माहिती आणि प्रसारण मंत्रालय

नेपाळमधील चित्रपट विकास आणि चित्रपट सेन्सॉर क्षेत्राशी संबंधित तेरा सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईतील केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कार्यालयाला दिली भेट

Posted On: 13 JUN 2024 8:19PM by PIB Mumbai

मुंबई, 13 जून 2024
 

नेपाळच्या चित्रपट विकास मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष भुवन के. सी. आणि नेपाळ सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष गजेंद्रकुमार ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या तेरा सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज मुंबईतील केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. दोन्ही देशांच्या चित्रपट विकास आणि चित्रपट सेन्सॉर व्यवस्थापनाअंतर्गत दृढ कार्यसंबंध विकसित करणे हा या भेटीचा उद्देश होता. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता वत्स शर्मा, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार हे यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता वत्स शर्मा यांनी देशभरातील विविध भाषांमधील चित्रपटांच्या प्रमाणीकरणासाठीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती या शिष्टमंडळाला दिली. चित्रपट प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेदरम्यान चित्रपट निर्मात्यांना मंडळासोबत संवाद साधता यावा यासाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीदेखील त्यांनी यावेळी अधोरेखीत केल्या. यावेळी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता वत्स शर्मा यांनी, थेट मानवी संवाद  कमी राहण्याच्या उद्देशाने  चित्रपट प्रमाणिकरणाच्या प्रक्रियेच्या डिजिटायझेशनसाठी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहितीही या शिष्टमंडळाला दिली. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पृथुल कुमार यांनी देखील या शिष्टमंडळाशी संवाद साधला. चित्रपट निर्मिती क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या संभाव्य संधी आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना नेपाळमध्ये चित्रीकरणासाठी आकर्षित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या जाऊ शकतात याबद्दल त्यांनी शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली.

विविध भारतीय भाषांमध्ये निर्मिती झालेल्या चित्रपटांना पाठबळ पुरवत आणि अशा निर्मितीला प्रोत्साहन देत, चित्रपटांचा दर्जा उंचावणे आणि चित्रपटांच्या माध्यमातून देशातील संस्कृतिक विविधतेला चालना देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ देशात काम करते आहे.यासोबतच देशांतर्गत होणाऱ्या चित्रीकरणासाठी चित्रपट निर्मिती प्रक्रियेशी जोडलेल्या विविध घटकांच्या सेवा उपलब्ध करून देणे, तसेच परदेशी ग्राहकांसाठी ॲनिमेशन क्षेत्रातील सेवा सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठीही राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आपले योगदान देत आहे.तर केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित येत असलेली एक वैधानिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून चित्रिकरण कायदा 1952 (सिनेमॅटोग्राफ कायदा  ) मधील नियम आणि तरतुदींनुसार चित्रपटांच्या सार्वजनिक प्रदर्शनाचे नियमन केले जाते. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने या कायद्या अंतर्गत तसेच 1983 च्या सिनेमॅटोग्राफ (प्रमाणपत्र) नियम आणि केंद्र सरकारने u/s 5(B) अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरत  चित्रिकरण (प्रमाणपत्र) जारी केल्यानंतरच कोणताही चित्रपट आपल्या देशात सार्वजनिकरित्या प्रदर्शित केला जाऊ शकतो.

नेपाळ सरकारने 30 जून 2000 रोजी नेपाळ चित्रपट विकास मंडळाची स्थापना केली होती. नेपाळमधील चलचित्र निर्मिती क्षेत्राला चालना देत त्याचा विकास घडवून आणणे हा या मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश आहे.


N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2025170) Visitor Counter : 34


Read this release in: English