संरक्षण मंत्रालय
पुण्यातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत
Posted On:
25 JUL 2024 3:43PM by PIB Mumbai
पुणे, 25 जुलै 2024
पुण्याच्या सखल भागात पडलेल्या अविरत पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून अशा परिस्थितीत पुण्याच्या नागरी प्रशासनाने केलेल्या विनंतीवरुन लष्कराच्या बचाव आणि मदत कार्य पथकाने एकता नगरच्या दिशेने प्रयाण केले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश असून या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत.

तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून वेळ आलीच तर अगदी कमी वेळात ही पथके आवश्यकता असेल तेथे त्वरित पोहोचू शकतील.भारतीय लष्कराच्या दक्षिणी कमांडमधील अधिकारी नागरी प्रशासन तसेच इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.


आज, 25 जुलै 2024 रोजी स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला प्रभावित भागाकडे तातडीने पाठवण्यात आले. एकूण 85 जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलाला देखील सज्ज राहण्यास सांगितले आहे. या आपत्तीत नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी भारतीय सशस्त्र दले संपूर्णपणे जय्यत तयारीत आणि सुसज्ज आहेत.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2036900)
Visitor Counter : 103