माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरदर्शनचे ऑगस्ट 2024 मध्ये 4 आकर्षक नवीन कार्यक्रम: मनोरंजन, संस्कृती आणि हृदयस्पर्शी कथांचे मिश्रण
Posted On:
02 AUG 2024 5:52PM by PIB Mumbai
उच्च दर्जा आणि आकर्षक आशय आपल्या चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू असलेल्या समर्पित सेवेचा एक भाग म्हणून दूरदर्शन चार नवीन दूरचित्रवाणी कार्यक्रम सुरू करत आहे. ऑगस्ट 2024 च्या पहिल्या पंधरवड्यापासून नियोजित हे कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री आणि डीडी नॅशनल या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. या आगामी कार्यक्रमांची घोषणा करण्यासाठी एक वार्ताहर परिषद आज 2 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमांशी संबंधित वामन केंद्रे, सावनी रवींद्र, पृथ्वी काळे, इरावती लागू, नंदू गाडगीळ आणि अनुज कपूर यांच्यासह मान्यवर कलाकार या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते.
मुंबईतून प्रसारित होत असलेल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कार्यक्रम प्रमुख संदीप सूद यांनी नव्या कार्यक्रमांविषयी या पत्रकार परिषदेत माहिती दिली. सूद यांनीच सह्याद्री वाहिनीसाठी या कार्यक्रमांची संकल्पना मांडून ती पुढे नेली होती. मागच्या वर्षभरात सूद यांनी ज्येष्ठ लेखिका आणि चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांच्यावरील माहितीपटाची २८ भागांची मालिका, ग्राहक जागृतीचे सर्वोत्तम उदाहरण ठरलेला जागो ग्राहक हा कार्यक्रम आणि प्रसिद्ध मराठी गीतकार आणि संगीतकारांचा सहभाग असलेला गोष्टी गाण्याच्या हा कार्यक्रम असे अनेक लोकप्रिय कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणले आहेत. आता येत्या ८ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी, जेष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचा सहभाग असलेला, गोष्टी गाण्याच्या या कार्यक्रमाचा ९० आणि ९१ वा भाग प्रसारित होणार आहे.
लाखो प्रेक्षकांना आनंद देतील असे हे नवे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
1. आमची अनन्या- डीडी सह्याद्री
2. आमचे हे … आमची ही- डीडी सह्याद्री
3. वाचू आनंदे- डीडी सह्याद्री
4. हम तो मिडिल क्लास हैं जी-डीडी नॅशनल
हे नवे कार्यक्रम सांस्कृतिक वारसा, साहित्यिक उत्कृष्टता आणि हृदयस्पर्शी मनोरंजन यासाठीची प्रतिबद्धता दर्शवतात. प्रत्येक कार्यक्रम कथनाची वैशिष्ट्यपूर्ण शैली, मराठी साहित्यातील चैतन्य, कौटुंबिक जीवन आणि भारतीय संस्कृतीची समृद्धता साजरे करणारा आहे.
काय आहेत बरे हे कार्यक्रम :
- आमची अनन्या - हृदयस्पर्शी मराठी कौटुंबिक मालिका
डीडी सह्याद्रीवरून सुरू होणाऱ्या आमची अनन्या या मालिकेत प्रेक्षकांना उत्साही आणि प्रेमळ नायिका अनन्या आणि तिच्या विलक्षण मराठी कुटुंबाचे दर्शन घडेल. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि परंपरेची झलक यातून पाहायला मिळेल, विनोद आणि हृदयस्पर्शी क्षणांचे मिश्रण पाहायला मिळेल. या कुटुंबाच्या जीवनातले कुलदेवतेचे महत्त्व , अनन्याच्या कौटुंबिक जीवनातले चढउतार, प्रेम, आनंद पाहायला मिळेल. महाराष्ट्रातल्या चैतन्यमयी कौटुंबिक जीवनाची झलक बघायला मिळेल, अनन्या या मालिकेत.
- आमचे हे... आमची ही - सेलिब्रिटी जोडप्यांच्या नात्यांचा उत्सव
आमचे हे... आमची ही, हा डीडी सह्याद्रीवरचा आकर्षक गप्पागोष्टींचा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातली सेलिब्रिटी दांपत्ये यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर करणार असून निरंजन पाठक निर्माते आहेत. मनोरंजन, क्रीडा आणि व्यवसाय यासह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध जोडप्यांचे जीवन, नातेसंबंध आणि यश या कार्यक्रमातून जाणून घेता येईल. त्यांचा वैयक्तिक प्रवास, यशोगाथा आणि अनुभवातून प्रेरणा आणि नवी अंतर्दृष्टी लाभेल.
