सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
‘नव्या भारताची नवी खादी’ नव्या स्तरावर नेण्याचा संकल्प बळकट करण्याचा खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांचा पुनरुच्चार
Posted On:
12 JUN 2024 10:19PM by PIB Mumbai
मुंबई, 12 जून 2024
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शपथविधीनंतर, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष मनोज कुमार यांनी मुंबईतील केव्हीआयसीच्या मुख्य कार्यालयात आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित केले.
केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धाराला बळकटी देण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ‘नव्या भारताची नवीन खादी’ नव्या स्तरावर नेण्यासाठी आराखडा तयार आहे, असे केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार यांनी नमूद केले.
आज (12 जून 2024) मुंबईतील केव्हीआयसी च्या मुख्य कार्यालयात आयोजित संवाद चर्चासत्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संबोधित करताना केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आपला दृष्टिकोन व्यक्त करताना सांगितले की, गेल्या 10 वर्षात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियान आणि 'वोकल फॉर लोकल' मोहिमेद्वारे 'विकसित भारताच्या उभारणीसाठी' पाया घातला आहे. तिसऱ्या कार्यकाळात 'नव्या भारताच्या नवीन खादी'ला नव्या उंचीवर नेण्यासाठी सरकारने आराखडा तयार केल्याचे उद्धृत करताना भारताचा राष्ट्रीय वारसा असलेली खादी लवकरच जागतिक स्तरावर नव्या भारताची ओळख बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, 2047 पर्यंत 'विकसित भारत'चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केव्हीआयसी प्रत्येक गावात 'खादी ग्राम स्वराज अभियान' मजबूत करण्याच्या योजनेवर काम करत आहे. खादीला स्थानिक वरून जागतिक पातळीवर नेण्यासाठी संपूर्ण रूपरेषा तयार करण्यात आली आहे. खादी ग्रामोद्योग आयोग कारागिरांच्या कौशल्य विकासासाठी विविध योजनांवर काम करत आहे, असेही ते म्हणाले.
खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही एकमेव संस्था आहे जी तळागाळातील दुर्गम भागातील लोकांशी निगडीत आहे आणि सामाजिक एकोपा निर्माण करून लोककल्याणाच्या कामात तत्परतेने प्रगती करत आहे. केव्हीआयसीवर पंतप्रधानांची भिस्त असून आयोग त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सज्ज आहे असे मनोज कुमार यांनी सांगितले.
खादीचे उत्पादन आणि विक्री वाढल्याने ग्रामीण भारतातील कारागीर आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले आहेत.
या कार्यक्रमाला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे आर्थिक सल्लागार तसेच आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2024858)
Visitor Counter : 68