भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्यातील आयआयटीएम येथे झाले स्ट्रॅटोस्फियर-ट्रॉपोस्फियर इंटरेक्शन्स अँड प्रेडिक्शन ऑफ मॉन्सून वेदर एक्सट्रीम्स (STIPMEX) या विषयावरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन

Posted On: 03 JUN 2024 9:35PM by PIB Mumbai

पुणे, 3 जून  2024

 

पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM) येथे 2-7 जून 2024 दरम्यान स्ट्रॅटोस्फियर-ट्रॉपोस्फियर इंटरॅक्शन्स अँड प्रेडिक्शन ऑफ मॉन्सून वेदर एक्सट्रीम्स (STIPMEX-स्थिरावरण-तपांबर आंतरक्रिया आणि मोसमी पावसाच्या हवामानाचा अतिरेक) या विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

'STIPMEX' या कार्यशाळेचा औपचारिक उद्घाटन कार्यक्रम सोमवार, 3 जून 2024 रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या दूरदृश्य प्रणालीमार्फतच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. आर. कृष्णन, उद्घाटन सोहळ्याचे सन्माननीय अतिथी वातावरणीय प्रक्रिया आणि त्यांची हवामानातील भूमिका (APARC) संस्थेचे संचालक डॉ. रॉल्फ मुलर, WMO जागतिक हवामान संशोधन कार्यक्रम (WWRP) चे प्रमुख डॉ. एस्टेल डी कोनिंग, वातावरणीय प्रक्रिया आणि त्याची हवामानातील भूमिका (APARC) संस्थेच्या वैज्ञानिक सुकाणू गटाचे सदस्य मार्क वॉन होबे उपस्थित होते. 

या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत भारत आणि आशिया, युरोप, अमेरिका व आफ्रिका खंडातील वेगवेगळ्या 30 देशांतील सुमारे 300 प्रतिनिधी सहभागी होत आहेत.  उद्घाटन सोहळ्यादरम्यान गोषवाऱ्याचे ऑनलाइन संकलनही प्रसिद्ध करण्यात आले.

  

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक डॉ आर कृष्णन यांनी सर्व मान्यवर प्रतिनिधींचे आणि परिषदेसाठी आलेल्या विविध 30 देशांतील सहभागींचे हार्दिक स्वागत केले. ही परिषद वातावरण आणि हवामानाच्या वैज्ञानिक समुदायाला एकत्र आणत असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले. डॉ. कृष्णन यांनी नवीन उपक्रमांवर आणि अतिरेकी घडामोडींचा अंदाज वर्तवण्याच्या भविष्यातील मार्गांच्या अंतर्दृष्टीवरही लक्ष केंद्रित केले. 

भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम रविचंद्रन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या उद्घाटनपर भाषणात, हवामानाच्या अतिरेकी घटनांचा अंदाज लावण्यासाठी आशादायी ठरणाऱ्या तंत्रज्ञान आणि तंत्रातील प्रगतीवर प्रकाश टाकला. स्ट्रॅटोस्फेरिक केमिस्ट्री तसेच मान्सूनच्या अतिरेकी घटनांच्या अंदाजावर या कार्यक्रमात लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची देखील माहिती दिली.  स्ट्रॅटोस्फियर-ट्रॉपोस्फियर कपलिंग प्रक्रियेतील अलीकडील बदल किंवा कल, आशियाई उन्हाळी मान्सून आणि स्ट्रॅटोस्फेरिक केमेस्ट्री यावर त्यांनी भर दिला तसेच अतिरेकी हवामानाचा अंदाज वर्तवण्यातील आव्हाने आणि  हवामानातील अतिरेकी घटनांचा अचूक आणि वेळेवर अंदाज वर्तवण्याची गरज यावर प्रकाश टाकला. आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी संमेलनाच्या सफलतेसाठी  शुभेच्छा दिल्या. 

कार्यशाळेच्या पुढील पाच दिवसांत, जगभरातील अनेक तज्ज्ञ  या आणि संबंधित विषयांवर चर्चा करतील आणि जागतिक स्तरावर विविध संस्थांमध्ये ज्ञानाचे आदानप्रदान होईल.   

STIPMEX कार्यशाळेचे तपशीलवार वेळापत्रक https://sparc-extreme.tropmet.res.in/schedule या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

* * *

PIB Pune | S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022704) Visitor Counter : 73


Read this release in: English