वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
मुंबईत पीपीपी पद्धतीने उत्कृष्टता आणि कौशल्य विकासाचे केंद्र तयार केले जाईल: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी मुंबई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी घेतला विकास प्रकल्पांचा आढावा
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी प्लॅस्टिंडिया 2026 चे केले उद्घाटन
Posted On:
23 AUG 2024 11:05PM by PIB Mumbai
मुंबई, 23 ऑगस्ट 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यात आज विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला आणि शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.
मुंबईतील बोरिवली येथे एक चौरस फूट क्षेत्रफळाच्या प्रकल्प क्षेत्रात उत्कृष्टता आणि कौशल्य विकास केंद्र तयार करण्याच्या अनुषंगाने आपण सरकार, उद्योग आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याची माहिती गोयल यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
प्रशिक्षण केंद्रासाठी 50,000 चौरस फूट आणि वसतिगृहासाठी 20,000 चौरस फूट क्षेत्रफळाचा प्रकल्प तयार करण्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहमती दर्शवली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हे उत्कृष्टता आणि कौशल्य विकास केंद्र 6 ते 8 महिन्यांत तयार होईल असा अंदाज आहे.
V2P0.jpeg)
येत्या तीन वर्षांत या उत्कृष्टता केंद्रात 10,000 तरुणांना विविध क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण मिळेल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पुढे म्हणाले. या केंद्रामुळे महाराष्ट्राच्या विविध भागातील तरुण मुले आणि मुलींना या निवासी प्रशिक्षण केंद्रात लाभदायक कौशल्य विकास प्रशिक्षण घेता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षांत हे केंद्र देशातील एक अनुकरणीय खाजगी सार्वजनिक भागीदारी उपक्रम बनू शकेल, असे ते म्हणाले. भारतीय उद्योग परिसंघाचा (CII) चा चमू आधीपासूनच विविध कौशल्य विकास केंद्रे चालवत आहे, असे गोयल यांनी सांगितले.
गोयल यांनी आज मुंबईत असलेले केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता मंत्री जयंत चौधरी, महाराष्ट्र सरकारचे कौशल्य, रोजगार, नवउद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री मंगल प्रभात लोढा, इतर स्थानिक प्रतिनिधी यांच्यासह नॅसकॉम (NASSCOM) संघटनेचे माहिती तंत्रज्ञान कौशल्य व सायबर सुरक्षा तज्ज्ञ, परिधान व घरगुती सजावट क्षेत्रातील कौशल्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. ए. शक्तीवेल यांसारख्या या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भागधारकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

गोयल यांनी त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) ला भेट देऊन केली. या राष्ट्रीय उद्यानात त्यांनी सामान्य जनता तसेच सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गोयल यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपणही केले.
यानंतर पीयूष गोयल यांच्या हस्ते दादर येथील ॲड. बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयात ॲड. बाळासाहेब आपटे यांना समर्पित एका भित्तिचित्राचे उद्घाटन झाले.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) च्या पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेच्या (WIRC) 38व्या प्रादेशिक परिषदेत सहभाग घेतला. भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या (ICAI) सदस्यांना "विकसित भारत@ 2047 - मार्गदर्शक आराखडा" या विषयावर मार्गदर्शन करताना गोयल यांनी सनदी लेखापालांनी विकसित भारताचे राजदूत व्हावे, आधुनिक तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे, तसेच कायद्यांचे सुलभीकरण करण्यासाठी सूचना देण्याचे आवाहन केले.
दिवसाच्या शेवटच्या कार्यक्रमात गोयल यांनी ‘प्लास्टिंडिया 2026’चे औपचारिक उद्घाटन केले. हे प्रदर्शन 5-10 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित केले जाणार आहे. या प्रदर्शनात प्लास्टिक उद्योगातील नवोन्मेषी कल्पना आणि प्रगती दर्शविली जाणार आहे. सहा दिवसांचे हे प्रदर्शन संपूर्ण जागतिक प्लास्टिक मूल्य साखळीला समर्पित असेल. हे प्रदर्शन प्रगत उत्पादने आणि उपाय शोधत असलेल्या तसेच अर्थपूर्ण व्यावसायिक संबंध शोधत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी भेटीचे ठिकाण उपलब्ध करून देईल. या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये प्लास्टिंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष रविश कामत; ‘एनईसी’चे अध्यक्ष आलोक टिब्रेवाला, प्लास्टिंडिया 2026 आणि प्लास्टिक उद्योगाचे शिलेदार यांचा समावेश होता.

“प्लास्टिक उद्योग यशस्वी आणि चैतन्यपूर्ण असून माणसाच्या आयुष्यातील जवळपास सर्वच क्षणांमध्ये त्याची भूमिका असते”, असे गोयल या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितले. "आपण आता जिथे आहोत त्या स्थानी आपल्या अर्थव्यवस्थेला पोहचवण्यात या उद्योगाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे," असेही केंद्रीय मंत्री म्हणाले. त्यांनी भारत मंडपम् येथे आयोजित केल्या जाणाऱ्या भव्य प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. हे प्रदर्शन सुनियोजित असून या प्रदर्शनासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन गोयल यांनी दिले. प्लास्टिंडिया फाउंडेशन प्रतिभा, कौशल्य, आत्मविश्वास आणि प्लास्टिक उद्योगातील भारतासाठी असलेल्या प्रचंड क्षमतेचे प्रतीक आहे, असही ते म्हणाले. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या प्लास्टिक उद्योगाचे भविष्य उज्ज्वल आहे, असेही केंद्रीय मंत्री म्हणाले. 1987 मध्ये स्थापन झालेली प्लास्टिंडिया फाउंडेशन, प्लास्टिक उद्योगाच्या विकासाला चालना देणारी तसेच प्लास्टिक आणि संबंधित सामग्रीच्या वाढीस मदत करण्यासाठी प्लास्टिकशी जोडलेल्या प्रमुख संघटना आणि संस्थांची सर्वोच्च संस्था आहे.
* * *
PIB Mumbai | S.Nilkanth/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2048415)
Visitor Counter : 56