विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने राबवल्या जात असलेल्या दीर्घकालीन विस्तारीत कालावधीच्या आरोग्यविषयक देखरेख प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानिमीत्ताने परिषदेकडून 'फिनोम इंडिया अनबॉक्सिंग 1.0' या कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
01 JUN 2024 2:14PM by PIB Mumbai
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) फिनोम इंडिया-सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस या आरोग्यविषयक देखरेख प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा केली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा हा दीर्घकालीन विस्तारीत कालावधीचा पथदर्शी उपक्रम आहे. मैलाचा दगड ठरलेल्या या यशानिमीत्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे येत्या 3 जून 2024 रोजी गोव्यात राष्ट्रीय सागरी परिसंस्था अभ्यास संस्थेत (CSIR-National Institute of Oceanography) 'फिनोम इंडिया अनबॉक्सिंग 1.0' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे (DSIR) सचिव डॉ. एन. कलईसेल्व्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते वार्ताहरांशी संवाद साधतील आणि या प्रकल्पाअंतर्गतच्या आजवरच्या कामगिरीची तपशीलवार माहितीही देतील.
फिनोम इंडिया - सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस या उपक्रमाचा प्रारंभ मागच्या वर्षी 7 डिसेंबर 2023 रोजी झाला होता. भारतीय नागरिकांमधील कार्डिओ मेटाबोलिक (हृदय आणि चयापचय क्रियेसंबधी) आजारांशी संबंधित जोखिमांविषयक बाबींचे अभ्यासपूर्ण मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट परिषदेने समोर ठेवले आहे. या अभिनव उपक्रमात सुमारे 10,000 जणांनी आपली आरोग्यविषयक सर्वंकष माहिती पुरवण्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेत परिक्षणासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. यात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांचा समावेश आहे. त्यांच्याकडून विविध निकषांवर आधारीत अत्यंत व्यापक स्वरुपातील माहितीसाठा संकलीत केला आहे. यात वैद्यकीय स्थितीविषयेची अत्यंत मूलभूत माहितीविषयीची प्रश्नावली, जीवनशैली आणि आहाराच्या सवयी, मानवशास्त्रीय मोजमाप, त्यांच्या शरीररचनेचे इमेजिंग/स्कॅनिंग आणि विस्तृत जैवरासायनिक आणि तसेच आण्विक जैवशास्त्रीय माहितीचा समावेश आहे.
भारतीय नागरिकांमधील कार्डिओ मेटाबोलिक (हृदय आणि चयापचय क्रियेसंबधी) आजारांमुळे वाढत असलेला धोका, त्यांच्याशी संबंधीत जोखिमा यांबाबतची नेमकी वस्तुस्थिती समजून घेणे, महत्वाच्या जोखमांचे स्वरुप निश्चित करणे, या आजार आणि जोखमांना प्रतिबंध करणे आणि त्यासाठी यासर्व मुद्यांशी संबंधीत व्यवस्थापनाकरता नव्या धोरणाची आखणी करणे याकरता, या आजारांमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांमागची प्रक्रिया काय आहे, आणि या आजारांचे प्रमाण वाढण्यामागची कारणे काय आहेत हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या, यांपैकी बहुतांश जोखीमांचे अंदाज व्यक्त करण्याचे सूत्र हे कॉकेशियन नागरिकांमधील साथीच्या आजारांशी संबंधीत माहिती साठ्यावर आधारलेली आहेत. महत्वाचे म्हणजे भारतीयांची वांशिक विविधता, वैविध्यपूर्ण अनुवांशिक रचना आणि आहाराच्या सवयींसह जीवनशैलीशी संबंधीत इतर बाबतीत असलेले वैविध्य लक्षात घेतले तर जोखीमांचे अंदाज व्यक्त करण्याचे हे सूत्र भारतीयांच्या दृष्टीने फारसे अचूक नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ब्रिटनची