संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

16 वर्षीय जिया राय हिने इंग्लिश खाडी पार करून रचला इतिहास,हे यश मिळवणारी ती पहिलीच स्वमग्न मुलगी


जियाने आपले हे यश स्वमग्नता (ऑटिझम) जागृतीसाठी केले समर्पित

Posted On: 30 JUL 2024 3:53PM by PIB Mumbai

मुंबई, 30 जुलै 2024


जिया राय ही स्वमग्नता (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) असलेली 16 वर्षांची मुलगी, इंग्लिश खाडी  यशस्वीरित्या पोहून पार करणारी जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा-जलतरणपटू बनली आहे.भारतीय नौदलातील एमसी-एट-आर्म्स II, मदन राय यांची मुलगी, जिया हिने 17 तास 25 मिनिटांत 34 किलोमीटरचे अंतर कापून एकट्याने पोहण्याची ही कामगिरी केली.उल्लेखनीय बाब म्हणजे, इंग्लिश खाडी पोहून  जाण्याच्या 150 वर्षांच्या इतिहासात, जिया ही ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेली पहिली मुलगी आहे जिने हे यश संपादन केले आहे.

तिने 28 जुलै 24 रोजी इंग्लंडमधील ॲबॉट्स क्लिफ येथून तिच्या साहसी प्रयत्नांना सुरुवात केली आणि 29 जुलै 24 च्या पहाटे ती फ्रान्समधील  प्टे डे ला कोर्टे - डून येथे पोहचत आपली मोहिम पूर्ण केली.जियाने आपली ही मोहीम ऑटिझम जागरूकतेसाठी समर्पित केली आहे.

मार्च 2022 मध्ये, तिने 13 तास आणि 10 मिनिटांत 29 किमीचा पल्ला पार करून, पाल्क सामुद्रधुनी ओलांडून सर्वात जलद पोहण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला होता.जियाने आपल्या जलतरण कौशल्यासाठी प्रतिष्ठित प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या प्राप्तीसह तिची अनेक ठिकाणी प्रशंसा करण्यात आली आहे.


जियाचे वय दोन वर्षांचे असतानाच तिला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असल्याचे निदान झाले होते. जियाला दररोज होणाऱ्या पार्क भेटी दरम्यान आपल्याला पोहण्याची आवड असल्याचे कळले होते.जिया अबोल असली  तरी, तिच्या पालकांनी तिला व्हिडिओंद्वारे मार्गदर्शन केले,ज्यामुळे तिची पॅरा-जलतरणपटू म्हणूनची कारकीर्द अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आली.

जियाचे कौतुक

ओपन वॉटर स्विमिंगमधील तिच्या कामगिरीबद्दल तिला प्रतिष्ठित श्रीव्हर-केनेडी स्टुडंट अचिव्हमेंट अवॉर्ड-2023 ने सन्मानित करण्यात आले. 03 सप्टेंबर 23 रोजी भागीरथी नदीत मुर्शिदाबाद जलतरण असोसिएशनने आयोजित केलेल्या ओपन वॉटर लाँग डिस्टन्स स्विमिंग स्पर्धेच्या 77 व्या आवृत्तीतही तिने भाग घेतला. 81 किमी स्पर्धेतील 24 पैकी केवळ 14 स्पर्धकांनी 13 तास 30 मिनिटे या निर्देशीत कालावधीत पोहणे पूर्ण केले.जियाने 13 तास 10 मिनिटांत पोहणे पूर्ण केले आणि स्पर्धेच्या 77 वर्षांच्या इतिहासात असे करणारी ती सर्वात लहान आणि एकमेव दिव्यांग किशोरी बनली होती.

इंग्लिश खाडी आणि जलतरणाबद्दल माहिती

"इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या लोकांपेक्षा एव्हरेस्ट पर्वत सर करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 100 वर्षात केवळ 1,700 लोकांनी इंग्रजी खाडी पार केली आहे."

ही खाडी तिच्यातील बेभरवशाच्या प्रवाहांसाठी ओळखले जाते.जुलैमध्ये खाडीतील पाण्याचे तापमान 18⁰C असते आणि त्यामुळे हायपोथर्मिया होऊ शकतो. जेली फिश आणि समुद्रातील अवशेषांच्या ढिगार्‍याच्या धोक्यांव्यतिरिक्त,ही खाडी जगातील सर्वात जास्त वर्दळ असलेल्या जलमार्गांपैकी एक आहे. या मार्गावरून दररोज 600 हून अधिक टँकर, फेरी आणि इतर जहाजे प्रवास करतात.याशिवाय या भागात  हवामानाची परिस्थिती अचानक बदलते ज्यामुळे पोहण्याचे आगाऊ नियोजन करणे जवळजवळ अशक्य होते.

खाडी जलतरण संघाच्या नियमांनुसार,जलतरणपटू पाण्यातून बाहेर येऊ शकत नाही  किंवा पोहणाऱ्याच्या सोबतीला असलेली पायलट बोट किंवा इतर कोणत्याही बोटीला स्पर्श करू शकत नाही.पोहणाऱ्या व्यक्तीला पायलट बोटीवरील कर्मचाऱ्यांकडून एका लांब काठीचा उपयोग करून अन्न आणि पेय पोहचवले जातात.


S.Tupe/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2039014) Visitor Counter : 83


Read this release in: English