अणुऊर्जा विभाग
54व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड 2024 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची केली कमाई
Posted On:
29 JUL 2024 9:09PM by PIB Mumbai
मुंबई, 29 जुलै 2024
इराणमधील इस्फाहान येथे 21 जुलै ते 29 जुलै दरम्यान झालेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) 2024 मध्ये भारतीय पथकाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व पाचही विद्यार्थ्यांनी 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदके अशी उल्लेखनीय पदकविजेती कामगिरी केली आहे.
पदक विजेतेः
- ऱ्हिदम केडिया(सुवर्ण), रायपूर, छत्तीसगड
- वेद लाहोटी(सुवर्ण), इंदूर, मध्य प्रदेश
- आकाश राज सहाय(रौप्य), नागपूर, महाराष्ट्र
- भव्य तिवारी(रौप्य), नॉयडा, उत्तर प्रदेश
- जयवीर सिंह(रौप्य), कोटा, राजस्थान
भारतीय पथकाचे नेतृत्व प्रो. दीपक गर्ग(डीएव्ही कॉलेज, चंदीगड) आणि डॉ. शिरीष पाठारे(एचबीएसई, टीआयएफआर) यांनी केले. त्यांच्यासोबत प्रो. ए. सी. बियाणी( निवृत्त, गव्हर्न्मेंट नागार्जुन पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, रायपूर) आणि प्रो. विवेक भिडे(गोगटे- जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी) यांनी वैज्ञानिक निरीक्षक म्हणून काम पाहिले. उल्लेखनीय बाब म्हणजे डॉ. शिरीष पाठारे यांना आयपीएचओ 2024 च्या तीन सदस्यीय आंतरराष्ट्रीय बोर्डात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
या ऑलिंपियाडमध्ये पदके मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारत व्हिएतनाम सोबत संयुक्त चौथ्या क्रमांकावर राहिला. चीनने अव्वल स्थान पटकावले. तर रशिया दुसऱ्या क्रमांकावर आणि रुमानिया तिसऱ्या क्रमांकावर राहिले. एकंदर 18 सुवर्ण, 35 रौप्य आणि 53 कांस्य पदके देण्यात आली. 43 देशांमधील एकूण 193 विद्यार्थी या भौतिकशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सहभागी झाले. मात्र, बहुतेक पाश्चिमात्य देश यंदाच्या आयपीएचओपासून दूर राहिले.
या स्पर्धेत पाच तासांच्या सैद्धांतिक परीक्षेत हरितगृह प्रभावामुळे जागतिक उष्म्याचे सामान्य मॉडेल, पॉल ट्रॅपचा वापर करून आयन्स अडवणे आणि डॉपलर शीतकरण तंत्रज्ञान आणि विलिन होत चाललेल्या द्वितारका प्रणालीची गतिशीलता आणि स्थैर्य यावर तीन प्रश्न होते. प्रयोग परीक्षेमध्ये स्पर्धक विद्यार्थ्यांनी पाच तासांमध्ये तांब्याच्या सळीमधून उष्णतेचे वहन आणि टप्प्या टप्प्यातील वक्रीभवन यावर दोन प्रयोग केले.
आयपीएचओमध्ये भारताने सातत्याने चांगली कामगिरी केली असून गेल्या 25 वर्षात 41% सुवर्ण, 42% रौप्य, 11% कांस्य आणि 6% मानद असे यश विज्ञान शिक्षणात उत्कृष्टतेसाठी देशाच्या बांधिलकीला अधोरेखित करत आहे.
गेल्या दशकात, भारतीय विद्यार्थ्यांनी 46% सुवर्ण आणि 52% रौप्य पदके मिळवली आहेत. हे यश भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड विभाग, बाहेरील शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या प्रयत्नांचा दाखला आहे ज्यांनी एचबीसीएसई मधील अभिमुखता आणि परदेश प्रस्थानपूर्व शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. विज्ञान ऑलिम्पियाड्सवरील राष्ट्रीय सुकाणू समिती, शिक्षक संघटना आणि सरकारच्या निधी एजन्सींसाठी ऑलिम्पियाड कार्यक्रमाचे सातत्यपूर्ण भक्कम पाठबळ आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतीय प्रतिभेचे प्रदर्शन करण्यासाठी सक्षम करत आहे.
गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र या विषयांच्या विविध आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षण देणारे मुख्य केंद्र म्हणून एचबीसीएसई काम करत आहे. एचबीसीएसईकडून आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षा अंतिम संघनिवडीसाठी एक प्रवेशद्वार म्हणून काम करत आहेत.
अधिक माहिती या ठिकाणी देखील उपलब्ध आहेः
1. https://www.ipho2024.ir/
2. https://www.ipho-new.org/
3. https://olympiads.hbcse.tifr.res.in/
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038789)
Visitor Counter : 56