जैवबँक, चीनची जैवबँक, जपानची जैवबँक, कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिसची (UCLA) अचूकतेचे उदाहरण असलेली आरोग्यविषयक जैवबँक म्हणजे अशी काहीच मोजकी उदाहरणे आहेत, जिथे वैयक्तिक स्तरावरील आरोग्यविषयक उपचार करता यावेत यासाठी आपल्या मोठ्या लोकसंख्येचा माहितीसाठा संकलीत केला आहे. त्यामुळेच भारताच्या दृष्टीनेही आपल्या देशालाच केंद्रस्थानी ठेवून, आजारांमुळे उद्भवणाऱ्या जोखिमांचे अंदाज व्यक्त करणारे सूत्र विकसित करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
या प्रकल्पाअंतर्गत, जीनोमिक्स, मायक्रोबायोम विश्लेषण, प्लाझ्मा प्रोटिऑमिक्स आणि मेटाबोलॉमिक्स अशा बहु आयामी आणि बहु स्तरीय माहितीसाठ्याचे एकत्रीत संकलन करून, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारीत अत्यंत व्यापक माहितीसाठ्याच्या प्रगत विश्लेषक तंत्राची जोड द्यावी, आणि त्याद्वारे अंदाज व्यक्त करू शकणारे प्रारुप विकसित करावे असे उद्दिष्ट वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने समोर ठेवले आहे. यामुळे कार्डिओ - मेटाबॉलिक आजारांशी संबंधित जोखमांचे वैयक्तिक पातळीवरील स्वरुप निश्चित करणे शक्य होऊ शकेल. इतकेच नाही तर एकच प्रारुप हे सगळ्यांना लागू होते, या धारणेतून मुक्त होत नव्या ठोस धोरणाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होऊ शकेल.
यानिमीत्ताने 3 जून 2024 रोजी होणार असलेल्या कार्यक्रमाच्या वेळी या क्षेत्रातील मान्यवरांची तीन प्रमुख व्याख्यानेही होणार आहेत.
• अॅक्सेस हेल्थ इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन. कृष्णा रेड्डी हे कार्डिओ मेटाबोलिक आजारांच्या बाबतीत भारतीयांना उद्भवू शकणाऱ्या जोखीमांचे मूल्यांकन करण्यासाठीची प्रमाणित साधने विकसित करण्याकरता दीर्घकालीन विस्तारीत संशोधन या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
• अशोका विद्यापीठाच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसच्या जैवविज्ञान आणि आरोग्यविषयक संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनुराग अग्रवाल हे "आरोग्यविषयक परिसंस्थेचे डिजिटल परिवर्तनीकरण : माहितीसाठ्याच्या उत्तम परिसंस्थेची गरज या विषयावर संवाद साधणार आहेत.
• गोव्यात बांबोलिम इथल्या, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या एंडोक्रिनोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ. अंकुश देसाई हे 'भारतातील मधुमेहाच्या गोडव्याची समस्या - आजाराची सद्यस्थिती आणि उपाययोजना' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
फिनोम इंडिया प्रकल्प म्हणजे अचूक अंदाज, वैयक्तिक पातळीशी संबंधित, सहभागपूर्ण आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक व्यवस्थेच्या माध्यमातून रुग्णांवर अचूक औषधोपचार करण्याच्या बाबतीत प्रगती साधण्यासाठीच्या प्रयत्नांबाबतची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वचनबद्धतेचे मोठे उदाहरण आहे. भारतीय लोकसंख्येला अनुरूप एक विस्तृत स्वरुपातील फिनोम माहितीसाठा तयार करण्याच्या माध्यमातून, देशभरात इतरत्रही सुरु असलेल्या अशाच प्रकारच्या उपक्रम आणि प्रकल्पांना चालना देणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे आजारांमुळे उद्भवणारे धोके आणि जोखीमांचे अंदाज व्यक्त करणारे सूत्र अधिक अचूक आणि भारतीय नागरिकांच्या वैविध्यपूर्ण अनुवांशिक रचनेचे आणि जीवनशैलीचे प्रतिनिधीत्व करणारे असेल याची सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2022447)
Visitor Counter : 92