नौवहन मंत्रालय
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते मुंबई बंदर प्राधिकरण यांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन
वर्ष 2030 पर्यंत बलशाली सागरी राष्ट्र अशी भारताची ओळख निर्माण करण्याच्या प्रक्रियेत मुंबईची महत्वाची भूमिका राहील: सर्बानंद सोनोवाल
Posted On:
23 AUG 2024 7:35PM by PIB Mumbai
मुंबई , 23 ऑगस्ट 2024
वर्ष 2030 पर्यंत बलशाली सागरी राष्ट्र अशी भारताची ओळख निर्माण करण्याच्या उद्दीष्ठाचा भाग देशातील सर्व बंदरांचे सर्व प्रकारचे अद्ययावतीकरणाचे काम सुरु असुन त्या अंतर्गत जहाज बांधणी,दुरुस्ती आणि पूनर्प्रक्रिया याबरोबरच कुशल मनुष्यबळ निर्मिती अशा सर्व आघाड्यांवर काम सुरु आहे असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. ते आज मुंबई बंदर प्राधिकरण यांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन सोनोवाल यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त नितीशकुमार सिंन्हा उपस्थित होते.

सागरी राष्ट्र बनण्याच्या या प्रक्रियेत मुंबई बंदर आणि मुंबई बंदर प्राधिकरण महत्वाची भूमिका बजावणार असून आज उद्घाटन होत असलेल्या विविध प्रकल्पांवरून इथे सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीची कल्पना येते असे ते म्हणाले. जगातील 10 बलशाली सागरी राष्ट्रपैकी एक होण्यासाठी आपल्याला उर्वरित जगासोबत स्पर्धा करायची त्यासाठी सर्वार्थाने सज्ज व्हा असे सांगतानाच आत्मनिर्भर भारत होण्याच्या प्रक्रियेत दीडशे वर्षाहून अधिक असा गौरवशाली इतिहास असलेल्या मुंबई बंदराला खूप मोठी संधी असून त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
आज देशातील 96 टक्के निर्यात ही सागरी मार्गाने होत असल्याने किनारपट्टी पासून दूर राहणाऱ्या प्रदेशातील लोकांना या क्षेत्राच्या आवाक्याविषयी आणि इथे असलेल्या अमाप संधींविषयी सातत्याने सांगत राहायला हवे असे सोनोवल म्हणाले.
आजच्या. मुंबई बंदर प्राधिकरणाच्या कार्यक्रमात सोनोवाल यांनी रिमोटद्वारे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उदघाटन केले. यामध्ये पीर पाऊ येथे नव्यानेच बांधण्यात आलेल्या तिसऱ्या रासायनिक बर्थसाठी चाचणी परिचालनाचा प्रारंभ, जवाहर द्वीप येथे किनारा संवर्धन आणि रेक्लमेशन प्रकल्प यासाठी पायाभरणी आणि मरीन ऑइल टर्मिनल येथे एससीएडीए -Supervisory Control and Data Acquisition आणि पीएलसी- Programmable Logic Controller स्वयंचलन यंत्रणेचे उदघाटन, यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाउंडेशन (एमपीएसएफ) सोबत iPortman यंत्रणा आणि इस्टेट ऑपरेशन्स मॅनेजमेंट सिस्टिम (ईओएमएस-संपदा परिचालन व्यवस्थापन यंत्रणा) चे उद्घाटन करण्यात आले. सोनोवाल यांनी एमपीएसएफवर एक माहितीपत्रकही प्रकाशित केले. जागतिक स्तरावरील नौकानयन सुविधा सुरू करण्याच्या उपक्रमाची घोषणाही त्यांनी केली.

या कार्यक्रमांच्या अनुषंगाने, अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात मुंबई बंदर प्राधिकरण, एमपीएसएफ आणि एचपीसीएल यांच्यात हरित इंधन परिसंस्था विकसित करण्यासाठीच्या कराराचा समावेश आहे. दुसरा सामंजस्य करार Det Norske Veritas (DNV) आणि एमपीएसएफ यांच्यात उत्सर्जन व्यवस्थापन, डिकार्बोनायझेशन अर्थात निष्कार्बनीकरण, डिजिटायझेशन आणि बंदर व नौवहन परिचालनात सुरक्षा यावर सहकार्य करण्यासाठी झाला. यासोबत, गेटवे ऑफ इंडिया येथे प्रवासी सुरक्षितता वाढविण्यासाठी तराफा पुलाच्या स्थानासंदर्भात रॉयल बॉम्बे यॉट क्लबसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला. तसेच बॅलार्ड इस्टेट येथे पदपथावर उद्यान आणि वारसा दर्शन विकासासाठी आरपीजी फाउंडेशनसोबत करार करण्यात आला.
या दौऱ्यात विविध भाडेतत्त्वावरील करारांसाठी जमीन हस्तांतरण दस्तऐवज सुपूर्द करण्यात आले. यामध्ये महानगर गॅस लिमिटेडला दोन भूखंड भाडेतत्त्वावर देण्यात आले आणि मेसर्स एजिस लॉजिस्टिक लिमिटेडला लिक्विड बल्क स्टोरेजसाठी पीर पाऊ येथे दोन भूखंड भाडेतत्त्वावर देण्यात आले. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडसाठी भाडेतत्त्वावरील कराराचे नूतनीकरण करण्यात आले. एमबीपीए वर्कशॉप लॅण्डला भाडेतत्त्वावर जमीन आणि मेसर्स ओएनजीसीला जलद क्रू बोटींसाठी डोमेस्टिक क्रूझ टर्मिनलजवळील जमीन आणि पाणी क्षेत्राचे वाटपदेखील निश्चित करण्यात आले.
सोनोवाल यांच्या या भेटीदरम्यान जाहीर करण्यात आलेले उपक्रम आणि स्वाक्षरी झालेले करार 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक दर्शवत असून याचा खूप मोठा लाभ मुंबईला होण्याची अपेक्षा आहे. यामुळे 1.45 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्माण होणार आहे.

यावेळी प्राधिकरणाने हाती घेतलेल्या पर्यटन उपक्रमांविषयीच्या लघुपुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मुंबई बंदरातील सर्व जहाजांनी आज सायंकाळी 4 वाजता भोंगा वाजवून मानवंदना दिली.
JPS/SK/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2048288)
Visitor Counter : 58