वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताने धोरण स्वायत्तता राखून आणि जागतिक भांडवलाचा प्रवाह व्यवस्थापित करून आर्थिक वाढीची खबरदारी घेतली पाहिजे: मुख्य आर्थिक सल्लागार

Posted On: 02 SEP 2024 6:50PM by PIB Mumbai

मुंबई, 2 सप्‍टेंबर 2024

 

भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) आज मुंबईत 'फायनान्सिंग 3.0 समिट' अर्थात वित्तपुरवठ्याशी संबंधित तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. भारताने धोरणात्मक स्वायत्तता राखून आर्थिक वाढ टिकवून ठेवण्यासाठी जागतिक भांडवलाच्या प्रवाहाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्याच्या महत्त्वपूर्ण गरजेवर केंद्र  सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, डॉ. व्ही. अनंथा नागेश्वरन यांनी त्यांच्या भाषणात भर दिला.

“भारताचे आर्थिक क्षेत्र आपल्या देशाच्या शाश्वत दुहेरी-अंकी वाढीला समर्थन देण्यासाठी सज्ज आहे का?” यावरील  उद्घाटन सत्रात बोलताना, डॉ. नागेश्वरन यांनी जागतिक भांडवलाचा ओघ मजबूत असताना, व्यापार जागतिकीकरण मंदावले आहे यावर प्रकाश टाकला. जागतिक आर्थिक अस्थिरतेपासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी स्थान निर्माण करताना भारताने आपल्या आशादायक वाढीच्या संधींचा उपयोग केला पाहिजे यावर त्यांनी भर दिला.

डॉ. नागेश्वरन यांनी वित्तीयकरणाच्या जोखमींबद्दलही सावध केले, जे स्थूल आर्थिक स्थैर्य बिघडवून वाढीव कर्ज आणि असमानता यासारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. भारताच्या विकास धोरणाने या अडचणी टाळल्या पाहिजेत आणि शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण देश 2047 च्या दृष्टीने पावले उचलत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे अध्यक्ष सी.एस. सेट्टी यांनी कॉर्पोरेट बाँड मार्केट विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. या बाजारपेठेत अधिक भांडवल आणण्यासाठी विमा कंपन्या आणि निवृत्तीवेतन निधीसह बिगर बँक वित्तीय संस्था आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पतपुरवठा विस्तारामध्ये बँकांव्यतिरिक्त विविध वित्तीय क्षेत्रातील पुरवठादारांचा समावेश असावा असे त्यांनी नमूद केले.

कर्ज उपलब्धता वाढवून कॉर्पोरेट बाँड मार्केट विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष आणि बजाज फिनसर्व्ह लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज यांनी केले. मजबूत धोरणे राखून नवोन्मेषाला चालना देण्यासाठी नियामकांमधील समन्वय सुधारण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी भांडवली बाजाराच्या वाढीला चालना देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

सीआयआय चे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना, विशेषतः हरित वित्तपुरवठा, डिजिटल परिवर्तन आणि ईएसजी निकषांशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी वित्तीय संस्थांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2051014) Visitor Counter : 41


Read this release in: English