रेल्वे मंत्रालय
कोकण रेल्वेच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा
Posted On:
15 AUG 2024 4:00PM by PIB Mumbai
मुंबई, 15 ऑगस्ट 2024
कोकण रेल्वेच्यावतीने भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला. तसेच नवी मुंबईतील नेरूळ येथील, कोकण रेल्वे विहारच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) तुकडीची पाहणी केली.
या मेळाव्याला संबोधित करताना संतोष कुमार झा यांनी सर्व कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या अपवादात्मक ‘टीमवर्क’ आणि समर्पणाची प्रशंसा केली. संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी सर्वांनी परिश्रमपूर्वक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय, त्यांनी कोकण रेल्वेच्या उत्कृष्टतेची वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामगिरी आणि भविष्यातील उपक्रमांवर प्रकाश टाकला.
कोकण रेल्वेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची माहिती:
- कोकण रेल्वेने स्पर्धात्मक निविदांद्वारे ₹1200 कोटींहून अधिक खर्चाचे नवीन प्रकल्प यशस्वीरित्या प्राप्त केले आहेत.
- कोकण रेल्वेने 2023-24 या वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक ₹301 कोटींचा नफा मिळवला
- 190 पदांसाठी भर्ती अधिसूचना लवकरच जारी करण्याची योजना आहे.
- रेल्वे मंत्रालयाने ‘प्लॅन हेड 61’ अंतर्गत गोव्यातील जुने गोवा आणि पेरनेम (पेडणे) बोगदे बांधण्यासाठी ₹1486 कोटींची नवीन ‘इक्विटी’ मंजूर केली आहे.
- जानेवारी ते जुलै 2024 पर्यंत, कोकण रेल्वेने एकूण 11,444 मेल/पॅसेंजर गाड्या आणि 3,955 मालगाड्या चालवल्या.
- कोकण रेल्वे मार्गावर एकूण 181 उन्हाळी विशेष गाड्या यशस्वीपणे चालवण्यात आल्या.
- कोकण रेल्वेवरील सौर संयंत्रांनी जानेवारी ते जुलै 2024 पर्यंत 3.18 लाख युनिट वीज निर्माण केली, ज्यामुळे ऊर्जा बिलांमध्ये ₹38.56 लाखांची बचत झाली.
- 2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी कर्मचारी कल्याण निधीतून कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी रोख पुरस्कार आणि शिष्यवृत्ती म्हणून ₹20.78 लाखांची रक्कम वितरित करण्यात आली.
- 26 हरवलेल्या मुलांची रेल्वे आणि रेल्वे परिसरातून सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांना किंवा ‘चाइल्ड हेल्पलाइन्स’कडे सुपूर्द करण्यात आले.
- जागतिक पर्यावरण दिनी, 5 जून 2024 रोजी, कोकण रेल्वे मार्गावर आणि कोकण रेल्वे विहार येथे एकूण 6,548 रोपे लावण्यात आली.
- पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी 9 जुलै 2024 रोजी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (आयआयएफसीएल) आणि कोकण रेल्वे यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
- कोकण रेल्वेच्या मंगळुरु कार्यालयाला 2022-23 या वर्षात उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी, नवी दिल्लीच्या गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने “क्षेत्रीय राजभाषा पुरस्कार” मध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.
- कोकण रेल्वे प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत राहील आणि नवीन टप्पे गाठण्यासाठी सज्ज असून, राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देईल आणि सर्वांना प्रवासाचा अनुभव चांगला यावा, यासाठी कार्यरत आहे.
* * *
PIB Mumbai | NM/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2045644)