- वाचू आनंदे – मराठी साहित्यातील उत्कृष्टतेला सलाम
वाचू आनंदे हा डीडी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणारा आणि मराठी साहित्याचा समृद्ध वारसा साजरा करणारा अनोखा चर्चात्मक कार्यक्रम आहे . या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात मान्यवर लेखक आणि सुप्रसिद्ध व्यक्ती गाजलेल्या साहित्यकृतींमधील उताऱ्यांचे वाचन करतील. धनश्री दामले सूत्रसंचालन करतील तर उत्तरा मोने यांनी संशोधन केलेल्या या कार्यक्रमात पु.ल.देशपांडे आणि विजय तेंडुलकर यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांच्या पुस्तकांतील काही भाग सुप्रसिद्ध कलाकारांकडून सादर केला जाईल. मराठी साहित्यसागरात खोल सूर मारून गुंगवून टाकणाऱ्या चर्चा आणि सादरीकरणे यांच्या माध्यमातून त्याचे सौंदर्य अनुभवण्याची संधी हा कार्यक्रम प्रेक्षकांना देईल.
- हम तो मिडल क्लास है जी- हलकी-फुलकी कौटुंबिक विनोदी मालिका
डीडी नॅशनलवर प्रसारित होणारा ‘हम तो मिडल क्लास है जी’ म्हणजे आनंददायक विनोदी मालिका असून त्यात भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातील रोजच्या जगण्यातील आनंद आणि संघर्ष यांचे दर्शन घडते. झाशीहून मुंबईला स्थलांतरित झालेल्या कुटुंबाला मुंबईतील आयुष्याशी जुळवून घेताना काय करावे लागते ते या मालिकेत पाहता येईल. प्रेमळ कौटुंबिक मूल्यांना विनोदाची जोड देऊन हा कार्यक्रम देशभरातील प्रेक्षकांना त्यातील पात्रांशी जोडून घेतो आणि मनोरंजनाचा उत्तम अनुभव देतो.
देशभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या आणि त्यांचे यथायोग्य मनोरंजन करणाऱ्या या आल्हाददायक आणि रोमांचक कार्यक्रमांचा अनुभव घेण्यासाठी यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात दूरदर्शन सह्याद्री आणि राष्ट्रीय वाहिन्या बघत राहा.
परिशिष्ट – अ
कार्यक्रम आणि प्रसारणसंबंधी तपशील
- आमची अनन्या:
हा कार्यक्रम महाराष्ट्रात राहणारी अनन्या नावाची उत्साही, तरुण स्त्री आणि दैनंदिन जीवनातील विनोदी आणि भावनिक पैलूंचे दर्शन घडवणारे तिचे तऱ्हेवाईक पण प्रेमळ कुटुंब यांच्याभोवती गुंफलेला आहे. महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही मालिका कुटुंबातील सदस्यांचे आपापसातील विलक्षण नातेसंबंध, त्यांचे दृढ नाते आणि ते ज्या प्रकारे हास्यास्पद परिस्थितीत अडकतात त्याचे दर्शन घडवते.हा कार्यक्रम मराठी कौटुंबिक जीवनातील मनोरंजक गैरसमजुतींपासून हृदयस्पर्शी क्षणांपर्यंत सर्व प्रकारचा आनंद आणि आव्हानांचे दर्शन घडवतो. हसणे, रडणे आणि मनाला भिडणाऱ्या क्षणांसह दर्शकांना अनन्या आणि तिचे कुटुंब हास्य, प्रेम आणि अविस्मरणीय आठवणींच्या प्रवासाला नेते.
या मालिकेची संकल्पना आणि दिग्दर्शन अश्विनी गड्डू यांचे, पटकथा हरीश पटेल यांची असून लेखन राजेश कोळंबकर यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत दूरचित्रवाणी व चित्रपटातील कलाकार इरावती लागू, नंदू गाडगीळ, संजीवनी भिसे असून सहाय्यक भूमिकांमध्ये सचिन वाळुंजे, दीपा आमरे, प्रगती भोसले, आलाप त्यागी, वनिता निकम, विनय कांबळे, राजेश साळवी व इतर आहेत.
अनन्याच्या शीर्षक भूमिकेत पृथ्वी काळे आहे. शीर्षक गीत रागिणी कवठेकर यांनी गायले असून संगीत सोहम मर्चंट यांचे आहे.
प्रसारणाचे वेळापत्रक
वेळ – सायं. 7:30 (प्राईम-टाईम)
दिवस – शुक्रवार ते रविवार (आठवड्यातून तीन दिवस)
सुरु होण्याची तारीख – 9 ऑगस्ट 2024
कालावधी – प्रत्येकी 30 मिनिटांचा एक भाग
वाहिनी – डीडी सह्याद्री (मराठी)
- आमचे हे... आमची ही... महाराष्ट्रातील नामांकित जोडप्यांवर चित्रीत कार्यक्रम
या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागांमध्ये नामांकित व प्रसिद्ध दांपत्य जसे की नाट्य दिग्दर्शक व राष्ट्रीय नाट्यशाळा, नाट्य निर्माते प्रसाद कामडी व शिल्पा कामडी, अभिनेते व दिग्दर्शक जयवंत वाडकर आणि त्यांची पत्नी, प्रसिद्ध स्रीरोगतज्ञ डॉ. नंदिता पालशेतकर आणि त्यांचे पती सुवर्ण व्यावसायिक प्रदीप पालशेतकर, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आणि मसालेवाले खामकर यांचा सहभाग आहे.
