माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कारगिल विजय दिवसानिमित्त गोवा येथील आझाद मैदानावर वीर चक्र विजेते कर्नल राजेश शाह यांनी केले छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
Posted On:
26 JUL 2024 5:41PM by PIB Mumbai
गोवा, 26 जुलै 2024
माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय संचार विभाग-गोवा यांनी आयोजित केलेल्या कारगिल युद्धावरील दोन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन वीर चक्र विजेता कर्नल राजेश शाह यांच्या हस्ते आज झाले. कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पणजीच्या आझाद मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग हे देखील उपस्थित होते.
प्रदर्शन उद्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असेल.
O5ZS.jpeg)
कारगिलचा डोंगराळ भाग भारताला परत मिळवून देण्यासाठी जवानांनी पत्करलेले हौतात्म्य आणि युद्ध वीरांचे शौर्य, देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सध्याच्या आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर ते बोलत होते.
कारगिल युद्धात सहभागी होत शौर्य गाजवल्याबद्दल वीर चक्राने सन्मानित झालेले कर्नल राजेश शाह यांनीही उपस्थितांना त्यांचे अनुभव सांगितले.
तत्पूर्वी कारगिलच्या रौप्यमहोत्सवी दिनाचे औचित्य साधून मीरामार बीच ते आझाद मैदानापर्यंत आयोजित सायकल रॅलीला लेफ्टनंट जनरल सिंह यांनी हिरवा झेंडा दाखवला.

कर्नल बाळकृष्ण शिरोडकर आणि लेफ्टनंट कर्नल ऑस्टिन कोलाको यांनी रॅलीचे नेतृत्व केले आणि नंतर आझाद मैदानावर विद्यार्थ्यांना संबोधित केले.
यावेळी एनसीसीचे उपमहासंचालक (कर्नाटक आणि गोवा) एअर कमोडोर अरुण कुमार; ग्रुप कमांडर, एनसीसीचे बेळगावचे कर्नल मोहन नाईक; एनसीसी पणजीचे 1 गोवा बटालियन कमांडिंग ऑफिसर कर्नल जीसस फुर्ताडो आणि गोवा पीआयबी अर्थात पत्रसूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम यावेळी उपस्थित होते.
कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेले लेफ्टनंट कर्नल ऑस्टिन कोलाको यांनी पणजी येथील इंस्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा येथे एका मेळाव्याला मार्गदर्शन केले आणि युद्धातील त्यांचे अनुभव सांगितले. युद्ध कसे लढले गेले आणि प्रत्येक मोहिमेसाठी काय सज्जता केली होती याची माहिती त्यांनी सांगितली. गोव्यातील युवावर्गाला देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन त्यांनी केले.

“सेना दलांना तरुण शूर वीरांची गरज आहे. विशेषतः सीमा भागातील डोंगराळ भागातील मोहिमा राबवताना तरुणांच्या मोठ्या सहभागाची गरज भासते, त्यामुळे सैन्यात अधिकाधिक युवकांची भरती करणे महत्त्वाचे आहे”, असे ते म्हणाले.
एक गोवा बटालियन एनसीसी पणजी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
WN31.jpeg)
कारगिल युद्धातील विविध पैलूंचे दर्शन घडवणारी छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. जवानांनी दाखवलेले शौर्य, भावनिक क्षण आणि युद्धभूमीवरील दृश्यांची छायाचित्रे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असून ती लक्ष वेधून घेतात. आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या वीरांना मानवंदना देण्याबरोबरच ही छायाचित्रे इतिहासातील महत्त्वपूर्ण अध्यायांबद्दल माहिती देऊन प्रदर्शन पहायला आलेल्यांना प्रेरणा देतात.
* * *
PIB Panaji | S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2037628)
Visitor Counter : 50