नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाढवण येथील डाय-मेकर्स संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यावर जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची (जेएनपीए) सहमती


जेएनपीए डाय-मेकर्सना अनुदानित कर्ज, विमा, डाय-मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचा लाभ देणार

Posted On: 25 SEP 2024 3:32PM by PIB Mumbai

मुंबई, 25 सप्‍टेंबर 2024

 

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए)  आज जेएनपीए चे अध्यक्ष आणि व्हीपीपीएल चे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत डाय-मेकर्स संघटनेने मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण करायला सहमती देऊन स्थानिक उद्योगाला पाठिंबा देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे.

याविषयी बोलताना उन्मेष शरद वाघ म्हणाले, “जेएनपीए आणि व्हीपीपीएलमध्ये आमचा सर्वसमावेशक विकासावर विश्वास आहे. वाढवण बंदराच्या विकासाबरोबरच सर्व स्थानिक समुदायांचे व्यवसायही विकसित व्हावेत, असा आमचा दृष्टीकोन आहे. त्यांना आवश्यक त्या  पायाभूत सुविधा, साधन संपत्ती आणि संधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, ज्यामुळे या व्यवसायांना जागतिक स्तरावर स्पर्धा करता येईल, त्यांचा निरंतर विकास आणि समृद्धी सुनिश्चित करणे, हा समुदायाच्या विकासाप्रति असलेल्या आमच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा एक भाग आहे.”

ते पुढे म्हणाले, “जेएनपीएने यापूर्वी मच्छीमार समुदायाशी अशाच स्वरूपाच्या चर्चा केल्या आहेत, आणि इतर कोणत्याही भागधारकांबरोबर बैठका आयोजित करण्यासाठी, त्यांच्या समस्या आणि विकासाच्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी तयार आहे.”

या कराराचा एक भाग म्हणून, जेएनपीए डाय-मेकर्सना त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आखल्या गेलेल्या अनुदानित कर्ज आणि विमा  योजनेचा लाभ मिळवून देईल, तसेच त्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी आणि व्यवसायातील स्थैर्य कायम ठेवण्यासाठी सहाय्य करेल. जेएनपीए तरुणांमधील कौशल्य विकासाकरता डायमेकिंगवर प्रशिक्षण कार्यक्रमही आयोजित करणार आहे. याव्यतिरिक्त, AutoCAD आणि ArtCAM सॉफ्टवेअर सारख्या आधुनिक, उच्च-तंत्रज्ञानाच्या साधनांनी सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम, डाय-मेकर्सना त्यांचे कला कौशल्य आणि परिचालन वाढवण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज आहे.

डाय-मेकर्सना वाढवण बंदराचे प्रतिनिधित्व असलेल्या सर्व प्रदर्शनांमध्ये राखीव  जागा देखील प्राप्त होतील, ज्यामुळे त्यांची जगात दखल घेतली जाईल, आणि त्यांची बाजारपेठ विस्तारण्यासाठी  संधी उपलब्ध होईल.

त्याशिवाय, जेएनपीए प्रमुख  दागिने संघटना आणि परिषदा यांच्याशी समन्वय साधण्यात महत्वाची भूमिका बजावेल, ज्यामुळे उद्योगांमध्ये समन्वय साधला जाईल आणि विकासाचे नवे मार्ग खुले होतील. जेएनपीए संपूर्णपणे सुसज्ज रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून देईल.  

डाय-मेकर्स संघटनेच्या प्रतिनिधींनी, वाढवण बंदराची स्थानिक व्यवसायांच्या विकासाला चालना देण्यामधील महत्वाची भूमिका ओळखून, त्याला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058594) Visitor Counter : 37


Read this release in: English