पुढील भागांचे चित्रीकरण बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे व त्यांची पत्नी, अभिनेत्री अलका कुबल आणि त्यांचे पती सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये, कालनिर्णयचे मालक जयंत साळगांवकर आणि त्यांची पत्नी यांच्यावर होणार आहे.
प्रसारणाचे वेळापत्रक
वेळ – सायं. 8:30 (प्राईम-टाईम)
दिवस – दर बुधवारी
सुरु होणार – 14 ऑगस्ट 2024
मराठी साहित्याला वैभवशाली इतिहास असून आपल्याकडे अनेक ख्यातनाम साहित्यिक आणि लेखकांच्या साहित्यसंपदेचा ठेवा आहे. यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, प्रवासवर्णन, विज्ञान कथा, बालसाहित्य, ऐतिहासिक साहित्य आणि लोककथा अशा विविध साहित्य प्रकारांचा समावेश आहे. वाचकांना या वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची ओळख व्हावी हा या मालिकेचा उद्देश आहे. आम्ही प्रसिद्ध साहित्यिकांच्या निवडक साहित्यकृतींचे वाचन सादर करणार आहोत.
हे वाचन मान्यवर कलाकार करणार आहेत.
मराठी साहित्यसृष्टीतील प्रसिद्ध साहित्यिक पु.ल.देशपांडे, विजय तेंडुलकर, व.पु.काळे आणि सानिया यांच्या साहित्यातील निवडक वाचनाने या मालिकेचा आरंभ करणार आहोत. हे वाचन अतुल परचुरे, आनंद इंगळे, तुषार दळवी, सुनील बर्वे, सोनाली कुलकर्णी, सौरभ गोखले, प्राजक्ता दातार आणि अक्षय शिंपी यांसारखे सुप्रसिद्ध कलाकार करणार आहेत.
प्रत्येक भागामध्ये नावाजलेले लेखक आणि कलाकार यांचा समावेश असेल जे त्यांच्या साहित्यातील वाचन सादर करतील. प्रत्येक भाग अर्ध्या तासाचा असेल आणि आठवड्यातून दोनदा प्रसारित केला जाईल. या चे सूत्रसंचालन धनश्री दामले करणार आहेत. तर उत्तरा मोने या कार्यक्रमाच्या संशोधनाची आणि समन्वयाची जबाबदारी सांभाळत आहेत. एस ए मणियार कार्यक्रमाचे निर्माते आहेत.
- वाचू आनंदे
मराठी साहित्य व राज्यातील प्रसिद्ध लेखक हा या कार्यक्रमाचा विषय आहे. त्यांच्या लेखनातील निवडक परिच्छेद, कविता इत्यादींचे जाहीर वाचन नामांकित व प्रसिद्ध व्यक्ती वाचू आनंदे या कार्यक्रमात करतील. मराठी साहित्याचे समृद्ध विश्व वाचन आणि चर्चांमधून मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर हा कार्यक्रम घेऊन येईल.
मराठी साहित्याच्या वारशाचा गौरव करणारा हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. प्रत्येक भागात प्रसिद्ध लेखक, साहित्यिक यांच्यासह मनोरंजन विश्वातील व्यक्ती त्यांच्या आवडीच्या निवडक साहित्याचे वाचन करतील. मराठी साहित्याविषयी अभिमान वाढवून प्रेक्षकांना या संपन्न साहित्य विश्वाकडे आकर्षित करण्याचा या कार्यक्रमाचा हेतू आहे.
प्रसारणाची वेळ :
वेळ: रात्री 8:30 (प्राइम टाइम)
कधी : सोमवार आणि मंगळवार (आठवड्यातून दोनदा)
सुरु होणार : 12 ऑगस्ट 2024
कालावधी: प्रत्येक भाग- 30 मिनिटे
वाहिनी : डीडी-सह्याद्री (मराठी)
- हम तो मिडलक्लास हैं जी
हम तो मिडलक्लास हैं जी, ही कथा राम शर्मा यांची आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्याची बदली झाशी वरून मुंबईला झाली आहे. दोन शहरांमधील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक विविधतेमुळे या कुटुंबाला अनेक तडजोडी कराव्या लागत आहेत. मात्र त्यांच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि आपसातील दृढ संबंधांच्या जोरावर ते सर्व संकटांवर मात करतात आणि मुंबईत आनंदाने जीवन व्यतीत करतात. या मालिकेत सकारात्मक कौटुंबिक मूल्यांसह हलक्याफुलक्या आणि उबदार कौटुंबिक विनोदाचा आस्वाद घेता येणार आहे.
प्रसारण वेळापत्रक
वेळ: रात्री 8:०० (प्राइम-टाइम)
कधी : सोमवार ते गुरुवार (आठवड्यातून चार वेळा)
सुरु होणार : 1 जुलै 2024
कालावधी: प्रत्येक भाग 30 मिनिटे
चॅनल: डीडी-नॅशनल (हिंदी)
***
DD/PK
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040890)
Visitor Counter : 259