नौवहन मंत्रालय
जागतिक सागरी दिवस 2024, "नेव्हिगेटिंग द फ्युचर: सेफ्टी फर्स्ट" या वर्षीची संकल्पना
Posted On:
25 SEP 2024 6:14PM by PIB Mumbai
मुंबई, 25 सप्टेंबर 2024
जागतिक सागरी दिन 2024, सागरी उद्योगातील भागीदार, सरकारी अधिकारी, खलाशी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत 24 सप्टेंबर 2024 रोजी साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने यंदाच्या जागतिक सागरी दिनाच्या कार्यक्रमासाठी, ‘नेव्हिगेटिंग द फ्युचर: सेफ्टी फर्स्ट’, अर्थात ‘भविष्याच्या दिशेने वाटचाल: सुरक्षा सर्वप्रथम’, या संकल्पनेची निवड केली आहे.
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, सागरी सुरक्षेचे नियमन करणाऱ्या सोलास या 1974 मधील अधिवेशनातील कराराला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, सागरी क्षेत्रातील चालू घडामोडी नवीन क्रांतिकारी तंत्रज्ञानाची ओळख करून देत आहेत, ज्यामुळे सुरक्षितता, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढेल, कार्यप्रदर्शन सुधारेल, पर्यावरणीय प्रभाव कमी होईल आणि जगभरात शाश्वतता सुनिश्चित होईल. भारत हे नवीन तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाला सामावून घेण्यासाठी, सागरी आणि बंदर परिचालन बळकट करण्यासाठी आणि शाश्वत भविष्याच्या दिशेने या क्षेत्राला घेऊन जाण्यासाठी आपली कायदेशीर चौकट सक्रियपणे अनुकूल करत आहे असे त्यांनी नमूद केले.
उपस्थितांना संबोधित करताना जहाजबांधणी उद्योगाचे महासंचालक आणि एनएमडीसी च्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन यांनी जागतिक सागरी दिनाचे महत्व अधोरेखित केले, आणि जटिल जागतिक परिप्रेक्षात सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या गरजेवर भर दिला.
भारताने जागतिक नेता म्हणून उदयाला यावे, यासाठी सागरी कायदे अद्ययावत करणे, मेरिटाइम इंडिया व्हिजन 2030 आणि मेरीटाइम अमृत काल व्हिजन 2047 यासारखे पथदर्शी आराखडे तयार करणे, आणि डीजी शिपिंगचे नियामकाच्या भूमिकेतून, सागरी प्रशासक म्हणून सुविधा प्रदाताच्या भूमिकेत परिवर्तन करणे, यासारख्या सरकारच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी माहिती दिली.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि एनएमडीसी (मध्य) समितीचे उपाध्यक्ष कॅप्टन बी.के. त्यागी यांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यांनी जागतिक सागरी दिनाची पार्श्वभूमी आणि महत्त्व विषद केले. बदलत्या जागतिक संदर्भात जागतिक सागरी दिनाचे महत्त्व आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांबरोबरचे त्याचे नाते, यावर त्यांनी भर दिला.
* * *
PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058713)
Visitor Counter : 91