संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोवा शिपयार्ड लिमिटेडने विकसित भारत संकल्पनेसह साजरा केला 78 वा स्वातंत्र्यदिन, एक पेड माँ के नाम माध्यमातून पर्यावरणीय बांधिलकीचे जतन आणि हर घर तिरंगा अभियानातही घेतला सहभाग

Posted On: 16 AUG 2024 2:00PM by PIB Mumbai

पणजी, 16 ऑगस्ट 2024

गोवा शिपयार्ड लिमिटेडने देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात वास्को द गामा, येथे साजरा केला.गोवा शिपयार्ड लिमिटेडचे (जीएसएल ) कर्मचारी, सीआयएसएफ, त्यांचे कुटुंबीय आणि मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज फडकावून सलामी देण्यात आली.

जीएसएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सीआयएसएफने त्यांना मानवंदना दिली.कार्यक्रमाला संबोधित करताना उपाध्याय यांनी स्वातंत्र्यापासून भारताची वाटचाल आणि देशाच्या सागरी संरक्षण क्षमता बळकट करण्यात जीएसएलने बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका याविषयी सांगितले.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची संकल्पना 'विकसित भारत' असून   वर्ष  2047 पर्यंत भारताला विकसित देश म्हणून घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी अनुरूप आहे.उपाध्याय यांनी आपल्या भाषणात त्यावर भर दिला.नौका बांधणीत तंत्रज्ञानविषयक प्रगती, नवोन्मेष,स्वदेशीकरण यातील निरंतर प्रयत्नांच्या माध्यमातून जीएसएल या संकल्पनेसाठी कसे योगदान देत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

उपाध्याय यांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी जीएसएलची वचनबद्धता व्यक्त केली. स्वदेशी आरेखन आणि प्रगत युद्धनौका, गस्ती जहाजे आणि इतर सागरी साधने  बांधणीत जीएसएलने प्राप्त केलेले यश त्यांनी अधोरेखित केले. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अभिनवतेचा ध्यास आणि क्षमता वर्धन जीएसएल कायम राखेल आणि विकसित भारतासाठी योगदान देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

नौकाबांधणी दरम्यान पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने आपल्या कामकाजात शाश्वत पद्धती समाकलित करण्यासाठी जीएसएलच्या सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी उपाध्याय यांनी सांगितले. विकसित आणि शाश्वत भारत व्यापक उद्दिष्टांना सुसंगत, आर्थिक व्यवहार्यतेसोबतच पर्यावरणाप्रती उत्तरदायी अशा विकासासाठी जीएसएल समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले.

पी 11356 मालिकेतील पहिल्या फ्रिगेटच्या(विशिष्ट लढाऊ जहाज ) यशाबद्दल उपाध्याय यांनी जीएसएलच्या चमूचे  अभिनंदन केले.  हे जीएसएलद्वारे बांधलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे जहाज आहे.  या यशामुळे जीएसएल  सर्वात अत्याधुनिक आणि कौशल्यपूर्ण आघाडीची युद्धनौका तयार करण्याचे  कौशल्य असलेल्या फार कमी देशातील शिपयार्डसच्या समूहात दाखल झाली आहे.  ही नौका पाहून आपला ऊर अभिमानाने भरून येत असल्याच्या भावना उपाध्याय यांनी व्यक्त केल्या. यामुळे आपले ग्राहक असलेल्या भारतीय नौदलालाही जीएसएलच्या वचनबद्धतेची ग्वाही मिळाली असल्याचे ते म्हणाले.

आपल्याकडे मोठे काम असून पुढील 5-6 वर्षांमध्ये त्याची अंमलबजावणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या आपल्याकडे 18000 कोटी रुपयांच्या ऑर्डर असून भारतीय नौदल आणि तटरक्षक दल  यांच्या आगामी प्रकल्पांचा विचार करता, पुढल्या वर्षी स्वातंत्र्यदिन कार्यक्रमासाठी तुमच्या समोर उभा राहीन तोवर जीएसएलने  30000 कोटी रुपयांच्या ऑर्डरचा टप्पा पार केला असेल, अशी आशा मला आहे. निर्यातीत आणखी एक एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे न्यू जनरेशन हॉपर ड्रेजरच्या बांधकामासाठी लक्समबर्गस्थित कंपनीसोबत करारावर स्वाक्षरी. हा प्रकल्प परदेशी व्यावसायिक जहाज बाजारपेठेत आपला प्रवेश अधोरेखित करतो असे सांगून या बाजारपेठेतली स्पर्धात्मकता आणि प्रकल्प कार्यान्वयनातली आव्हाने यावर प्रकाश टाकला. जीएसएलमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या ड्रेजरची (गाळ उपसणी यंत्र ) बांधणी केली जात आहे.

पर्यावरणीय शाश्वततेसाठी जीएसएलच्या वचनबद्धतेशी सुसंगत एका विशेष उपक्रमात, उपाध्याय यांनी एक पेड माँ के नाम मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. हा उपक्रम कर्मचाऱ्यांना त्यांच्या मातांच्या सन्मानार्थ एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करतो. हरित क्षेत्र वाढवण्यासोबतच विकसित भारताचा भाग म्हणून पर्यावरणीय कामकाजाचे महत्त्व रुजवणे, कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मुळांप्रती असलेले बंध दृढ करणे, असे या कार्यक्रमाचे उद्देश आहेत.

उपाध्याय यांनी हर घर तिरंगा मोहिमेमध्ये जीएसएलच्या  सक्रिय सहभागाबद्दलही सांगितले. जीएसएलने सर्व कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वजाचे  वाटप केले. समाजात या चळवळीला चालना दिली आणि एकता व  अभिमानाचे प्रतीक म्हणून राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटवून दिले. कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी या मोहिमेत उत्साहाने भाग घेतला.

उपाध्याय यांनी जीएसएलच्या कर्मचाऱ्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण यासाठी कौतुक केले. कर्मचाऱ्यांचे  योगदान जीएसएलच्या यशाचा कणा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सामुदायिक सहभाग आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व सांगितले. "नशा मुक्त भारत अभियान" अंतर्गत नशा मुक्त भारतासाठीच्या  राष्ट्रीय अभियानात योगदान देणाऱ्या तसेच स्थानिक समुदायांच्या कल्याणासाठी साहाय्य करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी ‘प्रशंसा पुरस्कार’ आणि ‘विशेष प्रशंसा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यातून  भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि एकता व  विविधतेची भावना दिसून आली.

 

S.Tupe/S.Kakade/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 



(Release ID: 2045901) Visitor Counter : 22


Read this release in: English