सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर आयोजित 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला महाराष्ट्रातील 123 हून अधिक विशेष पाहुणे उपस्थित राहणार

Posted On: 14 AUG 2024 2:25PM by PIB Mumbai

मुंबई, 14 ऑगस्ट 2024


15 ऑगस्ट 2024 रोजी देश आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील सुप्रसिद्ध लाल किल्ल्यावरून या उत्सवाचे नेतृत्व करतील.या ठिकाणी ते राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर नेहमीच्या प्रथेप्रमाणे या ऐतिहासिक स्मारकाच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील.‘विकसित भारत’, ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची संकल्पना आहे.  

या निमित्ताने, नवी दिल्लीतील स्वातंत्र्यदिन 2024 च्या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारने देशभरातील विशेष पाहुण्यांना आमंत्रित केले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील 123 मान्यवर व्यक्तींचा समावेश आहे. विशेष पाहुण्यांमध्ये समाजाच्या विविध स्तरांमधील व्यक्तींचा समावेश असून, यामध्ये महिला, युवा, शेतकरी, आदिवासी समाजाच्या व्यक्ती, विविध क्षेत्रांमधील अधिकारी, सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी, MyGov स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष निमंत्रितांसह, विविध क्षेत्रांमधील मान्यवरांचा समावेश आहे.

निमंत्रित व्यक्तींपैकी अनेक जण दिल्लीला प्रथमच भेट देणार असून, दिल्लीमधील स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी आपल्याला निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे.  

“स्वयंसहाय्यता गटाच्या उपक्रमात सहभागी होऊन मी लखपती दीदी बनले आहे.मी केवळ आर्थिक स्वातंत्र्यच मिळवले नाही, तर आता मी माझ्या कुटुंबाला आधार देत आहे.सरकारच्या या उपक्रमामुळे मी माझ्या ‘गल्ली’तून, ‘दिल्ली’ पर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. त्यामुळे मला अत्यंत आनंद वाटत आहे. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा”,महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील शहापूर मंगरुळपीर येथील अर्चना खडसे म्हणाल्या.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगा कोतवाल गावामधील कल्पना देशमुख म्हणाल्या, “मी माझा प्रवास एका छोट्या गावातून सुरू केला. मी पुण्यामध्ये ड्रोन दीदी बनण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आता मी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात फवारणी करायला मदत करते. मला स्वातंत्र्य दिना निमित्त दिल्लीमध्ये होणार्‍या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित केले आहे. माझ्या जीवनातील हे सर्वात मोठे यश आहे. याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला निमंत्रित केल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानते.”

नाशिक जिल्हयामधील सुरगाणा तालुक्यातील हातरुंडी येथील शिक्षक विठ्ठल चौधरी यांनी 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या समारंभासाठी निमंत्रितांच्या यादीत आपला समावेश केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहेत. “दरवर्षी आम्ही शाळेत ध्वजारोहण सोहळा साजरा करतो. पण यंदा लाल किल्ल्यावर पंतप्रधानांबरोबर साजरा करणार आहोत. हा सन्मान दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हयामधील लाडसावंगी येथील आणखी एक शिक्षक, सारिका जैन म्हणाल्या, “आम्हाला अत्यंत उत्साह वाटत आहे! आमच्या सारख्या दूरवरच्या खेड्यातील लोकांनी दिल्ली केवळ टीव्ही वर बघितली आहे. पण आज दिल्लीत येऊन पंतप्रधानांना आपला राष्ट्रध्वज फडकावताना बघायला मिळेल, ही भाग्याची गोष्ट आहे. दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची व्यवस्था केल्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी आहोत.”

बुलडाणा येथील पुष्कर पाटील म्हणाला, “मला वयाच्या पंधराव्या वर्षी या ठिकाणी येण्याचे निमंत्रण मिळेल असे वाटले नव्हते. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. आम्ही आमच्या अटल इनोव्हेशन मिशन प्रकल्पांतर्गत खूप परिश्रम घेतले आहेत आणि त्याच्या यशाने मी आनंदी आहे.”

विशेष पाहुणे 13 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्यांचे जोडीदार/कुटुंबीय  यांच्यासह नवी दिल्लीत असतील. ते आज, म्हणजे 14 ऑगस्ट, 2024 रोजी पंतप्रधान संग्रहालय, कर्तव्य पथ यासारख्या दिल्लीतील इतर महत्त्वाच्या स्थळांना भेट देत आहेत . या विशेष पाहुण्यांनी ‘विकसित भारत’ संकल्पनेच्या दिशेने विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानाचा गौरव करणे, आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यामागचे उद्दिष्ट आहे.  

 

Jaydevi PS/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2045193) Visitor Counter : 54


Read this release in: English