अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयकर क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान  आत्मसात करणे आवश्यक - नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च - नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. श्रीकृष्ण देव राव यांचे प्रतिपादन


राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, येथे 'उत्तरायण-II' 2024 प्रशिक्षण वर्गाचे  उद्घाटन

Posted On: 11 SEP 2024 7:09PM by PIB Mumbai

 

नागपूर 11 सप्टेंबर 2024

जागतिकीकरणामुळे सर्वच क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून आली असून  आयकर आणि करसंकलन क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान वेळोवेळी शिकत राहणे  क्रमप्राप्त असल्याचे प्रतिपादन हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च - नालसार विधी विद्यापीठाचे कुलगुरु  प्रो.श्रीकृष्ण देव राव यांनी केले . नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी – एनएडीटी   येथे  आयोजित सात आठवडे कालावधीच्या  'उत्तरायण-२' 2024  या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  याप्रसंगी  एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार,अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार तसेच ‘उत्तरायण-II’ या प्रशिक्षणाचे प्रशिक्षण संचालक एस.एम.वी.वी. शर्मा  आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगण हे प्रामुख्याने उपस्थित होते.

आयकर अधिकाऱ्यांनी कायद्याचे ज्ञान आणि कायद्याचे तत्त्व याविषयी आपली कौशल्य अजून संवर्धित करून आपली निर्णय क्षमता अजून वृद्धिंगत करावी असेही प्रो.श्रीकृष्ण देव राव यांनी  सांगितले.प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँन्ड्रीग ऍक्ट अर्थात पीएमएलए हा नवीन फौजदारी कायद्यासारखा काम करत आहे तसेच नवीन साक्ष कायद्यातंर्गत तांत्रिक पुरावा हा अमुलाग्र बदल घडवीत आहे. या दोन कायद्यांचा आणि आयकर क्षेत्रातील विविध नियम आणि कायदे यावर अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

नवपदोन्नत आयकर सहायक आयुक्तांसाठी ‘उत्तरायण-II -2024’ या प्रशिक्षण वर्गात एकूण  116 अधिकाऱ्यांची असून यामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या 20 एवढी आहे.या प्रशिक्षण वर्गात 18 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून अधिकारी सहभागी झालेली  असून यामध्ये बिहार राज्यातील सर्वाधिक अधिकारी त्या पाठोपाठ महाराष्ट्र आणि विविध राज्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशिक्षण वर्गातील सर्वाधिक तरुण अधिकारी हे 45 वर्षाचे असून सर्वात ज्येष्ठ अधिकारी हे 59 वर्षाचे आहे या तुकडीचे  सरासरी सेवा  वय हे 52 असल्याचे राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे संयुक्त संचालक एस.एम.व्ही शर्मा यांनी याप्रसंगी  सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी नवपदोन्नत आयकर सहाय्यक आयुक्तांनी कर प्रशासकाची शपथही घेतली.

आयकर विभागाची राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही भारतीय महसूल सेवेतील (आय.आर.एस) अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी अग्रणी संस्था आहे.या  प्रशिक्षणात प्रत्यक्ष कर वसुली व करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रमुख कार्याच्या प्रशिक्षणाशिवाय अधिकाऱ्यांना पैशाच्या गैरव्यवहारासारख्या आर्थिक गुन्हे व विविध आर्थिक घोटाळे यांचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाते. या प्रशिक्षण वर्गात केंद्र सरकार निर्देशित "मिशन कर्मयोगी" चे उद्दिष्ट साध्य होणार असून या प्रशिक्षण वर्गात "अनुशीलन प्रकल्प"राबविणार आहे ज्या अंतर्गत डिजिटल कंटेंट क्रिएशन साठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

***

SR/DW/DD/PK

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2053849) Visitor Counter : 50


Read this release in: English