माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय संचार ब्यूरोची प्रदर्शनी देशभक्तीचे प्रतीक : निवृत्त एअर वाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर


वीएमवी कॉलेजमध्ये प्रदर्शनीचे धूमधडाक्यात उद्घाटन; विद्यार्थ्यांनी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेत दाखविली कला

आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार निवृत्त मेजर जनरल एपी बाम

Posted On: 26 JUL 2024 3:15PM by PIB Mumbai

नागपूर, 26 जुलै 2024

 

भारतामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक तितकाच देशभक्त आहे, जितके की सैन्याचे जवान. फक्त फरक इतकाच आहे की सैन्याच्या जवानांना रोज देशभक्ती दाखविण्याची संधी मिळते. एक सामान्य माणसाला देशभक्ती दाखविण्याची जास्त संधी मिळत नाही. केंद्रीय संचार ब्यूरोच्या 'कारगिल विजय दिवस-रजत जयंती' मल्टी मिडीया छायाचित्र प्रदर्शनी हा भारत सरकारचा उपक्रम आहे, जो सामान्य नागरिकांना देखील आपली देशभक्ती व्यक्त करण्याची संधी देतो.

   

निवृत्त एअर वाइस मार्शल सूर्यकांत चाफेकर (अति विशिष्ट सेवा मेडल, शौर्य चक्र) यांनी शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी केंद्रीय संचार ब्यूरो आणि वर्धमान नगर स्थित वी.एम.वी वाणिज्य, जे.एम.टी कला आणि जे.जे.पी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'कारगिल विजय दिवस- रजत जयंती ' मल्टी मिडीया छायाचित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त केले. नागपूर गुजराती मंडळाचे अध्यक्ष श्री. योगेशभाई पटेल यांनी या समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले. या वेळी केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी सौरभ खेकडे, वीएमवी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अभय मुद्गल हेही उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ. सोनाली भगत यांनी केले. या समारंभात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने आपली प्रतिभा दाखवली.

   

संकटात असताना 'सत्यमेव जयते' लक्षात ठेवा

श्री. चाफेकर यांनी कारगिल युद्धातील आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख करताना अनेक रोचक आणि प्रेरणादायी किस्से शेअर केले. त्यांनी सांगितले की कारगिल युद्धात सैन्याने जमिनीवर अद्भुत धाडसाचे प्रदर्शन करत लढाई लढली, त्याचप्रमाणे वायुसेनेनेही पाकिस्तानी सैन्याच्या शस्त्रास्त्रांवर हवाई हल्ला करत त्यांना नष्ट केले. यामुळे आपल्या सैन्याला युद्ध जिंकण्यात मदत झाली. विद्यार्थ्यांना प्रेरित करताना त्यांनी सांगितले की, जीवनात अनेक प्रसंग असे येतील की ज्यामुळे निराशा येईल, पण आपण सत्याच्या बाजूने असाल तर आपल्या ध्येयापासून घाबरू नका, यश नक्कीच मिळेल. जीवनातील प्रत्येक अडचणीत 'सत्यमेव जयते' हे लक्षात ठेवा.

   

आज विद्यार्थ्यांशी संवाद साधणार निवृत्त मेजर जनरल एपी बाम

या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 27 जुलै रोजी समारोप सत्रात निवृत्त मेजर जनरल एपी बाम (सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल) हे उपस्थित राहून आपल्या विचारांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देतील. या वेळी नागपूर गुजराती मंडळाचे महासचिव अधिवक्ता श्री. संजयभाई ठाकर प्रमुख उपस्थित राहतील. अतिथींच्या हस्ते चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जातील.

 

* * *

PIB Mumbai | S.Khekde/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2037461) Visitor Counter : 39


Read this release in: English