माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा सदस्य दिगंबर कामत यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकातील सीबीसी प्रदर्शनाचे उद्घाटन
Posted On:
14 AUG 2024 6:45PM by PIB Mumbai
पणजी, 14 ऑगस्ट 2024
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि मडगाव येथील विधानसभा सदस्य दिगंबर कामत यांच्या हस्ते आज केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या गोवा येथील केंद्रीय संचार ब्युरोतर्फे (सीबीसी)आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय मल्टीमिडिया प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वातंत्र्यदिन 2024 निमित्त आज, 14 ऑगस्ट 2024 पासून मडगाव रेल्वे स्थानक येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
कोकण रेल्वे महामंडळाच्या संयुक्त सहयोगासह आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन दिनांक 18 ऑगस्ट 2024 पर्यंत रोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी खुले असेल.
फाळणीमुळे जनतेला भोगाव्या लागलेल्या भयंकर वेदनांचे चित्रण करणाऱ्या व्हीआर रचनांसह नव्या फौजदारी कायद्यांमुळे झालेले आधुनिक कायदेविषयक बदल समजावून सांगणाऱ्या संवादात्मक सादरीकरणाबरोबरच भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे आणि इतर दृक्श्राव्य घटकांचा सदर प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनात नशामुक्त भारत अभियानावर आधारित सर्जनशील डिजिटल सामग्री देखील सादर करण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभात उपस्थितांना संबोधित करताना, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की हे प्रदर्शन आयोजित करून सीबीसीने अत्यंत उत्तम कार्य केले असून आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याचे स्पष्ट चित्र या प्रदर्शनाच्या माध्यमातून उभे राहते. फाळणीच्या घटनेविषयी बोलताना ते म्हणाले की, फाळणीच्या काळात लोकांना ज्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला होता त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही, पण या प्रदर्शनात मांडलेली छायाचित्रे आपल्याला त्याचे दर्शन घडवतात.
सीबीसी आणि कोकण रेल्वे यांनी एकत्र येऊन हे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल कामत यांनी कौतुक व्यक्त केले.या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून सीबीसीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने सुरु केलेल्या हर घर तिरंगा अभियानाचा भाग म्हणून त्यांनी मडगाव रेल्वे स्थानकामध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजांचे वितरण देखील केले.
यावेळी,उपस्थितांना संबोधित करताना, दक्षिण गोव्यातील डीआरडीएच्या प्रकल्प संचालक दीपाली नाईक यांनी या प्रकल्पात सहभागी झालेल्या स्वयं सहाय्यता बचत गटाच्या महिला सदस्यांची प्रशंसा केली.
कोकण रेल्वेचे उप महाव्यवस्थापक बबन घाटगे म्हणाले की, या प्रदर्शनात मिळणारी माहिती आणि तपशील तरुण पिढीला भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील.
गोवा येथील पत्रसूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम, कोकण रेल्वे पोलीस स्थानकातील उपमहाधीक्षक गुरुदास कदम यांच्यासह सीबीसी आणि कोकण रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तसेच विविध स्वयंसहाय्यता बचत गटाचे सदस्य देखील या उद्घाटन समारंभात उपस्थित होते.
याच उपक्रमाचा भाग म्हणून सीबीसी 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता, दक्षिण गोवा जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंतर-शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील आयोजित करणार आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2045371)
Visitor Counter : 37