विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.च्या अद्ययावत मायक्रोबिअल तंत्रज्ञानामुळे शक्य होणार निरोगी मत्स्योत्पादन
Posted On:
25 JUN 2024 4:50PM by PIB Mumbai
गोवा, 25 जून 2024
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद - राष्ट्रीय ओशनोग्राफी संस्था (सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.) ने विकसित केलेले अद्ययावत मायक्रोबिअल संघ तंत्रज्ञान एमसॉर्टिया एल.एल.पी. या केरळातील कोचीन विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठातील अध्यापन मंडळाच्या सदस्यांच्या स्टार्टअपला हस्तातंरित केले आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे मत्स्योत्पादनाच्या शाश्वत पद्धतींना चालना मिळणार आहे.
सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.च्या मायक्रोबिअल संघ तंत्रज्ञानाने मत्स्योत्पादनात आव्हान ठरलेल्या टाकाऊ पाण्यावर प्रक्रियेबाबत परिणामकारक उपाय सुचवला आहे. त्यामुळे उत्पादनात मिळणाऱ्या जलचरांचे आरोग्य राखण्यास मदत होणार आहे. हे नवोन्मेषी तंत्रज्ञान विविध परिसंस्थांमधून सागरी जीवाणू वेगळे करून मत्स्योत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या दर्जाचे व्यवस्थापन करते. सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.च्या संशोधन कार्यक्रमातून विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामागे वैज्ञानिक संशोधनाचा समाजाला लाभदायक व्यावहारिक वापर करण्याचे ध्येय आहे.
तंत्रज्ञान हस्तांतरण करारावर 24 जून 2024 रोजी सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.चे संचालक प्रा. सुनील कुमार सिंह आणि एमसॉर्टिया एल.एल.पी.च्या व्यवस्थापकीय भागीदार डॉ. वृंदा एस. यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सी.एस.आय.आर.च्या ‘एक आठवडा एक संकल्प’ उपक्रमाच्या उद्घाटनादरम्यान करार करण्यात आला. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह, सी.एस.आय.आर.चे महासंचालक व सचिव डॉ. एन. कलैसेल्वी, वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक डॉ. एन. एल. ठाकूर व डॉ. अनास अब्दुलअझीझ, वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. मंदार नानजकर, सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.च्या समन्वय पीठाचे वेंकट कृष्णमूर्ती आणि एमएसऑर्शिआ एल.एल.पी.चे भागीदार के. एस. अभिलाश यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मायक्रोबिअल संघ तंत्रज्ञानात काळजीपूर्वक निवडलेले वेगवेगळे सूक्ष्मजीव एकत्रित वापरले जातात. साधारणपणे 3000 प्रकारच्या सागरी जीवाणूंमधून या सूक्ष्मजीवांची निवड केली जाते. विविध सागरी परिसंस्थांमधून हे सूक्ष्मजीव मिळवून, त्यांना कोची इथे सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.च्या प्रादेशिक केंद्रातील सागरी मायक्रोबिअल संदर्भ सुविधेत ठेवले होते. सूक्ष्मजीवांच्या या संघाने उच्च संप्रेरक उत्पादन केल्यामुळे मत्स्योत्पादनाच्या तळ्यांमध्ली पाण्यात साठलेल्या टाकाऊ पदार्थांच्या जैवविघटनाचा वेग वाढल्याचे दिसून आले. असे विघटन शक्य झाल्यामुळे मत्स्योत्पादनातील घट, रोगराई आणि जलचरांच्या मृत्यूची शक्यता कमी करण्यास मदत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर अधिक चाचणी व पडताळणीसाठी केरळ, कर्नाटक आणि गुजरातेतील कोलंबी उत्पादनाच्या तळ्यांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये या मायक्रोबिअल संघामुळे पाण्याचा दर्जा उंचावतो आणि जल परिसंस्थांचे आरोग्य सुधारते असे दिसून आले.
अशा महत्वपूर्ण तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे सी.एस.आय.आर.-एन.आय.ओ.ची वैज्ञानिक संशोधनाला गती देऊन मत्स्योत्पादनात शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याप्रती वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. तसेच, या संशोधनामुळे मत्स्योत्पादन उद्योगाचे भवितव्य अधिक उत्पादनक्षम व आरोग्यपूर्ण उत्पादनाकडे जाणारे ठरणार आहे.
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028535)
Visitor Counter : 60