रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील रेल्‍वे प्रकल्‍पांसाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद


2009 ते 14 याकाळातील वार्षिक सरासरी 1171 कोटी रुपयांच्‍या तुलनेत ही तरतूद 13.5 पटीहून अधिक असल्‍याचे रेल्‍वेमंत्र्यांचे प्रतिपादन

बुलेट ट्रेन प्रकल्प प्रादेशिक विकासाला चालना देणारा ठरेल: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Posted On: 24 JUL 2024 9:40PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जुलै 2024

 

2024-25 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 15,940 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आल्याचे रेल्वे, माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील माध्यमांना (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे) संबोधित करताना सांगितले. 2009 ते 14 या कालावधीत महाराष्ट्राला देण्यात आलेल्या वार्षिक सरासरी रु. 1171 कोटी अर्थसहाय्याच्या ते जवळजवळ 13.5 पटीहून अधिक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, आणि मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर इथले इतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाराष्ट्रातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक आपापल्या मुख्यालयात यावेळी उपस्थित होते. मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे, सोलापूर आणि नांदेड येथील माध्यम प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जोडले गेले होते.

माध्यमांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असेही सांगितले की, गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्रात  नवीन लोहमार्ग बांधण्याच्या कामाला गती मिळाली असून, वर्षाला सरासरी 183 किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्यात आले. 2009-2014 दरम्यान बांधण्यात आलेल्या वार्षिक सरासरी 58 किमीपेक्षा ते 3 पट अधिक असल्याचे ते म्हणाले. नवीन रुळांच्या बांधकामाबरोबरच विद्युतीकरण करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांचे आता 100% विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रात सध्या एकूण 1.3 लाख कोटी रुपयांचे काम प्रगतीपथावर असून, त्यापैकी 5877 किमी लांबीचे नवीन लोहमार्ग बांधण्याचे 41 प्रकल्प चालू आहेत. याचा खर्च रु. 81,580 कोटी इतका आहे. यामध्ये नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, आणि गेज रूपांतरण या कामाचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्रातील 128 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रेल्वेची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे, 2014 पासून गेल्या 10 वर्षांत विक्रमी 929 रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरब्रिज बांधण्यात आले.

केंद्रीय मंत्र्यांनी विशेषत: मुंबई विभागातील प्रवाशांचा एकूण प्रवास सुलभ करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांचीही माहिती दिली. यामध्ये येत्या पाच वर्षात सुमारे 250 लोकल सेवांची भर पडेल, तसेच 100 मेल एक्स्प्रेस गाड्यांची भर पडेल. संपूर्ण महाराष्ट्रात होणारा मल्टिपल मेगा टर्मिनसचा विकास, हा भविष्यात महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांमधील विकासाला चालना देईल.

पुणे स्थानकाची सुधारणा, तसेच खडकी, हडपसर, शिवाजी नगर आणि उरळी कांचन, यासारख्या विविध स्थानकांमध्ये पर्यायी कोचिंग टर्मिनसच्या विकासासाठी भविष्यातील नियोजनाचाही या चर्चेमध्ये समावेश होता. केंद्रीय मंत्र्यांनी बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावरही प्रकाश टाकला, जो महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये विविध ठिकाणच्या प्रादेशिक विकासाला चालना देणारा ठरेल.

 

* * *

(स्रोतः जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे मुख्यालय, सीएसएमटी, मुंबई)

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2036602) Visitor Counter : 148


Read this release in: English