सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था आणि वॅमनिकॉम यांच्यात मत्स्योद्योगातील सहकार व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार

Posted On: 27 AUG 2024 7:19PM by PIB Mumbai

मुंबई, 27 ऑगस्ट 2024

 

मत्स्योद्योग क्षेत्रातील सहकारी व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्था (आयसीएआर-सीआयएफई) आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (वॅमनिकॉम) यांनी सोमवारी 26 ऑगस्ट, 2024 रोजी एक सामंजस्य करार केला आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था स्थापन करण्याचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

भारतातील मत्स्यव्यवसायामुळे 14.46 दशलक्ष लोकांना रोजगार उपलब्ध होतो आणि एकात्मिकता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची पोहोच वाढवणे तसेच मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांमध्ये मूल्यवर्धनास प्रोत्साहन देणे  हे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे. वॅमनिकॉमआणि आयसीएआर-सीआयएफई या दोन्ही संस्था एकत्रितपणे मत्स्य, मत्स्य सहकारी आणि मत्स्यव्यवसाय परिसंस्थेच्या क्षेत्रात शिक्षण, संशोधन, क्षमता उभारणी आणि सल्लागार या दृष्टीकोनातून नवीन संधींची चाचपणी करतील.

मुंबईमध्ये आयसीएआर-सीआयएफईच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला या संस्थेचे संचालक आणि कुलगुरू डॉ. रवीशंकर आणि वाम्निकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव उपस्थित होत्या. या दोन्ही संस्थांचे वैज्ञानिक, अध्यापक वर्ग आणि प्रमुख सदस्य देखील यावेळी उपस्थित होते.

आयसीएआर-सीआयएफई   आणि वॅमनिकॉम यांच्यात मत्स्य क्षेत्रातल्या   समन्वयात वाढ करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.  ज्यामुळे मत्स्यव्यवसायातील सहकारी व्यवस्थापन पद्धती वृद्धिंगत करण्याचा मार्ग प्रशस्त होईल.  या भागीदारीच्या माध्यमातून या संस्था संशोधन, प्रशिक्षण आणि विकास उपक्रमांविषयी सहकार्य करतील. ज्याचा मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर लक्षणीय परिणाम होऊन सहकार व्यवस्थापन धोरणे आणि पद्धतींमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

हा करार दोन्ही संस्थांच्या सामाईक उद्दिष्टांना चालना देण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावेल, असे नमूद करत डॉ. रवीशंकर सीएन यांनी या सहकार्याविषयी उत्साहाची भावना व्यक्त केली. या भागीदारीमुळे केवळ आमच्या संशोधन क्षमताच बळकट होणार नसून, आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रभावाची व्याप्ती देखील वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सहकार्यातून उदयाला येणाऱ्या सहकार व्यवस्थापनाच्या संभाव्य प्रगतीबाबत आपण अतिशय उत्साही आहोत, असे ते म्हणाले.

डॉ. हेमा यादव यांनी या सामंजस्य करारामुळे होणारे फायदे आणि निर्माण होणाऱ्या संधी अधोरेखित करत याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. आयसीएआर-सीआयएफई  सोबत सहभागी होत  आम्ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकार व्यवस्थापन सिद्धांतांचे एकात्मिकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत, असे त्या म्हणाल्या. नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या क्षेत्रातील पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासाठी परस्परांचे कौशल्य आणि संसाधने यांचा वापर करण्यास या सहकार्यामुळे मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

या सामंजस्य  करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे, वाढीव सहकारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय क्षेत्रात शाश्वत उपजीविका विकास तसेच परिचालनात्मक उत्कृष्टता साध्य करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक आघाडीची सुरुवात झाली आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रासमोर असलेल्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच प्रगतीला चालना देण्यासाठी या  दोन्ही संस्था त्यांच्या संयुक्त सामर्थ्यांचा वापर करण्याप्रती वचनबद्ध आहेत.

आयसीएआर-सीआयएफईविषयी माहिती:

आयसीएआर-केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था (सीआयएफई) हे देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी संबंधित प्रमुख विद्यापीठ आहे. प्रतिष्ठित वारसा लाभलेल्या या संस्थेने वर्षानुवर्षे अनेक नामवंत विद्वान तसेच नेते घडवले आहेत. सुमारे 50 वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीनंतर, सीआयएफई ही संस्था मत्स्यपालन आणि इतर संबंधित विद्याशाखांतील उच्च शिक्षणासाठीचे उत्कृष्टता केंद्र म्हणून उदयाला आली आहे.केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत एफएओ/युएनडीपीच्या मदतीने दिनांक 6 जून 1961 रोजी या संस्थेची स्थापना झाली. देशातील एक महत्त्वाचे विद्यापीठ असलेली सीआयएफई ही संस्था शैक्षणिक तसेच संशोधनपर कार्यक्रमांमध्ये अभिनव तसेच सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून या संस्थेचे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहू शकतील. सीआयएफईने निर्माण केलेल्या शिक्षण आणि संशोधनविषयक परिसंस्थेमुळे ही संस्था विद्यार्थ्यांच्या पसंतीची शिक्षणसंस्था बनली आहे.विविध संबंधित विद्याशाखांची विस्तृतता आणि घटक संस्थांशी सहयोगी संबंध यामुळे या संस्थेतील विद्यार्थ्यांना विभागांच्या सीमा ओलांडण्यासाठी आणि विविध शैक्षणिक क्षितिजांना गवसणी घालण्यासाठी अतुलनीय संधी मिळत आहे.

वॅमनिकॉमविषयी थोडक्यात माहिती:

पशुधन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून कृषक तसेच अकृषक क्षेत्रांतील भागधारकांसाठी प्रशिक्षण आयोजित करणे हे केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुणे येथील अर्थात वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेचे मुख्य कार्य आहे. सहकार क्षेत्राच्या प्रशिक्षण विषयक गरजांचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने वर्ष 1964 मध्ये प्राध्यापक दिवंगत डी.आर.गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या उच्च-स्तरीय गटाने यासाठी एक राष्ट्रीय संस्था स्थापन करण्याची शिफारस केली. या संस्थेने सहकारी संस्था/विभाग यांमध्ये कार्यरत वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेणे, मुलभूत/उपयोजित संशोधनकार्य हाती घेणे आणि सल्लागार सेवा पुरवणे, सहकारी व्यावसायिक संस्थामध्ये कार्यरत वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी व्यवसाय व्यवस्थापनविषयक अभ्यासक्रमांचे आयोजन करणे आणि तरुणांना व्यवस्थापनाच्या विविध पैलूंविषयी प्रशिक्षण देणे ही कार्ये करणे अपेक्षित होते.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Shailesh/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2049197) Visitor Counter : 38


Read this release in: English