सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक लोकसाहित्य (Folklore) दिनानिमित्त दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


महाराष्ट्रातील पोवाडा, गोंधळ, भारुड या लोककला होणार सादर

Posted On: 20 AUG 2024 5:20PM by PIB Mumbai

नागपूर, 20 ऑगस्ट 2024

'जागतिक लोकसाहित्य दिना' निमित्त, भारत सरकाराच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर येथे 22 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्राच्या लोककलेचा अविभाज्य भाग असलेल्या कथाकथन परंपरेवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नागपूर येथील  सांस्कृतिक केंद्र,परिसरात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.

महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये आख्यान या प्रकाराला एक समृद्ध परंपरा लाभली आहे. ही परंपरा विविध कला प्रकारांतून मांडली जाते. या कार्यक्रमात पोवाडा, गोंधळ, भारुड आदी लोककथांचे सादरीकरण होणार आहे. या लोककथांमध्ये शाहीर बालाजी बावणे आणि मंडळींतर्फे ‘पोवाडा’,'प्रवीण पाचंगे आणि गटातर्फे ‘गोंधळ' आणि  विलास कुबडे आणि मंडळींतर्फे 'भारूड'सादर होणार आहे.

दरवर्षी 22 ऑगस्ट रोजी जागतिक लोकसाहित्य दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य समितीने 1991 मध्ये हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करायला सुरवात केली. लोक-कथन परंपरा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे. या अमूर्त परंपरामध्ये लोककथा, दंतकथा, गीत, नृत्य, आणि निरनिराळ्या चालीरितींचा समावेश होतो आणि लोककलांचा हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केला जातो. आपल्या लोक परंपरा ही संपूर्ण जगभरातली आपली वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे. आपल्या लुप्त होत चाललेल्या सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा आणि लोककथांविषयक कार्यक्रमांचे आयोजन  करून आणि त्यात सहभागी होऊन ही संपत्ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याच्या कार्याचा आपण अभिमान बाळगू या.

या कार्यक्रमाला प्रवेश निःशुल्क असून प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूरचे प्रभारी संचालक के. के. गोपालकृष्णन यांनी केले आहे.   

 

Jaydevi PS/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2046990) अभ्यागत कक्ष : 75