ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
Posted On:
05 JUL 2024 1:53PM by PIB Mumbai
बीआयएस स्टँडर्ड मार्कच्या गैरवापराबद्दल मिळालेल्या माहितीवर त्वरीत कारवाई करत भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई शाखा कार्यालय-I च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने 28.06.2024 रोजी मेसर्स ब्लू टॅप वर्क्स, गाळा क्रमांक B-902, न्यू सोनल इंडस्ट्रियल इस्टेट, जॉन बेकर्सच्या मागे, साकी विहार रोड, चांदिवली, मुंबई 400072 येथे अंमलबजावणी छापा टाकला. छाप्यादरम्यान असे आढळून आले की ही कंपनी भारतीय मानक ब्युरोच्या परवान्याशिवाय ISI चिन्ह असलेले पॅक केलेले पिण्याचे पाणी तयार करून वितरण करत होती, ही कृती भारतीय मानक ब्युरोच्या चिन्हाचा ठळक गैरवापर आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) कायदा 2016 च्या कलम 17(3) चे उल्लंघन केल्यामुळे या छाप्यादरम्यान, 1 लीटर पेट बाटल्या, 500 मिली पेट बाटल्या तसेच 20 लीटर पेट जारमध्ये पॅक केलेले असे पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.
भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 च्या कलम 17(3) चे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही, अशी शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्याच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
रतीय मानक ब्युरो कायदा, 2016 नुसार, कोणतीही व्यक्ती कोणत्याही वस्तू, माल, प्रक्रिया, प्रणाली किंवा विक्रीसाठी उत्पादन, वितरण, विक्री, भाड्याने, भाडेतत्वावर किंवा प्रदर्शनात किंवा इतर कोणत्याही प्रकारे सेवा, किंवा कोणत्याही पेटंटच्या शीर्षकामध्ये किंवा कोणत्याही ट्रेडमार्क किंवा डिझाइनमध्ये, मानक चिन्ह किंवा त्याचे कोणतेही रंगीत अनुकरण, ब्युरोच्या वैध परवान्याशिवाय वापरु करू शकत नाही. नागरिक पुढील लिंकद्वारे भारतीय मानक ब्युरो कायदा - 2016 नुसार परवानाधारक, विक्रेता इत्यादींच्या दंड आणि कर्तव्य याबाबत जाणून घेऊ शकतात.
(https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2020/12/BIS-Act-2016pdf.)
भारतीय मानक ब्युरो (BIS) ही भारतीय मानक ब्युरो कायदा 2016 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे. मानक निर्धारण, उत्पादन प्रमाणन, प्रयोगशाळा चाचणी आणि प्रणाली प्रमाणन हे भारतीय मानक ब्युरोचे मुख्य कार्य आहे. भारतीय मानक ब्युरो सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार वस्तू पुरवून, ग्राहकांच्या आरोग्याचे धोके कमी करून, पर्यावरणाचे रक्षण करत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत योगदान देत आहे. ग्राहक आणि उद्योगांना फायदा होण्याव्यतिरिक्त भारतीय मानक ब्युरोच्या मानके आणि उत्पादन प्रमाणन योजना उत्पादन सुरक्षा, ग्राहक संरक्षण, अन्न सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, इमारत आणि बांधकाम इ. यासारख्या विविध सार्वजनिक धोरणांना प्रोत्साहन देतात.
याच कारणाने, सर्व ग्राहकांना भारतीय मानक ब्युरो प्रमाणित असलेल्या अनिवार्य उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर ॲप (जे अँड्रॉइड मोबाईल आणि आयओएस दोन्हीवर उपलब्ध आहे) वापरण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे आणि खरेदी करण्यापूर्वी उत्पादनावर आयएसआय मार्कची वास्तविकता तपासण्यासाठी भारतीय मानक ब्युरोचे संकेतस्थळ http://www.bis.gov.in ला भेट देण्याची विनंती केली जात आहे. नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, भारतीय मानक ब्युरोच्या प्रमाणपत्राशिवाय अनिवार्य उत्पादने विकली जात असल्यास किंवा कोणत्याही उत्पादनावर आयएसआय मार्कचा गैरवापर होत असल्यास, त्यांनी प्रमुख, मुंबई शाखा कार्यालय-I, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, 5वा मजला, सीइटीटीएम कॉम्प्लेक्स, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई - 400076 यांच्याशी संपर्क साधावा. अशा तक्रारी hmubo1@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारे देखील केल्या जाऊ शकतात. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल.
स्रोत: भारतीय मानक ब्युरो (BIS), मुंबई शाखा कार्यालय-I
***
Jaydevi.PS/S.Mukhedkar/P.Kor