दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्र टपाल परिमंडळाकडून विशेष 'कॅन्सलेशन'
Posted On:
08 AUG 2024 11:01AM by PIB Mumbai
राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मुंबई जीपीओ येथे 7 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते विशेष टपाल 'कॅन्सलेशन'चे अनावरण झाले. देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा संवर्धित करण्यात तसेच स्थानिक कारागिरांना पाठबळ देण्यात हातमाग आणि खादी उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले.
या कार्यक्रमाला टपाल सेवा संचालक (मुख्यालय) अभिजीत बनसोडे आणि मुंबई क्षेत्र टपाल सेवा संचालक अजिंक्य काळे उपस्थित होते. तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे राज्य संचालक योगेश भांबरे, आयपीओएस प्रोबेशनर आसिम खान हेदेखील उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्य पोस्टमास्टर जनरल किशन कुमार शर्मा यांनी खादी, ग्रामोद्योग आणि संलग्न क्षेत्राच्या विकासाला सक्रिय चालना देण्याचे महत्त्व सांगितले. असे उपक्रम पारंपरिक कलेच्या संवर्धनात साहाय्यभूत ठरण्यासोबतच रोजगार निर्मिती आणि शाश्वत उपजीविकेला आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, यावर त्यांनी भर दिला.
या उपक्रमासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतल्याबद्दल तसेच खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची समृद्ध वैविध्यता प्रदर्शित करण्यासाठी स्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे राज्य संचालक योगेश भांबरे यांनी आभार मानले. या पारंपरिक उद्योगांना पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात तीन उल्लेखनीय विभागांचे स्टॉल होते. खादी, ग्रामोद्योग आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम या विभागांच्या स्टॉल्समधून पुरुष आणि स्त्रियांसाठीचे खादीचे वैविध्यपूर्ण कपडे, चामड्याच्या वस्तू आणि इतर पारंपरिक कलाकुसरीच्या वस्तूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक मेहनत घेणारे टपाल विभागातील समर्पित कर्मचारी आणि उत्साही 'फिलाटेलिस्ट' यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाची शोभा वाढली.
भारताच्या हातमाग उद्योगाचा वारसा आणि कारागिरी यांचा उत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व अधोरेखित करून त्याला कायमस्वरूपी मानवंदना हे टपाल 'कॅन्सलेशन' ठरेल.
अधिक माहिती:
टपाल 'कॅन्सलेशन' म्हणजे रद्दबातल (किंवा रद्द म्हणून ओळखले जाते; फ्रेंच: “oblitération”) हे टपालाच्या तिकिटावर किंवा टपाल स्टेशनरीवर लागू केलेले एक टपाल चिन्ह आहे जे तिकिटावर रद्दबातल करून त्याचा पुनर्वापर रोखते. रद्दबातल विविध प्रकारच्या डिझाइन, आकार, आकार आणि रंगांमध्ये येते. आधुनिक रद्दबातलमध्ये सामान्यतः तारखा आणि ज्या टपाल कार्यालयातून तिकिटे पाठवली गेली आहेत ती जागा समाविष्ट असते. “टपाल चिन्ह” हा शब्द कधीकधी विशिष्ट भागासाठी वापरला जातो ज्यामध्ये तारीख आणि पोस्टिंगचे स्थान असते आणि हा शब्द अनेकदा “रद्दबातल” या शब्दासह विनिमयाने वापरला जातो.
रद्दबातल हे संग्रहकर्त्यांसाठी तिकिटांच्या मूल्यावर परिणाम करू शकते. रद्दबातल इतिहास निर्माण करतात आणि त्यामुळे तिकिटाचे कालावधी आणि स्थान हे रद्दबातलच्या मदतीने निश्चित केले जाऊ शकते. म्हणूनच विशेष घटना, विशेष स्थान, विशेष प्रसंगी रद्दबातल संग्रहकर्त्यांसाठी खूप महत्वाचे आहेत.
***
ShilpaN/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2043019)
Visitor Counter : 47