB Mumbai
पुणे, 25 सप्टेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत बनवण्याचा विचार दिला आहे. हा विचारच आपल्या देशाला गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर काढेल, असे मत लोकसभा सदस्य अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी महाविद्यालयात 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून अनुराग सिंह ठाकूर बोलत होते. 'विकसित भारत ॲम्बेसेडर - युवा कनेक्ट' उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासंदर्भात तरुणांचा सहभाग आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
240D.jpeg)
याप्रसंगी, माईर्स एमआयटी संस्थेचे विश्वस्त राहुल कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, नॅशनल चॅम्पियन स्केटिंग खेळाडू जिनेश नानल, विकसित भारत युथ अॅम्बेसेडर कृतिका भंडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते संस्थेतील संत ज्ञानेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. आर. एम चिटणीस यांनी केले. त्यानंतर कृतिका भंडारी यांनी केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत पोर्टलविषयी सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली व येथे नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच स्केटिंग खेळाडू जिनेश नानल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या क्रीडा प्रवासाविषयी चर्चा केली.

आपल्या भाषणादरम्यान अनुराग ठाकूर यांनी 'विकसित भारत'संदर्भात पॉवरपॉईंट सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की 2014 पूर्वी भारत देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेने ग्रासले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर देशात चैतन्य संचारले आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत यांसारख्या योजनांनी भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत भारताला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवली असून 2027 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास अनुराग सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, भारत अंतराळ क्षेत्र, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण क्षेत्र यांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. केंद्र सरकारने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सुरु असलेली ‘लखपती दीदी’ योजना आणली असून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू आहेत. सध्या सर्वात अधिक शेती उत्पादने तयार करणारा देश भारत असून देशातील शेतकऱ्यांना 'आत्मनिर्भर’ करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहेत.
K3H2.jpeg)
सध्याचा काळात डिजिटल आर्थिक व्यवहारामध्ये भारताचा वाटा जगात सर्वाधिक आहे. जनधन योजनेमुळे सर्व भारतीयांची बँक खाती सुरु झाली आणि त्यांना सरकारकडून मिळणारा पैसा थेट मिळाला. खोटी रेशन खाती, एलपीजी सवलत नागरिकांनी परत केल्याने सरकारचा मोठा निधी वाचला. डिजीटल आर्थिक व्यवहारातून डिजीटल इंडिया योजना यशस्वी झाली, अशा अनेक योजनांचे यश अनुराग ठाकूर यांनी तरुणांसमोर मांडले.

आपल्या सादरीकरणानंतर अनुराग ठाकूर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. स्पर्धा परीक्षा तसेच कामाच्या ठिकाणी येणारा ताण आणि घडणाऱ्या दुर्घटना, युवकांमधील नशेचे वाढते प्रमाण, ग्रामीण भारताची भूमिका, ग्रामीण मंत्रालयाची आवश्यकता/महत्त्व, विकसित भारतातील भारतीय संस्कृतीची पाया म्हणून भूमिका, संरक्षण क्षेत्रातील साधन निर्मितीमधील गैरसरकारी संस्थांचा सहभाग, जागतिक पातळीवर चमकण्यासाठी तरुणांमध्ये आवश्यक गुण, भारतीय क्रीडा क्षेत्र, बेरोजगारी अशा सर्व विषयांवर अनुराग ठाकूर यांनी संवाद साधला व मार्गदर्शन केले.
* * *
PIB Pune | H.Akude/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2058733)
आगंतुक पटल : 105