नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नौवहन महासंचालनालयाने साजरा केला ‘भविष्याची दिशा ठरवताना: सुरक्षा सर्वप्रथम’ या संकल्पनेवरील '14वा नाविक दिवस'


चौदाव्या नाविक दिनासाठी ‘सेफटी टिप्स ॲट सी’ मोहिमेचा हॅशटॅग

Posted On: 26 JUN 2024 9:09PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जून 2024

 

भारत सरकारच्या  नौवहन महासंचालनालया अंतर्गत, नॅशनल मेरिटाइम डे सेलिब्रेशन (केंद्रीय) समिती (NMDC), अर्थात राष्ट्रीय नौवहन दिवस समारंभ समितीने मंगळवार 25 जून 2024 रोजी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात '14 वा नाविक दिवस' साजरा केला. आंतरराष्ट्रीय नौवहन संघटनेने (IMO) यंदाच्या नाविक दिनाच्या कार्यक्रमासाठी, ‘नॅव्हिगेटिंग द फ्युचर: सेफ्टी फर्स्ट’ म्हणजेच, भविष्याची दिशा ठरवताना: सुरक्षा सर्वप्रथम”, ही संकल्पना  ‘सेफ्टी टिप्स ॲट सी’ अर्थात ‘सागरी सुरक्षेसाठीच्या सूचना’, या मोहिमेचा हॅशटॅग म्हणून स्वीकारली होती.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या संदेशात, भारतीय खलाशांनी पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी दिलेल्या मोठ्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्याचा विशेष उल्लेख केला. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्र यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात भारत सरकारने खलाशांच्या फायद्यासाठी केलेल्या कामाची माहिती दिली आणि सध्याच्या परिस्थितीत सुरक्षितता आणि संरक्षणाचे महत्त्व सांगितले.

नौवहन महासंचालक आणि नॅशनल मेरिटाइम डे सेलीब्रेशन (केंद्रीय) समितीचे अध्यक्ष श्याम जगन्नाथन यांनी कार्यक्रमाचे बीजभाषण केले. खलाशांचे अभिनंदन करताना त्यांनी नमूद केले की, खलाशांच्या जागतिक पुरवठा साखळीतील भारतीय खलाशांचे प्रमाण 12% वरून 20% च्या पुढे नेण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे.

त्यांनी, महिला खलाशांना किनाऱ्यावर आणि समुद्रामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविधता, समानता आणि समावेशकता आणण्यासाठीचा ‘सागर मे सम्मान’ आणि मानसिक आणि शारीरिक आरोग्याची भावना जागवण्यासाठीचा ‘सागर मे योग’ यासारख्या विविध नवीन उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी ‘सुरक्षा हमेशा-सर्वप्रथम’, दर्जेदार शिक्षण आणि सागरी प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक एलएमएस विकसित करणे, परीक्षेचे अद्ययावत संगणकीकरण आणि डिजिटलायझेशन तसेच तक्रारींचे जलद निराकरण आणि संकट व्यवस्थापन यावर भर दिला.

ऑईल कंपनीज इंटरनॅशनल मरीन फोरम (OCIMF), या सुरक्षित आणि पर्यावरणदृष्ट्या जबाबदार सागरी मोहिमांना प्रोत्साहन देणाऱ्या तेल आणि वायू कंपन्यांच्या जागतिक संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक, कॅप्टन कॅरेन डेव्हिस, या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सागरी प्रवासी आणि सागरी क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांचे अभिनंदन केले, आणि भावनोत्कट आणि विनोदी शैलीत आपल्या जीवनातील अनुभवांचा संदर्भ देऊन, सुरक्षेशी संबंधित सूचना दिल्या आणि मार्गदर्शन केले. त्यांनी नमूद केले की, सागरी क्षेत्रात पुरुष आणि महिला खलाशांसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. त्या म्हणाल्या की, खलाशांनी धाडसी व्हावे, आणि आपल्यापुढील कोणत्याही समस्येबद्दल धैर्याने बोलायला शिकावे. अलीकडच्या काळात सागरी सुरक्षा राखण्यासाठी डीजी नौवहन, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, भारतीय नौदल आणि इतर संघटनांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.

आंतरराष्ट्रीय नौवहन संघटनेचे (IMO) सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेझ यांनी आपल्या संदेशात सांगितले की, नाविक आपल्या कामामध्ये सर्वोच्च पातळीवरील सुरक्षेचा अवलंब करत आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते सदैव तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नॅशनल मेरिटाइम डे सेलीब्रेशनच्या (NMDC) 61 व्या वर्षानिमित्त या समारंभात नौवहन उद्योगावरील तपशीलवार स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डीजी नौवहनच्या अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. यामध्ये खलाशांसाठी सुरक्षितता सुनिश्चित करणे, नाविकांचे अधिकार, सुरक्षिततेसाठी संपर्क आणि अपघाताचे विश्लेषण आणि खलाशांचे प्रमाण 12% वरून 20% पर्यंत वाढवण्याची रणनीती, या आणि इतर मुद्द्यांचा यात समावेश होता.

आपल्या सुप्त प्रतिभेचे दर्शन घडवत, कॅडेट्सनी नौवहन क्षेत्रातील सुरक्षिततेचे महत्त्व सांगणाऱ्या नाटिका सादर केल्या. NMDC ने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या सुमारे 20 गुणवंत उमेदवारांचा सत्कार केला.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2028912) Visitor Counter : 49


Read this release in: English