अणुऊर्जा विभाग

कझाकस्तानमध्ये आयोजित 35 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताची चमकदार कामगिरी

Posted On: 15 JUL 2024 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2024

एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह 35 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (आयबीओ) 2024 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय विद्यार्थी चमूने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

पदकप्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

  • वेदांत सक्रे (सुवर्ण) मुंबई, महाराष्ट्र
  • इशान पेडणेकर (रौप्य), रत्नागिरी, महाराष्ट्र
  • चेन्नई, तामिळनाडू येथील श्रीजीथ शिवकुमार (रौप्य), चेन्नई, तामिळनाडू
  • यशश्वी कुमार (रौप्य) बरेली, उत्तर प्रदेश

35 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड आयबीओ चे आयोजन 7 जुलै ते 13 जुलै 2024 या कालावधीत कझाकस्तानमधील अस्ताना येथे करण्यात आले होते. या विद्यार्थी चमूचे नेतृत्व मुंबईतील टीडीएम प्रयोगशाळेतील  प्रा. शशिकुमार मेनन आणि टाटा मूलभूत शिक्षण संस्थेच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या (एचबीसीएसई) डॉ. मयुरी रेगे या नामवंत तज्ज्ञांनी तसेच आयआयटी बॉम्बेचे डॉ. राजेश पाटकर आणि बडोद्याच्या एम.एस विद्यापीठाचे डॉ. देवेश सुथर या दोन वैज्ञानिक निरीक्षकांनी केले होते.

या वर्षीच्या आयबीओ मध्ये 80 देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 305 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण 29 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. स्पर्धेमध्ये 1.5 तासांच्या चार प्रात्यक्षिक परीक्षा आणि 3.25 तासांच्या दोन लेखी परीक्षांचा समावेश होता. प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये विविध विषयांचा समावेश होता: प्राणी शरीरशास्त्र आणि शरीरविज्ञानशास्त्र, आण्विक जीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जैवमाहितीशास्त्र. या प्रात्यक्षिकांच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये मेंढीच्या डोळ्यांचे विच्छेदन, प्लाझमिड शुद्धीकरण, प्रथिनांचे प्रमाण, संहत पीएच टायट्रेशन, पीसीए आणि अनुक्रम विश्लेषण यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. लेखी परीक्षेत वनस्पती जीवशास्त्र, पेशी जीवशास्त्र, आचारशास्त्र आणि जैववर्गीकरण यासारख्या क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनावर आधारित आव्हानात्मक प्रश्न विचारण्यात आले होते.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आम्ही सर्व भारतीय विद्यार्थ्यांचे आणि उर्वरित भारतीय प्रतिनिधी मंडळाचे अभिनंदन करतो. कझाकस्तानला ऑलिम्पियाडला जाण्यापूर्वी या विद्यार्थ्यांची एचबीसीएसई मध्ये पूर्वतयारी आणि शिबीर घेऊन त्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल देशभरातील शिक्षक आणि मार्गदर्शक तसेच आणि एचबीसीएसई चा जीवशास्त्र ऑलिम्पियाड कक्ष कौतुकास पात्र आहेत. ऑलिम्पियाड उपक्रमासाठी सातत्यपूर्ण पाठबळ दिल्याबद्दल आम्ही राष्ट्रीय सुकाणू समिती, सर्व शिक्षक संघटना आणि सरकारच्या निधी संस्थांचे आभार मानतो.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडशी जोडणारा मूलभूत विज्ञान आणि गणितातील एक प्रमुख राष्ट्रीय ऑलिम्पियाड कार्यक्रम भारतात कार्यरत आहे. एचबीसीएसई हे या कार्यक्रमासाठी देशातील प्रमुख केंद्र आहे. विद्यापीठ पूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांमधील विज्ञान आणि गणितातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

विज्ञान विभागात, खगोलशास्त्र (कनिष्ठ आणि वरिष्ठ स्तर), जीवशास्त्र, रसायनशास्त्र, कनिष्ठ विज्ञान आणि भौतिकशास्त्रातील ऑलिम्पियाड कार्यक्रम प्रत्येक विषयासाठी स्वतंत्रपणे पाच टप्प्यांची प्रक्रिया आहे. प्रत्येक विषयाचा पहिला टप्पा भारतीय भौतिकशास्त्र अध्यापक संघटनेद्वारे (आयएपीटी) इतर विषयांतील शिक्षक संघटनांच्या सहयोगातून आयोजित केला जातो. खगोलशास्त्र (वरिष्ठ स्तर), जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्राचे उर्वरित टप्पे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे (एचबीसीएसई) आयोजित केले जातात. खगोलशास्त्राचे उर्वरित टप्पे (कनिष्ठ स्तर) नॅशनल सेंटर फॉर सायन्स म्युझियम (एनसीएसएम) द्वारे हाताळले जातात. कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाडचे सर्व टप्पे आयएपीटी द्वारे हाताळले जातात.

अधिक माहितीसाठी भेट द्या :


N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2033372) Visitor Counter : 131


Read this release in: English