गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांचे स्वागत केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात परिवर्तनात्मक सुधारणा घडत आहेत : केंद्रीय मंत्री अमित शाह
शेतकऱ्यांचे कल्याण आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे ही मोदी 3.0 ची सर्वोच्च प्राथमिकता असून केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांसाठी 24,475 कोटी रुपयांच्या 'पोषण आधारित अनुदान योजने'ला मंजुरी दिल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
Posted On:
18 SEP 2024 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांचे स्वागत केले आहे.
'X' या समाज माध्यमावरील पोस्टच्या मालिकेत गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात परिवर्तनात्मक सुधारणा घडत आहेत.
एक देश एक निवडणुकीवरील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीमुळे, भारताची ऐतिहासिक निवडणूक सुधारणांच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. यामधून निकोप आणि आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम निवडणुकांद्वारे आपल्या लोकशाहीला बळ देण्याचा आणि संसाधनांच्या अधिक उत्पादक वाटपाद्वारे आर्थिक विकासाला गती देण्याचा पंतप्रधान मोदी यांचा दृढ निश्चय दिसून येतो.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, शेतकऱ्यांचे कल्याण आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे ही मोदी 3.0 ची सर्वोच्च प्राथमिकता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शेतकऱ्यांसाठी ₹24,475 कोटी खर्चाच्या 'पोषण मूल्यांवर आधारित अनुदान योजने'ला मंजुरी दिली. यामुळे शेतकऱ्यांना फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त खते सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याबरोबरच खतांच्या संतुलित वापरालाही प्रोत्साहन देईल. या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायला सदैव तत्पर असलेल्या पंतप्रधान मोदी यांचे आभार.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलत, शेतकरी-स्नेही मोदी सरकारने आज ₹35000 कोटी खर्चाच्या 'पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियानाला (PM-AASHA)' मंजुरी दिली.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वाजवी दर मिळण्यासोबतच, पीएम आशा (PM-AASHA) ग्राहकांना उपलब्ध असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या भावातील चढउतार नियंत्रित करायला सहाय्य करेल. यामुळे कडधान्ये, तेलबिया आणि कृषी-बागायती उत्पादनातही शेतकऱ्यांची आत्मनिर्भरता वाढेल. आदिवासी समाजाचे सक्षमीकरण हा पंतप्रधान मोदी यांचा संकल्प असून त्या दिशेने वेगाने काम सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 63,000 आदिवासी खेड्यांमध्ये 100% मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ₹79,156 कोटी खर्चाच्या 'प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली. 5 कोटी आदिवासी जनतेला या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या गावातील पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विकास कामांना आणखी गती मिळेल.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) साठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या (एनसीओई) मान्यतेने, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र लक्षणीय झेप घेण्यास सज्ज आहे. या उपक्रमामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करताना भारताची जागतिक बौद्धिक संपदा मजबूत होईल. या दूरदर्शी पाऊलाबद्दल मोदीजींचे आभार.
आज केंद्रीय मंत्रिमंडळात जैवतंत्रज्ञान संशोधन नवोपक्रम आणि उद्योजकता विकास योजनेला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अमित शाह यांनी आभार मानले. ते म्हणाले की, ही योजना आपल्या जैवतंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या भावनेची जोड देत नवीन उर्मी निर्माण करेल.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज केंद्रीय मंत्रिमंडळात चार परिवर्तनात्मक प्रकल्पांना मंजुरी देऊन अंतराळ क्षेत्रातील भारताच्या नवीन महत्त्वाकांक्षेचा शुभारंभ केला. चांद्रयान 4 मोहीम आणि व्हीनस ऑर्बिटर मोहीम चंद्र आणि शुक्राबाबतच्या आपल्या ज्ञानाची कक्षा विस्तृत करेल, तर गगनयान कार्यक्रमाची व्याप्ती वाढवणारे भारतीय अंतराळ स्थानक (बीएएस), अंतराळ क्षेत्रात भारताचे नेतृत्व मजबूत करेल. ते पुढे म्हणाले की, पुन्हा वापरता येण्याजोगे कमी किमतीचे नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (एनजीएलव्ही) भारतीय अंतराळ स्थानक बांधण्याचे आणि 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवण्याची क्षमता विकसित करण्याचे भारताचे स्वप्न साकार करण्यास गती देईल.
S.Patil/R.Agashe/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2056438)
Visitor Counter : 59