अणुऊर्जा विभाग
सौदी अरेबियामधील रियाध येथे झालेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केली पदकांची कमाई
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2024 8:50PM by PIB Mumbai
मुंबई, 30 जुलै 2024
सौदी अरेबियामधील रियाध येथे 21 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत झालेल्या 56 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) 2024 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी पदके पटकावली आहेत.
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे :
- देवेश पंकज भैया (सुवर्ण) जळगाव, महाराष्ट्र
- अवनीश बन्सल (रौप्य) मुंबई, महाराष्ट्र
- हर्षिन पोसीना (रौप्य) हैदराबाद, तेलंगणा
- कश्यप खंडेलवाल (कांस्य) मुंबई, महाराष्ट्र
भारतातून चार ज्युरी सदस्य देखील या स्पर्धेसाठी गेले होते: मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.गुलशनारा शेख, मार्गदर्शक म्हणून डॉ.श्रद्धा तिवारी (आयसीटी, मुंबई) तर प्रा. सीमा गुप्ता (आचार्य नरेंद्र देव महाविद्यालय, दिल्ली) आणि डॉ.अमृत मित्रा (गव्हर्मेंट जनरल डिग्री कॉलेज, सिंगूर, पश्चिम बंगाल) वैज्ञानिक निरीक्षक म्हणून सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या सहभागाचे हे 25 वे वर्ष होते. या सर्व वर्षांत, 29% भारतीय विद्यार्थ्यांना सुवर्ण, 53% विद्यार्थ्यांना रौप्य तर 18% विद्यार्थ्यांना कांस्य पदक मिळाले आहे.गेल्या दहा स्पर्धांमध्ये, सुवर्ण आणि रौप्य पदकांची टक्केवारी अनुक्रमे 33% आणि 57% इतकी आहे. यावर्षी, आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 94 देशांतील (5 निरीक्षक देशांसह) 327 विद्यार्थी सहभागी झाले होते.आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडच्या ध्वजाखाली स्पर्धेत उतरलेले आठ देश आणि दोन संघ पदकतालिकेत भारतापेक्षा पुढे होते.
या स्पर्धेत प्रयोगात्मक आणि सैद्धांतिक अशा दोन्ही घटकांवर आधारित स्पर्धा झाली. प्रयोगात्मक स्पर्धेत दोन कार्यांचा समावेश होता. त्यापैकी एक म्हणजे, क्रोमॅटोग्राफी (TLC) च्या पातळ थराद्वारे चार ऍसिड-बेस आम्ल -अल्कली दर्शक रंगांचे रंग संक्रमण सामू (pHs) ओळखणे आणि आठ अज्ञात द्रावण ओळखण्यासाठी या निर्देशकांचा वापर करणे आवश्यक होते. तर दुसरे कार्य होते, पोटॅशियम परमँगनेटचे आम्लीय आणि अल्कलीय स्थितीत विविध टायट्रंटसह मास-आधारित टायट्रेशन करणे हे होते. सैद्धांतिक परीक्षेत विविध रासायनिक क्षेत्रांतील नऊ समस्यांचा समावेश होता. जसे की उपकरणांमध्ये गॅस सेन्सिंग प्रतिरोधक म्हणून वापरले जाणारे सेमीकंडक्टिंग मेटल ऑक्साइड, न्यूरोट्रांसमीटरचे काम करणाऱ्या डोपामाइन या रसायनाचे उत्पादन, पेनिसिलीन या प्रतिजैविकाच्या उत्पादनाचा कृत्रिम मार्ग आणि इथेन-आधारित पॉलिमर तसेच सेल्फ-हिलिंग पॉलिमरची निर्मिती यंत्रणा.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात आयोजित अभिमुखता आणि प्रस्थान पूर्व शिबिरादरम्यान संघाची चांगली तयारी केल्याबद्दल होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचा (HBCSE) रसायनशास्त्र ऑलिम्पियाड विभाग तसेच बाह्य शिक्षक आणि मार्गदर्शकांचा संसाधन चमू देखील कौतुकास पात्र आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र हे, विविध ठिकाणी होणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्स मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना निवडण्याचे तसेच प्रशिक्षणाचे नोडल केंद्र आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे घेतली जाणारी राष्ट्रीय ऑलिम्पियाड परीक्षा अंतिम संघ निवडीसाठीचे प्रवेशद्वार म्हणून ओळखली जाते.

डावीकडून: डॉ. अमृत कृष्ण मित्रा (वैज्ञानिक निरीक्षक), प्रा. गुलशनारा रफिक शेख (मुख्य मार्गदर्शक), कश्यप खंडेलवाल (कांस्य), अवनीश बन्सल (रौप्य), देवेश पंकज भैया (सुवर्ण), हर्षिन पोसीना (रौप्य), प्रा. सीमा गुप्ता (वैज्ञानिक निरीक्षक), डॉ. श्रद्धा सुधीर तिवारी (मार्गदर्शक)
अधिक माहिती येथे देखील उपलब्ध आहे:
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2039328)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English