सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

18 वा राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

Posted On: 29 JUN 2024 8:10PM by PIB Mumbai

 

आज 29 जून 2024 रोजी, भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) प्रादेशिक कार्यालय मुंबई (मैदानी संचालन विभाग) ने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला. हा दिवस भारतातील सांख्यिकी क्षेत्रातील अग्रणी प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीदिनी साजरा केला जातो.

या वर्षाच्या उत्सवाची संकल्पना निर्णय घेण्यासाठी डेटा चा वापरही होती. आजच्या डेटा-चालित जगात, प्रभावी धोरण निर्मितीसाठी डेटाचे विश्लेषण आणि आकलन करण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. या संकल्पनेद्वारे डेटाची साक्षरता आणि सांख्यिकी पद्धतींमध्ये सतत सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

एनएसएसओच्या उपमहानिदेशक सुप्रिया रॉय यांनी आजच्या कार्यक्रमात बीज भाषण केले, ज्यात राष्ट्रीय विकासात सांख्यिकीचे महत्त्व आणि प्रा. महालनोबिस यांचा वारसा त्यांनी अधोरेखित केला. या कार्यक्रमाला भारताच्या वस्त्र आयुक्त रूप राशी उपस्थित होत्या, त्यांनी वस्त्र उद्योगातील डेटाच्या भूमिकेवर आणि धोरणनिर्मितीवर त्याचा परिणाम यावर प्रकाश टाकला. एनएसएसओ चे अधिकारी, बी. एन. बांदोडकर कॉलेजच्या सांख्यिकी विभागातील विद्यार्थी, नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पीपल एज्युकेशन सोसायटी केंद्रीय शाळेचे शिक्षक व विद्यार्थी, आणि वार्षिक उद्योग सर्वेक्षणांतर्गत कारखान्यांचे प्रतिनिधी या उत्सवात सहभागी झाले.

सांख्यिकीच्या सामाजिक-आर्थिक नियोजन आणि धोरणनिर्मितीतील भूमिकेबद्दल जागरूकता वाढवणे, प्रा. पी.सी. महालनोबिस यांच्या योगदानाचे आणि आधुनिक सांख्यिकी पद्धतींवर त्यांच्या प्रभावाचे कौतुक करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी डेटाचे महत्त्व अधोरेखित करणे हे, राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट होते.

एनएसएसओच्या  मुंबई प्रादेशिक कार्यालयाने सांख्यिकी डेटाच्या संकलन कार्यामध्ये उच्चतम दर्जाची अचूकता, पारदर्शकता आणि नैतिक प्रथांचे पालन करण्यात आपली वचनबद्धता पुन्हा स्पष्ट केली. एनएसएसओ आणि त्याच्या प्रादेशिक कार्यालयांच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि त्यांचे कठोर परिश्रम पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती करण्यात आणि राष्ट्रीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

स्त्रोत : राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचे (एनएसएसओ) प्रादेशिक कार्यालय, मुंबई (क्षेत्रीय परिचालन विभाग).

***

M.Pange/G.Deoda/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2029595) Visitor Counter : 56


Read this release in: English