आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मॅस्टेक्टॉमीनंतर संपूर्ण स्तन पुनर्रचनेची नवी पद्धत टाटा मेमोरियल सेंटरमधल्या एसीटीआरईसीने आणली


सुलभ, जलद आणि रिकव्हरीचा कालावधी कमी करणाऱ्या या पद्धतीस केवळ 2-3 तास लागत असून रिकव्हरी कालावधी 3-4 आठवड्यांपर्यंत कमी होतो: वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक

Posted On: 24 SEP 2024 10:07PM by PIB Mumbai

मुंबई, 24 सप्‍टेंबर 2024

 

स्तनाच्या कर्करोगावरील उपचारात महत्त्वपूर्ण प्रगती साधत एसीटीआरईसीने (Advanced Centre for Treatment, Research and Education in Cancer- कर्करोगावरील उपचार,संशोधन आणि शिक्षण यासाठीचे प्रगत केंद्र) मॅस्टेक्टॉमीनंतर म्हणजेच स्तन काढल्यानंतर संपूर्ण स्तन पुनर्रचनेची नवी पद्धत सुरू केली आहे. 

वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. अमर देशपांडे यांनी डॉ. दिलीप होयसळ आणि त्यांच्या पथकासह ब्रक्सॉन नावाने ओळखल्या जाणाऱ्या बायोलॉजिकल मेशचा वापर करून एसीटीआरईसी येथे 10 सप्टेंबर 2024 रोजी पहिली संपूर्ण स्तन पुनर्रचना केली. ही अभिनव प्रक्रिया, अशा प्रकारची पश्चिम भारतातली पहिली आहे. सुलभ, जलद आणि रिकव्हरीचा कालावधी कमी करणाऱ्या या पद्धतीस केवळ 2-3 तास लागत असून रिकव्हरी कालावधी जवळपास 3-4 आठवड्यांपर्यंत कमी होतो. 

"ही पद्धत कमी वेदनादायी आहे. परिणाम समान असून खर्चही पारंपरिक पुनर्रचना पद्धतीएवढाच आहे," असे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले. 

पारंपरिक पद्धतीसोबत या नव्या पद्धतीचा फायदा टाटा मेमोरियल सेंटर आणि एसीटीआरईसी इथल्या योग्य रुग्णांना होईल, असे टाटा मेमोरियल सेंटर इथल्या स्तन शस्त्रक्रियेच्या प्राध्यापिका डॉ. शलाका जोशी यांनी सांगितले. वरिष्ठ स्तन शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले, "स्तन पूर्णपणे काढून टाकणे कोणत्याही स्त्रीसाठी निराशाजनक असू शकते. ही नवीन प्रक्रिया प्रतिष्ठा आणि स्त्रीत्व जपेल आणि स्तनाच्या कर्करोगावर उपचार घेणाऱ्यांमध्ये नवी आशा जागवेल."

टाटा मेमोरियल सेंटरची एसीटीआरईसी, ही उपचार आणि संशोधन शाखा वर्षाला सुमारे 5,000 स्तनाच्या कर्करोग रुग्णांवर उपचार करते.  कर्करोग निवारण आणि सौंदर्य जतन या दोन्हीला प्राधान्य देणाऱ्या  या दोन्हीला प्राधान्य देणाऱ्या  आधुनिक शस्त्रक्रिया तंत्रांमध्ये ती आघाडीवर आहे.  युनिटने रुग्णांच्या ऊतींचा वापर करून संपूर्ण स्तनाची पुनर्रचना यापूर्वी केली आहे, मात्र आता पाश्चात्य देशांतील पद्धतींप्रमाणेच सिलिकॉन इम्प्लांटसाठी आवरण म्हणून बायोलॉजिकल मेशचा  वापर युनिटने केला आहे. 

अनेक रुग्ण लम्पेक्टॉमी करू शकतात, तर काहींना पूर्ण स्तन काढून टाकावे लागतात, ज्यामुळे पुनर्रचनेची गरज भासते. पारंपारिक पद्धतींमध्ये रुग्णाच्या शरीराच्या इतर भागांतील ऊतींचा वापर केला जातो, ज्यामुळे वेदना, संसर्ग आणि 6-8 आठवड्यांची प्रदीर्घ रिकव्हरीसारख्या जटिलतांची शक्यता असते. 

स्तनाचा कर्करोग भारतात सर्वाधिक आढळणारा कर्करोग असून दरवर्षी अंदाजे 178,000 नवीन रुग्णांचे निदान होते, ज्यांना अनेकदा शस्त्रक्रियेची गरज भासते.

संपर्क:  वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. अमर देशपांडे, +91 87791 91160; Email: amardd[at]gmail[dot]com  

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kakade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2058414) Visitor Counter : 39


Read this release in: English