शिक्षण मंत्रालय
विद्यार्थ्यांनी कौशल्याच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आपापल्या क्षेत्रात इमानदारीने आणि देश प्रेमाच्या भावनाने कार्यरत असले पाहिजे - नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. सारस्वत यांचे आवाहन
Posted On:
15 SEP 2024 7:43PM by PIB Mumbai
विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- व्हीएनआयटीच्या 22 व्या दीक्षांत समारंभात 1225 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यांत्रिकी विभागाचा विद्यार्थी रोहित चौहान ठरला "सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदकाचा मानकरी
नागपूर 15 सप्टेंबर 2024
भारत हे एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्यासाठी वातावरण बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बहुशाखीय विज्ञान हे सहाय्यक ठरते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्याच्या आणि ज्ञानाच्या जोरावर आपापल्या क्षेत्रात इमानदारीने आणि देशप्रेमाच्या भावनाने कार्यरत असले पाहिजे असे आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी आज नागपूर मध्ये केले. भविष्यात तंत्रज्ञानात निपुण अश्या अभियंत्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
महान दूरदर्शी भारतरत्न, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त15 सप्टेंबर रोजी साजरा केल्या जाणा-या “अभियांत्रिकी दिनाच्या” प्रसंगी नागपूरच्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित 22 व्या भव्य दीक्षांत समारंभात 1225 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्हीएनआयटीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री.माडाभूषी मदन गोपाल आणि संचालक डॉ. प्रेमलाल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियांत्रिकी, आर्किटेक्चर आणि सायन्स या विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या दीक्षांत सोहळ्याचा प्रारंभ सभागृहात एकेडेमिक प्रोसेशनच्या आगमनाने झाला.
नियामक मंडळाचे अध्यक्ष, माडाभूषी मदन गोपाल यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना संशोधन आणि उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेरित केले.संचालक डॉ. प्रेमलाल पटेल यांनी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर केला. ज्यामध्ये व्हीएनआयटीची गेल्या वर्षभरातील कामगिरी, शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन आणि आउटरीच उपक्रमांबद्दलची कटीबद्धता आणि सफलता त्यांनी आपल्या उद्बोधनातून मांडले . व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला तसेच विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये वापरण्याचे आवाहन केले.
या दीक्षांत समारंभात 765 अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी , 73 विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची ,95 संशोधक छात्रांना डॉक्टर ऑफ फिलोसोफी, 239 विद्यार्थ्यांना एम . टेक . , 60 विद्यार्थ्यांना एम एससी पदवी प्रदान करण्यात आली. अश्या विविध क्षेत्रातील एकूण 1225 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी रोहित चौहान, यांना बी. टेक. प्रोग्रामच्या सर्व विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल 2024 चे प्रतिष्ठित "सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदक" देऊन सम्मानित करण्यात आले. तसेच इतरही गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल विविध पदकांनी,पुरस्कारांनी आणि बक्षिसांनी गौरविण्यात आले.
समारंभाच्या समाप्तीपूर्वी, विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करण्याची आणि त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा देशसेवेसाठी आणि व्हीएनआयटीची प्रतिष्ठा आणि मान वाढविण्यासाठी शपथ घेतली.या कार्यक्रमाला सिनेट सदस्य,विद्याशाखेचे अध्यक्ष ,कुलसचिव, प्राध्यापक आणि पदवीधर विद्यार्थी त्यांच्या परिवारजनांसोबत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
SR/DW/PK
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2055252)
Visitor Counter : 45