दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटांचा संग्रह आणि त्यावर संशोधन करण्याची आवड निर्माण करण्यासाठी टपाल विभागाने सुरु केली ‘फीलॅटली’ शिष्यवृत्ती योजना


अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर

Posted On: 24 AUG 2024 2:27PM by PIB Mumbai

गोवा, 24 ऑगस्ट 2024

 

विद्यार्थ्यांमध्ये फीलॅटली (philately), म्हणजेच टपाल तिकिटांचा संग्रह आणि त्यावर संशोधन करण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी पणजी, गोवा येथील टपाल विभागाने ‘फीलॅटली’ शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. दीनदयाल ‘स्पर्श’ (SPARSH) योजनेंतर्गत ही शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली असून, छंद म्हणून टपाल तिकिटे जमा करण्याची आवड, आणि त्यावरील संशोधनाला प्रोत्साहन देणे, हे याचे उद्दिष्ट आहे.  

उत्तम शैक्षणिक रेकॉर्ड (कामगिरी) असलेल्या आणि फीलॅटलीचा छंद जोपासणाऱ्या इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना टपाल विभागाच्या मंडळ कार्यालयांद्वारे आयोजित फीलॅटली प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि फीलॅटली वरील प्रकल्पाच्या आधारावर शिष्यवृत्ती दिली जाईल.

  

पात्रतेचे निकष:

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरायला, उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी (इयत्ता सहावी ते नववी) असणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या शाळेत फीलॅटली क्लब असणे आणि तो किंवा ती क्लबचा सदस्य असणे आवश्यक आहे. शाळेत फीलॅटली क्लबची स्थापना केली गेली नसेल, तर, स्वतःचा फीलॅटली संग्रह असलेल्या विद्यार्थ्याचा देखील विचार केला जाऊ शकतो. उमेदवाराचा शैक्षणिक रेकॉर्ड देखील चांगला असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी निवडीच्या वेळी, उमेदवाराने नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत किमान 60 टक्के गुण किंवा समतुल्य ग्रेड प्राप्त केलेली असावी. एससी/एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यात पाच टक्क्यांची सूट असेल.

 

निवड प्रक्रिया:

निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये असेल. टप्पा 1 मध्ये, प्रादेशिक स्तरावर फीलॅटली वरील लेखी प्रश्नमंजुषा आयोजित केली जाईल, आणि टप्पा 2 मध्ये, प्रादेशिक स्तरावरील लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी फीलॅटली वरील प्रकल्प सादर करावा लागेल.

 

अभ्यासक्रम:

फीलॅटली वरील लेखी प्रश्नमंजुषा ही एक बहु-पर्यायी प्रश्नमंजुषा असेल, ज्यामध्ये चालू घडामोडी, इतिहास, विज्ञान, क्रीडा, संस्कृती, भूगोल आणि फीलॅटली (स्थानिक आणि राष्ट्रीय) या विषयांवरील 50 प्रश्न असतील. फीलॅटली वरील प्रकल्प चार ते पाच पानांपेक्षा जास्त असू नये.

प्रकल्पामध्ये, उमेदवाराला जास्तीतजास्त 16 टपाल तिकिटे आणि 500 शब्द वापरता येतील. त्याहून अधिक वापरता येणार नाही. फीलॅटली लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धेत पुढील फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी घोषित झाल्यावर, मंडळ कार्यालयांद्वारे प्रकल्प आणि नमुना प्रकल्प टेम्पलेट संबंधी तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 06.09.2024 असून, उमेदवारांनी आपले अर्ज वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालय, गोवा विभाग, पहिला मजला, टपाल भवन, पणजी-गोवा-403001, या पत्त्यावर पाठवावेत.

 

* * *

PIB Panaji | S.Nilkanth/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 2048451) Visitor Counter : 48


Read this release in: English