शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयआयटी बॉम्बेद्वारे पहिल्या भारतीय नॅनोइलेक्ट्रॉनिक्स वापरकर्ता कार्यक्रमाचे (आयएनयूपी) आयोजन

Posted On: 13 AUG 2024 9:35PM by PIB Mumbai

मुंबई, 13 ऑगस्ट 2024

 

आयआयटी बॉम्बे ने 10 ऑगस्ट 2024 रोजी पहिल्या भारतीय नॅनोइलेक्ट्रॉनिक्स वापरकर्ता कार्यक्रमाचे (आयएनयूपी) आयोजन केले होते. आयएनयूपी हा 2008 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयआयटी बॉम्बे आणि भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएस) सुरू केलेला एक पथदर्शी उपक्रम आहे आणि 2021 मध्ये आयआयटी गुवाहाटी, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर, आयआयटी मद्रास येथे त्याचा विस्तार करण्यात आला आहे. या कार्यक्रमात देशभरातील शैक्षणिक संशोधक आणि अलीकडे स्टार्टअप कंपन्यांच्या वापरासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय-समर्थित सेमीकंडक्टर नॅनोफॅब्रिकेशन सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. भारत सेमीकंडक्टर अभियानात मदतगार म्हणून औद्योगिक प्रशिक्षण देण्यासाठी देखील या सुविधा वाढवण्यात येत आहेत. सहा आयएनयूपी यजमान संस्थांनी सहआयोजित केलेल्या वापरकर्त्यांच्या मेळाव्याने कार्यक्रमाच्या व्यापक उपलब्धींचा उत्सव साजरा झाला आणि त्याच्या भविष्यातील मार्गाची रूपरेषा ठरली. या मेळाव्याने आयएनयूपी च्या स्थापनेपासून फायदा झालेल्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांचा एक बहुविद्याशाखीय गट एकत्र आणला.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव (MeitY) आणि या आयएनयूपी वापरकर्ता मेळाव्याचे प्रमुख पाहुणे एस. कृष्णन यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन झाले. आपल्या बीजभाषणात कृष्णन यांनी देशभरात नॅनोइलेक्ट्रॉनिक संशोधनाची व्याप्ती वाढवण्यासाठी आयएनयूपी च्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. "आयएनयूपी ने केवळ अत्याधुनिक संशोधनाची सोय केली नाही तर एक मजबूत पायाभूत सुविधा देखील निर्माण केली आहे जी संपूर्ण भारतातील संशोधकांना नॅनोइलेक्ट्रॉनिक्समध्ये महत्त्वपूर्ण कामात सहभागी होण्यासाठी सक्षम करते. हा उपक्रम आपल्या देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्यासाठी महत्त्वपूर्ण आहे," असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात भारत सरकारचे माजी प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते, ज्यांनी या कार्यक्रमाची संकल्पना मांडली होती. "आयएनयूपी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील राष्ट्रीय सहयोगाचा आदर्श आहे. अशा उपक्रमांद्वारेच आपण भारतातील नवोन्मेषांच्या सीमांचा विस्तार सुरू ठेवू शकतो" याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या मेळाव्याला 350 हून अधिक सहभागींनी हजेरी लावली, ज्यात आयएनयूपी यजमान संस्थांचे प्राध्यापक, उद्योग आणि शैक्षणिक अशा दोन्ही क्षेत्रातील तज्ज्ञ, स्टार्टअप्स आणि महत्वपूर्ण सहयोगी प्रयत्न दर्शवणारे आयएनयूपी सुविधांचे सक्रिय वापरकर्ते यांचा समावेश होता. या कार्यक्रमात आयएनयूपीद्वारे संशोधनाला पाठबळ मिळाल्यामुळे कारकीर्दीत लक्षणीय प्रगती केलेल्या वापरकर्त्यांच्या यशोगाथा दाखवण्यात आल्या. “भारताच्या नॅनोइलेक्ट्रॉनिक्स/सेमीकंडक्टर गरजांसाठी प्रतिभा विकास” यावर लक्ष केंद्रित करणारे ‘मंथन सत्र: भविष्यातील आयएनयूपी’ हे संमेलनाचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य होते.

आयएनयूपीची सध्याची क्रियाशीलता आणि मोठ्या भारतीय सेमीकंडक्टर/नॅनोअभियांत्रिकी परिसंस्थेचा संदर्भ लक्षात घेता आघाडीच्या तज्ज्ञ, शैक्षणिक आणि उद्योग व्यावसायिकांना एकत्र आणून आयएनयूपी च्या भवितव्यावर चर्चा करणे हा यामागचा उद्देश होता. सखोल औद्योगिक-शैक्षणिक सहयोग, स्टार्टअपसाठी अधिक शाश्वत समर्थन आणि मनुष्यबळ विकासासाठी अधिक प्रमाणित प्रशिक्षण सामग्री विकसित करण्याच्या गरजेवर तज्ज्ञांनी भर दिला.

आयएनयूपी आणि त्याच्या उपक्रमांबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, कृपया INUP-i2i (https://inup-i2i.in/) ला भेट द्या.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2045030) Visitor Counter : 49


Read this release in: English