शिक्षण मंत्रालय
IIT गोव्याच्या पाचव्या दीक्षांत सोहळ्यात 166 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पीएचडी पदवी मिळवणारी संस्थेची 8 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी ठरली सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य
Posted On:
28 JUL 2024 5:43PM by PIB Mumbai
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोवा या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा पाचवा दीक्षांत समारंभ रविवारी, 28 जुलै रोजी गोव्यात फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात साजरा झाला.
पीएचडी पदवी मिळवणारी संस्थेची 8 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी हे यंदाच्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्यांचे पदवीदान महत्त्वपूर्ण ठरले.
पदवीदान समारंभात एकूण 166 विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 8 संशोधक विद्यार्थी (पीएचडी धारक), 137 बी.टेक. विद्यार्थी आणि 21 एम.टेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी एका ध्वनीमुद्रीत संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित केले आणि पदवीधर विद्यार्थ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले. आयआयटी गोवा ही संस्था, देशापुढील महत्त्वाची महत्वाकांक्षी उद्दिष्टे पूर्ण करण्यात किती महत्त्वाची भूमिका बजावू शकते यावर, तसेच जीवनात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणा घडवून आणणारा आणि शाश्वत भविष्याला चालना देणारा संस्थेचा सक्रीय दृष्टिकोन, यावरही त्यांनी आपले विचार मांडले.
"गोव्याची स्वतःची वेगळी अशी शक्तीस्थळे आणि गरजांशी सुसंगत, संशोधन आणि विकासाची विशेष क्षेत्रे ओळखण्याच्या गरजेवर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर पर्रीकर यांनी कसा भर दिला, " असे सांगून, त्यांनी या आठवणींना उजाळा देत, या संदर्भातील IIT गोव्याच्या एका उपक्रमाचा उल्लेख केला. संस्थेच्या संशोधनात्मक प्रयत्नांवर प्रकाश टाकत त्यांनी नमूद केले, "समुद्र विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील IIT गोव्याचे कौशल्य देखील, समुद्रा वर आधारित उद्योगांच्या वाढीस उत्तेजन देऊ शकते, आर्थिक संधी निर्माण करू शकते आणि स्थानिक समाजांचे जीवनमान सुधारू शकते." केंद्र सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान सचिव प्रा. अभय करंदीकर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. 21 व्या शतकातील गरजांशी मेळ घालून सर्वांगीण, लवचिक आणि बहु-विद्याशाखीय अशा सक्षम शिक्षण प्रणालीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा दृष्टिकोन याविषयी त्यांनी मते मांडली. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अनेक उपक्रमांविषयी त्यांनी माहिती दिली. विशेषतः देशातील संशोधन पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय अनुसंधान प्रतिष्ठानच्या स्थापनेवर त्यांनी भर दिला.
आंतरविद्याशाखीय संकल्पनेनुसार सक्रिय राहून सहयोगी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. रोजगार शोधणारे होण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी रोजगारनिर्मिती करणारे व्हावे, असे आवाहन त्यांनी समारोपाच्या भाषणात केले.
गोवा आयआयटीचे संचालक प्रा. धीरेंद्र कट्टी यांनी 2023-24 वर्षाचा अहवाल सादर केला. पदवी, पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधनात प्रावीण्य मिळवण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जागतिक प्रगती आणि सामाजिक कल्याणासाठी संस्था सतत झटत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नवोन्मेष आणि प्रगती यासाठी आघाडीवर राहण्यासाठी गोवा आयआयटी सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांची आणि दिलेल्या योगदानाची माहितीही अहवालात आहे. सध्या औद्योगिक मंदीचा कल असूनही गोवा आयआयटीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचा प्लेसमेंट दर 93% इतका प्रभावी का आहे याचा ऊहापोह प्रा. कट्टी यांनी केला.
***
S.Patil/A.Save/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038164)
Visitor Counter : 85