वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दहावा हातमाग दिवस : एनआयएफटी मुंबईकडून 'हस्तवेम' या हातमाग उत्पादनांवरील प्रदर्शनाचे आयोजन


एनआयएफटी खारघर संकुलात 'हस्तवेम:अ लिव्हिंग ट्रॅडिशन' या फॅशन रॅम्प वॉकचे,"मेरी संस्कृती मेरी पहचान" या सेल्फी स्पर्धेचे आणि हातमाग पंधरवड्याचे आयोजन

Posted On: 08 AUG 2024 2:31PM by PIB Mumbai

मुंबई, 8 ऑगस्ट 2024

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) मुंबईने दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस 7 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला.हा दिवस हातमाग उत्पादनांना चालना देण्यासाठी, हातमाग उद्योगाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी, तसेच भारतीय वारसा संवर्धित करण्याच्या प्रयत्नात आणि भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विणकर समुदायाचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे.या विशेष प्रसंगी एनआयएफटी मुंबईने आपल्या खारघर संकुलात 'हस्तवेम' या हातमाग वस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. रिसोर्स सेन्टरमधून निवडलेल्या कारागिरांच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांचा संग्रह या प्रदर्शनात मांडण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन नवी मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी व मुख्य भूमापन अधिकारी विजय देशमुख,एनआयएफटी, मुंबईच्या संचालक प्रा. डॉ. शर्मिला दुआ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. एनआयएफटी, हस्तकला क्षेत्राच्या उन्नतीसाठी विशेषतः हस्तकला संकुल उपक्रमाच्या माध्यमातून करत असलेल्या प्रयत्नांचे विजय देशमुख यांनी यावेळी कौतुक केले.कलाकारांच्या उपजीविकेवर विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांचा होत असलेला सकारात्मक परिणाम त्यांनी सांगितला. प्रा. डॉ. शर्मिला दुआ यांनी आपल्या भाषणात, हातमाग उद्योगात छोट्याछोट्या प्रयत्नांमधूनही अर्थपूर्ण बदल घडू शकतो,असे सांगितले.खारघर संकुलात 1 ऑगस्ट 2024 पासून हातमाग पंधरवडा सुरू करण्यात आला असून 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अधिकारी, अध्यापक आणि विद्यार्थ्यांना हातमागापासून तयार करण्यात आलेले कपडे परिधान करून सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

वर्ष 2023 मध्ये पहिल्या वर्षी यशस्वी आयोजनानंतर "हस्तवेम 2024" या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पहिल्या वर्षीच्या कॅटलॉगचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या हातमाग उत्पादनांचा  सर्वसमावेशक आढावा यात आहे.हा कॅटलॉग मागील घटनेचे दस्तऐवजीकरण करतो तसेच हातमाग परंपरेची उत्क्रांती आणि सातत्य दाखवून प्रेरणा स्त्रोत म्हणून काम करतो.पारंपारिक हस्तकलेत नवोन्मेषी डिझाइन्ससाठी व्यासपीठ उपलब्ध करून देताना हातमाग वारसा जतन करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी एनआयएफटी, मुंबईची वचनबद्धता या प्रकाशनातून अधोरेखित करण्यात आली.

हातमाग दिनाचे मुख्य आकर्षण ठरले ते "हस्तवेम: अ लिव्हिंग ट्रेडिशन" हा  फॅशन रॅम्प वॉक. यात विद्यार्थी, प्राध्यापक आणि अधिकारी यांनी त्यांच्या वेषभूषेच्या माध्यमातून  हातमाग वस्त्रांची समृद्ध परंपरा प्रदर्शित केली.रॅम्प वॉकमध्ये प्रमुख नवी मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि मुख्य भूमापन अधिकारी  विजय देशमुख हे विशेष अतिथी म्हणून सहभागी झाले होते. फॅशन शोच्या ज्युरीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित आणि मान्यताप्राप्त प्रतिमा व्यवस्थापन सल्लागार,सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि वॉर्डरोब स्टायलिस्ट बंदिता पात्रो यांचा समावेश होता. हातमाग फॅशन आणि स्टाइलिंगचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्याबद्दल त्यांनी एनआयएफटी मुंबईचे कौतुक केले.वस्त्रपरिधानाबाबत मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. फॅशन शो मधल्या विजेत्यांसाठी 'सुता' या ब्रँडने तीन हातमाग साड्या प्रायोजित केल्या.

याखेरीज एनआयएफटी, मुंबईने सर्व विद्यार्थी,कर्मचारी आणि प्राध्यापकांसाठी "मेरी संस्कृती मेरी जानकारी" या सेल्फी स्पर्धेचे आयोजन केले होते. यातील सहभागींनी भारताच्या हातमाग उत्पादनांची वेशभूषा करून सेल्फी काढले. फॅशनबद्दल सजग तरुणांना सहभागी करून घेणे, सोशल मीडियावरील उपस्थिती वाढवणे आणि भारतातील स्वदेशी हातमागाच्या समृद्ध परंपरांबद्दल जागतिक जागरूकता वाढवणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट होते. विजेत्यांना पारितोषिके आणि स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात पारंपारिक हातमाग हस्तकलेच्या क्षेत्रातील विविध विभागांद्वारे व्यापक संशोधन आणि दस्तऐवजीकरण प्रयत्नांचे प्रदर्शन करणारे विशेष प्रदर्शन देखील समाविष्ट होते. या प्रदर्शनाने हातमागाच्या विणकामाच्या समृद्ध वारशाचा गौरव करण्यासोबत शतकानुशतकांची कलाकुसर जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आणि ही महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रथा टिकवून ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा प्रसार केला. क्राफ्ट रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन प्रदर्शनात टेक्सटाईल डिझाईन, निटवेअर डिझाईन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन आणि लाइफस्टाइल ॲक्सेसरीज, फॅशन डिझाईन आणि बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या विभागांनी योगदान दिले. हे प्रदर्शन 15 ऑगस्ट  2024 पर्यंत खुले असून विद्यार्थी आणि अभ्यागतांना ते पाहता येईल.

तरुण पिढीमध्ये हातमाग वस्त्रांच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या वापरास प्रोत्साहन देणे,हे एनआयएफटी, मुंबईच्या हातमाग दिवस उत्सवाचे उद्दिष्ट आहे. पारंपारिक कलाकुसर, आधुनिक फॅशन शिक्षणात समाकलित करून तिचे जतन करण्यासाठी आणि अभिमानाने ती पुढे नेण्यासाठी एनआयएफटीची वचनबद्धता या कार्यक्रमांमधून दिसून आली.

S.Pophale/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2043045) Visitor Counter : 68


Read this release in: English