कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शेळ्यांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन या विषयावर उत्तर गोव्यातील आयसीएआर-केव्हीके, सीसीएआरआय संस्थेतर्फे व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन

Posted On: 19 JUL 2024 2:55PM by PIB Mumbai

पणजी, 19 जुलै 2024

उत्तर गोव्यातील आयसीएआर-केव्हीके, सीसीएआरआय संस्थेने 9 ते 15 जुलै 2024 या कालावधीत शेळ्यांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन या विषयावर आधारित सात दिवसीय व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गोव्यातील आयसीएआर- सीसीएआरआय संस्थेचे संचालक डॉ.परवीन कुमार यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी गोव्यात शेळी पालनाला असलेले महत्त्व आणि मिळणारा वाव यावर अधिक भर दिला. गोव्यातील प्रचलित कुलागार कृषी व्यवस्थेचा अतिरिक्त घटक म्हणून शेळी पालनाचा समावेश करण्याची सूचना त्यांनी यावेळी मांडली. या जोडधंद्यातून शेतात शेळ्यांचे शेणखत टाकल्यामुळे मातीची सुपीकता आणि पिकातून मिळणारे उत्पादन यात वाढ होण्यास मदत होईलच पण त्याच सोबत शेळीचे मांस आणि दूध यांच्या विक्रीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना पूरक  उत्पन्नाचा स्त्रोत देखील उपलब्ध होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.


केव्हीके अर्थात कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.एन. बोम्मयसामी यांनी शेळ्यांसाठी लागणारा सुका तसेच ओला चारा गवत आणि सायलेज वैरणीच्या रुपात दीर्घकाळ साठवून ठेवण्याच्या तंत्रांवर अधिक भर दिला. शेळीपालनाचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा मिळेल अशा झाडांची शेतात लागवड करण्याच्या सूचना दिल्या. संस्थेतील कृषी-वनीकरण विभागात कार्यरत वैज्ञानिक डॉ.उथप्पा ए.आर. यांनी नारळ तसेच इतर वृक्षारोपण पिकांसोबत चाऱ्याच्या पिकांचा समावेश करण्यासंदर्भात चर्चा केली. किनारपट्टी भागातील हवामानात वाढू शकतील अशा चाऱ्याच्या पिकांच्या उत्पादन पद्धतीबाबत देखील त्यांनी चर्चा केली. गोवा सरकारमधील पशुपालन आणि पशुवैद्यकीय सेवा (एएचव्हीएस) विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. माणिक पाटील यांनी एएचव्हीएसतर्फे राबवण्यात येणाऱ्या शेळी पालनाशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती दिली. शेळ्यांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांच्या लसीकरणासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी सहभागी शेतकऱ्यांना दिला. एसीटीओ (स्थापत्य अभियंता) मदिना सोलापुरी यांनी शेळ्यांसाठी निवारा बांधण्याची प्रक्रिया सांगितली तसेच शेळ्यांसाठी उंचीवरील मचाणे बांधण्यासाठी नारळ सुपारी तसेच बांबू सारख्या कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या लाकडी साहित्याचा वापर करण्याची शिफारस केली. एसीटीओ (फार्म अधीक्षक)विनोद उबरहांडे यांनी यावेळी चाऱ्याच्या झाडांसाठी रोपवाटिका व्यवस्थापन तसेच या झाडांचे व्यवस्थापन या संदर्भात उपस्थितांसमोर सादरीकरण केले. उत्तम आणि अधिक हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतीचे लागवड साहित्य वापरण्याचा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. एसएमएस (कृषी अर्थशास्त्र)राहुल कुमार यांनी अझोला संवर्धन आणि शेळ्यांसाठी पर्यायी पूरक अन्न म्हणून त्याचा वापर याबाबत चर्चा केली.
 

 

