विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
फिनोम इंडिया - सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस या राष्ट्रीय स्तरावतील आरोग्यविषयक परिक्षण प्रकल्पाअंतर्गतच्या नमुना संकलनाचा अखेरचा टप्पा गोव्यातील दोना पावला येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय सागरी परिसंस्था अभ्यास संस्थेत सुरू
Posted On:
28 MAY 2024 7:33PM by PIB Mumbai
गोवा, 28 मे 2024
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद [Council of Scientific and Industrial Research (CSIR)] 'फिनोम इंडिया - सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस' [Phenome India-CSIR Health Cohort Knowledgebase - (PI-CHeCK] अर्थात वर्गवारी गटांनुसार आरोग्यविषयक माहितीसाठा संकलित करण्याचा उपक्रम राबवत आहे. भारतीय नागरिकांमधील कार्डिओमेटाबोलिक (हृदय आणि चयापचय क्रियेसंबधी) आजारांच्या वाढत्या प्रमाणाची वस्तुस्थिती समजून घेत, हे प्रमाण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आखता याव्यात हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत विस्तारीत कालावधीसाठी आरोग्यविषयक वर्गवारी गट स्थापन केले जातील, आणि त्याद्वारे असंसर्गजन्य आजार, विशेषत: कार्डिओमेटाबोलिक आजारांच्या घटना आणि त्यांच्याशी संबंधित जोखिमांविषयक बाबींचे अभ्यासपूर्ण मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट परिषदेने समोर ठेवले आहे. या उपक्रमा अंतर्गत गोव्यातील दोना पावला येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय सागरी परिसंस्था अभ्यास संस्थेत कालपासून, नमुने संकलन आणि आरोग्य तपासणी शिबिराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. येत्या २ जून २०२४ पर्यंत हे शिबीर सुरू राहणार आहे. प्राथमिक स्तरावरील माहितीसाठा संकलीत करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा टप्पा असणार आहे.
फिनोम इंडिया - सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस या उपक्रमाचा प्रारंभ मागच्या वर्षी 7 डिसेंबर 2023 रोजी झाला होता. या उपक्रमाअंतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांकडून सुरुवातीच्या पाच वर्षांच्या कालावधीतील आरोग्यविषयक सर्वंकष माहितीसाठा संकलित करण्यावर भर दिला गेला आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रयोगशाळांचे जाळे देशभरात व्यापक स्वरुपात पसरेलेले आहे. या व्यवस्थेचा उपयोग करून घेत या उपक्रमाअंतर्गत विविध राज्यांमधील प्रातिनिधिक नमुने संकलित करता येतील याची सुनिश्चिती परिषदेने केली आहे. आरोग्यविषयक अधिक ठोस आणि विविधांगी स्वरुपातील ज्ञानपुरक माहितीसाठी तयार व्हायला मदत मिळणार आहे.
या उपक्रमांतर्गत जैविक वैशिष्ट्यांवर आधारीत विश्लेषण योग्य तपशीलवार माहितीसाठा तयार करता यावा यासाठी आरोग्य विषयक माहिती आणि त्यासोबत जैविक नमुन्यांचेही संकलन केले जात आहेत. या माहितीसाठ्यामुळे प्रगत संशोधन तसेच भारतातील कार्डिओमेटाबोलिक आजारांशी संबंधित जोखीमांचे वर्गिकरण, जोखीमांना प्रतिबंध आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी नवी धोरणे तयार करण्यात मदत होणार आहे.
या उपक्रमाअंतर्ग नमुना संकलनाचा पहिला टप्पा संपल्यानंतर, त्याविषयी 3 जून 2024 रोजी रोजी सर्वंकष आढावा घेतला जाणार आहे. यात सहभागी असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या प्रयोगशाळांचे समन्वयक तसेच त्यांचे संचालक आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक फिनोम इंडिया - सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रगती आणि निष्कर्षांचे एकत्रितपणे मूल्यमापन करणार आहेत. हा आढावा या उपक्रमाअंतर्गतच्या पुढच्या टप्प्यांसाठी तसेच आरोग्यविषयक माहितीसाठ्याच्या सातत्यपूर्ण परिक्षणासाठीचा पाया ठरणार असून, त्यामुळे या उपक्रमाच्या दीर्घकालीन यशाची सुनिश्चितीही होणार आहे.
या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून पुरावा - आधारित आरोग्यविषयक धोरण आणि उपाययोयना निश्चित करणे तसेच धोरणात्मक आखणीचा मार्ग प्रशस्त करण्याचे उद्दिष्ट वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने समोर ठेवले आहे. यामुळे भारतीय नागरिकांच्या आरोग्याविषयक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडून येईल असा विश्वासही परिषदेने व्यक्त केला आहे.
* * *
PIB Panaji | S.Kane/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 2021992)
Visitor Counter : 55