माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2024 अधिक संस्मरणीय करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यासाठी माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घेतली भेट


यंदाच्या इफ्फी महोत्सवात मनोरंजन आर्केड, भारतीय चित्रपटाचा गौरव करणाऱ्या विशिष्ट संकल्पनेवरील परेडचे आयोजन

ईएसजी येथे इफ्फीच्या सुकाणू समितीची बैठक संपन्न

Posted On: 24 SEP 2024 8:56PM by PIB Mumbai

गोवा, 24 सप्‍टेंबर 2024

 

माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आज, 24 सप्टेंबर 2024 रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली, आणि यंदाचा इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिक लोककेंद्रित, समावेशक आणि दिमाखदार बनवण्यासाठीच्या धोरणांवर चर्चा केली. महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, इफ्फी (IFFI) च्या सुकाणू समितीचे सदस्य आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

55 वा इफ्फी महोत्सव सिने जगताचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य चित्रपट प्रेमींसाठी संस्मरणीय ठरावा यासाठी आणि भारतीय सिनेमा आणि सिने प्रतिभेचा उत्सव साजरा करण्यासाठी चैतन्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठीचे उपाय आणि उपक्रमांवर यावेळी चर्चा झाली. महोत्सवादरम्यान भारतीय चित्रपटाचा गौरव करण्यासाठी विशिष्ट संकल्पनेवरील परेडचे आयोजन, या प्रमुख मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली. या दिमाखदार परेड उत्सवाची शोभा वाढवतील आणि स्थानिक समुदायाला सामावून घेतील.

परेड व्यतिरिक्त, इफ्फी (IFFI) 2024 मध्ये एक मनोरंजन आर्केड असेल, ज्यामध्ये लोकांच्या सहभागाने भारतीय सिनेमा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा केला जाईल. या संवादात्मक कार्यक्रमात उपस्थितांना चित्रपट उद्योग आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा परिचय होईल.

या महोत्सवात तरुणांना आणि सिनेसृष्टीतील उदयोन्मुख प्रतिभेला आपले काम प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाईल.

भारतीय चित्रपटाच्या संपन्न परिदृश्याचे दर्शन घडवणारा, चित्रपटनिर्माते, अभिनेते आणि जगभरातील चित्रपटप्रेमींना एकत्र येण्यासाठी  व्यासपीठ उपलब्ध करून देणारा इफ्फी 2024 अविस्मरणीय व्हावा यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि गोवा सरकार वचनबद्ध आहेत.

सुकाणू समितीचे सदस्य बॉबी बेदी आणि रवी कोट्टरक्कर, माहिती प्रसारण मंत्रालयाचे प्रसारण संयुक्त सचिव आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट संयुक्त सचिव वृंदा देसाई, दिग्दर्शिका अनुरिमा शर्मा, ओएसडी फिल्म्सचे श्रीरंग मुकुंदन, ईएसजीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा आदी मुख्यमंत्र्यांसह बैठकीत सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, संजय जाजू यांनी महोत्सवाच्या स्थळांना भेटी दिल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना महोत्सवाच्या तयारीची कामे नियोजित  वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या.

महोत्सवाच्या तयारीबाबत चर्चेसाठी सुकाणू समितीची बैठक एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा, पणजी इथे झाली.

भारत सरकारच्या वतीने दरवर्षी 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात इफ्फीचे आयोजन करण्यात येते. सिनेजगताला चित्रपटनिर्माण कलेतील सर्वोत्कृष्ट आविष्कारांचे दर्शन घडवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे या महोत्सवाचे उद्दीष्ट आहे. भारतीय चित्रपटाच्या वाढीला खतपाणी घालणे आणि युवांना या क्षेत्रातील  संधी आणि वाव उपलब्ध करून देण्याचा इफ्फीचा दृष्टीकोन आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Rajshree/Reshma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058406) Visitor Counter : 49


Read this release in: English