डॉ.उधरवार संजयकुमार विठ्ठलराव या पशुशास्त्रातील विषय तज्ञांनी शेळ्यांची हाताळणी, त्यांचे टॅगिंग आणि मायक्रोचिपिंग, कमी खर्चात संपृक्त खाद्य तयार करणे, सायलेज-ओला चारा  तयार करणे, संकरीत नॅपीयर चाऱ्याची लागवड,रक्तविरहित निर्बीजीकरण पद्धत, शेळ्यांच्या पोटातील जंत नाहीसे करणे आणि शेळ्यांना प्रथमोपचार देणे  या संदर्भात प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. शेळ्यांचे प्रजनन सुधारणे, सशक्त पिले निपजणे आणि एकंदर उत्पादकतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या शेळ्यांच्या शास्त्रीय आहाराबाबत देखील त्यांनी यावेळी चर्चा केली. पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.शिरीष नर्नावरे यांनी उपस्थितांशी शेळ्यांमध्ये आढळून येणारे सामान्य विषाणूजन्य तसेच जीवाणूजन्य संसर्गाबाबत चर्चा केली आणि अशा रोगांचे निदान आणि त्यावरील उपचार कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांनी शेळ्यांच्या विषाणूजन्य आणि जिवाणूजन्य संसर्गाची माहिती स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करावेत अशी सूचना त्यांनी दिली.  डॉ. सोलोमन राजकुमार यांनी शेळीच्या मांसातील मूल्यवर्धनावर माहितीपर भाषण सादर केले आणि शेतकऱ्यांनाही ही कृती करण्यासाठी प्रोत्साहित केले.  त्यांनी शेळीच्या दुधाचा औषधी उपयोग आणि शेळीच्या दुधापासून पनीर आणि साबण बनवण्याच्या शक्यतेबाबत माहिती दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ (पशुवैद्यकीय पॅथॉलॉजी), डॉ. सुसिथा राजकुमार, यांनी शेळ्यांसाठी लसीकरण आणि जंतनाशक वेळापत्रकांची तपशीलवार रूपरेषा सांगितली आणि शेतकऱ्यांनी शेळीच्या पिल्लांना आणि प्रौढ शेळ्यांना नियमितपणे जंतनाशक औषधे द्यावी अशी शिफारस केली, तसेच जंतनाशक औषधांमध्ये नियमितपणे बदल करण्याची गरज स्पष्ट केली. वरिष्ठ शास्त्रज्ञ (प्राणी पुनरुत्पादन) डॉ. गोकुळदास पी. पी. यांनी गाभण शेळ्यांची  तसेच प्रजननासाठी वापरले जाणारे बोकड यांची काळजी आणि व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करून शेळ्यांच्या शास्त्रोक्त पुनरुत्पादक व्यवस्थापन याबाबत चर्चा केली.  निरोगी संतती सुनिश्चित करण्यासाठी तसेच जवळच्या नात्यातील प्रजनन रोखण्यासाठी दर दोन वर्षांनी शेळ्यांच्या प्रजननासाठी वापरले जाणारे बोकड बदलण्यासाठी त्यांनी  शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ (मृदा विज्ञान) डॉ. गोपाल महाजन यांनी शेळी खताचा पुनर्वापर आणि मूल्यवर्धन या विषयावर आपले मत मांडले.  वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषी. अर्थशास्त्र) डॉ. श्रीपाद भट यांनी शेळीपालनाच्या अर्थशास्त्रावर भाषण दिले आणि शेळी उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सहभागींनी स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधने वापरावीत अशी शिफारस केली. वरिष्ठ शास्त्रज्ञ (पशु प्रजनन आणि आनुवंशिकी) डॉ. अमिया रंजन साहू यांनी शेळ्यांच्या पैदास व्यवस्थापनाचे महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले आणि शेतकऱ्यांनी किनारी हवामानात चांगली कामगिरी करणाऱ्या कोकण कन्याल, ब्लॅक बंगाल आणि मलबारी सारख्या प्रजातीच्या शेळ्या निवडण्याचे आवाहन केले.

तरुण व्यावसायिक (पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य) डॉ. प्रसस्थ वेमुला यांनी शेळ्यांच्या प्राणीजन्य रोगांचे वर्णन केले आणि शेतकऱ्यांना विशिष्ट प्राणीजन्य रोगांशी संबंधित प्रयोगशाळा चाचण्या ठराविक काळाने करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान, सहभागींनी अल्डोना आणि पारा गावातील तीन शेळी फार्मला भेट दिली, जिथे शेतकऱ्यांनी कोकण कन्याल आणि सिरोही शेळ्यांचे पालनपोषण केले आहे.

समापन समारंभाच्या प्रसंगी, प्रमुख शास्त्रज्ञ (कृषी वनीकरण) आणि प्रभारी संचालक डॉ. ए. रायजादा यांनी सर्व सहभागींना प्रमाणपत्रांचे वाटप केले तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या भविष्यातील शेळीपालन प्रयत्नात भारतीय कृषी संशोधन परिषद -केंद्रीय किनारपट्टी कृषी संशोधन संस्था (ICAR-CCARI) आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञ सेवा वापरण्यास प्रोत्साहित केले आणि  सर्व सहभागी भविष्यात शेळी उद्योजक बनतील यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.उधरवार संजयकुमार विठ्ठलराव, डॉ. एन. बोम्मयासामी आणि डॉ. सुसिता राजकुमार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे निरीक्षण केले. प्रशिक्षण कार्यक्रमात उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यातील बत्तीस ग्रामीण तरुण सहभागी झाले होते, त्यात ३१ पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता.
 
 
S.Kane/S.Chitnis/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2034326) Visitor Counter : 68


Read this release in: English