संरक्षण मंत्रालय

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीप्रदान समारंभ संपन्न

Posted On: 08 JUN 2024 5:46PM by PIB Mumbai

 

पुणे, दि. 08 जून 2024

पुण्यातील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात आज, 08 जून 2024 रोजी पदवीप्रदान (स्क्रोल प्रेझेन्टेशन) समारंभपार पडला. या कार्यक्रमात   लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, (परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक,) जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, सदर्न कमांड यांनी एम टेक आणि तांत्रिक प्रवेश योजना (TES) अभ्यासक्रम अधिकाऱ्यांना संबोधित केले.

एकूण 19 अधिकाऱ्यांनी एम टेक अभ्यासक्रम तर आणि 28 अधिकाऱ्यांनी बी टेक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशातील 04 अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याच समारंभाचा एक भाग म्हणून, वैयक्तिक अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी अधिकाऱ्यांना आर्मी कमांडरांकडून विविध पुरस्कार आणि चषक प्रदान करण्यात आले.  लेफ्टनंट कर्नल सुखप्रीत सिंग सलुजा, लेफ्टनंट कर्नल आशित कुमार राणा, लेफ्टनंट निशांत तिवारी आणि लेफ्टनंट चैतन्य श्रीवास्तव या अधिकाऱ्यांनी आपापल्या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवले.

पदवीधर अधिकाऱ्यांना मुख्यतः दुर्गम प्रदेशात राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजेमुळे वाढत्या गुंतागुंतीसह अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, यावर आर्मी कमांडरने आपल्या समारोपाच्या भाषणात भर दिला. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, विद्यार्थी अधिकाऱ्यांना नवीनतम प्रगतीशी सुसंगत राहण्याचे आणि संबंधित अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये सर्वोत्तम अभियांत्रिकी पद्धतींचा समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले.

पदवी प्राप्तीनंतर, हे अधिकारी जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातील आव्हानात्मक भागात सेवा बजावण्यासाठी संबंधित युनिट्सकडे जातील. आणि, ते या भागात सीमा सुरक्षा, बंडखोरी तसेच दहशतवादाच्या समस्येला तोंड देण्यासाठी  लढाऊ अभियांत्रिकी कार्ये सक्रियपणे हाती घेतील. हे अधिकारी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सक्रियपणे योगदान देण्यासाठी तसेच राष्ट्र उभारणीसाठी लष्करी अभियांत्रिकी सेवा, सीमा रस्ते संघटनेद्वारे सुरू असलेले प्रतिष्ठित बांधकाम प्रकल्प देखील हाती घेतील.

***

M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023611) Visitor Counter : 61


Read this release in: English