अल्पसंख्यांक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज हज समितीमार्फत हज-2025 करू इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज अर्ज खुले केले


प्रथमच हज समितीच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त हज सुविधा ऍपवरही मागवण्यात आले अर्ज

Posted On: 13 AUG 2024 10:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

हज-2025 साठी सौदी अरेबियाने भारताला 1,75,025 चा कोटा दिला आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री, किरेन रिजिजू यांनी आज हज समितीमार्फत हज-2025 करू इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी हज अर्ज खुले केले. प्रथमच हज समितीच्या वेबसाइट व्यतिरिक्त हज सुविधा ऍपवरही  अर्ज मागवण्यात आले आहेत. हज-2025 साठी अर्ज करणाऱ्या यात्रेकरूंना मदत करण्यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाची हेल्पलाईन तसेच सोशल मीडियावर हज-विशेष(समर्पित) चॅनेल देखील चालवले जात आहेत.

भारतीय हज यात्रेकरूंसाठी हज यात्रा सुलभ आणि सोयीस्कर व्हावी यासाठी भारत सरकार सतत प्रयत्न करत आहे. या संदर्भात सातत्याने विविध प्रकारच्या सुधारणा केल्या जात आहेत.

सुधारणांची ही मालिका सुरू ठेवत, हज-2024 दरम्यान, तीर्थयात्रेचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या  मदतीने 'हज सुविधा ऍप' सुरू करण्यात आले. हे ऍप यात्रेकरूंना प्रशिक्षण सामग्री, राहण्याची सोय आणि विमान उड्डाण तपशील, सामानाची माहिती, आपत्कालीन हेल्पलाइन (SOS), तक्रार निवारण, अभिप्राय, भाषेचे भाषांतर आणि तीर्थयात्रेशी संबंधित विविध माहिती आणि सेवा तसेच किंग्डम ऑफ सौदी अरेबिया मध्ये भारतीय प्रशासनाकडून यात्रेकरूंसोबत उत्तम समन्वय आणि नियंत्रण राखण्याची सुविधा देते. भारतीय यात्रेकरूंच्या हज अनुभवामध्ये आणखी दर्जात्मक सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. हज-2025 साठी, हजच्या तयारीची प्रक्रिया आधीच सुरू करण्यात आली आहे.

हज-2025 साठी, 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या यात्रेकरुंच्या सोबत एक सोबती असणे अनिवार्य आहे. 65 वर्षे आणि त्यावरील वयोगटांना या वितरणात सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. वयाचा हा निकष आधी 70 वर्षे होता, मात्र आता  या यात्रेच्या अतिशय खडतर आणि दमछाक करणाऱ्या स्वरूपामुळे आणि सौदी अरेबियातील अतिशय बिकट हवामानाच्या स्थितीमुळे तो आणखी कमी करण्यात आला आहे.  परदेशी भूमीवरही आपल्या नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला हा निर्णय प्रतिबिंबित करत आहे. हे देखील सुनिश्चित करण्यात येईल की प्रथमच हज करण्याची इच्छा असलेल्या 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व यात्रेकरूंना हज-2025 साठी खात्रीपूर्वक जागा मिळतील.

देशभरातील पारपत्र कार्यालयांना देखील हजच्या उद्देशाने पारपत्रासाठी अर्ज केलेल्या  नागरिकांची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

भारत सरकारकडून हज यात्रेकरूंना भारतातून यात्रेला प्रयाण करण्यापूर्वी तसेच सौदी अरेबियामधील यात्रेदरम्यान अशा दोन्ही वेळी अतिशय कार्यक्षम आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045038) Visitor Counter : 76