गृह मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील श्री होर्मुसजी एन. कामा आणि श्री कुंदन रमणलाल व्यास यांना साहित्य आणि शिक्षण (पत्रकारिता) क्षेत्रासाठी , वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. अश्विन बालचंद मेहता यांना आणि कला क्षेत्रासाठी श्री प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले
महाराष्ट्रातील श्री उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा, डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना वैद्यकीय आणि डॉ. शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांना सामाजिक कार्य क्षेत्रासाठी राष्ट्रपतींनी पद्मश्रीने सन्मानित केले
Posted On:
09 MAY 2024 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 9 मे 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत आयोजित नागरिक सन्मान समारंभात महाराष्ट्राच्या श्री होर्मुसजी एन.कामा आणि श्री कुन्दन रमणलाल व्यास यांना साहित्य आणि शिक्षण (पत्रकारिता), डॉ. अश्विन बालचंद मेहता यांना वैद्यकीय क्षेत्र आणि श्री प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांना कला क्षेत्रासाठीच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. राष्ट्रपतींनी श्री उदय विश्वनाथ देशपांडे यांना क्रीडा,डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी आणि डॉ.शंकरबाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पद्मश्रीने सन्मानित केले.
पुरस्कार विजेत्यांचे जीवन आणि कार्य यांचे संक्षिप्त विवरण खाली दिले आहे –
श्री होर्मुसजी एन. कामा
श्री होर्मुसजी एन. कामा हे आशियामधील सर्वात जुने वर्तमानपत्र मुंबई समाचारचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांनी भारतीय भाषांच्या विशेषतः गुजराती भाषेच्या प्रचार-प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दिनांक 13 फेब्रुवारी, 1961 रोजी जन्म झालेल्या श्री कामा यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी मिळवली. 1982 आणि या वर्षाच्या आसपास त्यांनी ब्रिटिश कंपनी लिनोटाइप सोबत संगणकांसाठी गुजराती फॉन्ट्सची रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि गुजराती भाषेत फोटो टाईप सेटिंग शक्य करण्यासाठी गुजराती लिपीत संगणकाचा की-बोर्ड तयार करण्यात आणि त्यानंतर त्या काळात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक कास्ट आयर्न प्लेट्स ऐवजी फोटो-पॉलिमर प्रिंटिंग प्लेटसचा वापर करण्याच्या तत्कालीन आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रिंटिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
श्री कामा यांची अशी धारणा आहे की वर्तमानपत्रांचे वाचन म्हणजे लोकांच्या सकाळच्या नियमित कामांपैकी एक आहे, त्यामुळे ते वाचताना वाचकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले पाहिजे आणि त्याला चांगले वाटले पाहिजे. त्यांनी द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, इंडियन न्यूजपेपर सोसायटी, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन, मीडिया रिसर्च यूजर्स कौन्सिल, रीडरशिप स्टडीज कौन्सिल ऑफ इंडिया, कॉमनवेल्थ प्रेस युनियन इंडिया चाप्टरचे अध्यक्षपद भूषवले आहे आणि नऊ वर्षे भारतीय प्रेस परिषद चे एक नामित सदस्य राहिले आहेत.
श्री कामा यांना भारतीय भाषांच्या प्रसारात योगदान देण्यासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. गुजराती पुस्तक मेळ्यांचे आयोजन करून गुजराती लेखकांच्या पुस्तकांचे वितरण आणि गुजराती नाटकांचे आयोजन करून भाषेच्या वापरासाठी तिचा प्रचार-प्रसार करण्यात ते विशेषत्वाने सक्रिय राहिले आहेत.
*****
डॉ. अश्विन बालचंद मेहता
डॉ. अश्विन बालचंद मेहता प्रख्यात हृदयरोग तज्ञ आहेत, ज्यांची 5 दशकांहून जास्त काळाची उल्लेखनीय कारकीर्द राहिली आहे.
3 मार्च 1939 रोजी जन्म झालेले डॉ. मेहता सर्व परीक्षांमध्ये एक प्रतिभावान विद्यार्थी राहिले आहेत. त्यांनी एमडी आणि एमबीबीएस परीक्षांमध्ये 19 सुवर्णपदके तसेच विशेष योग्यता प्राप्त केली आहे. त्यांनी 1967 पासून 30 वर्षांहून अधिक काळ सायन जनरल हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत सेवा प्रदान केली. त्यांनी सायन हॉस्पिटल, महावीर हार्ट फाऊंडेशन, यूएन मेहता हॉस्पिटल, अहमदाबाद आणि राजकोट, पोरबंदर, कोल्हापुर, दापोली आदि ठिकाणी मोफत तपासणी शिबिरे आयोजित केली आणि रुग्णांवर मोफत उपचार केली; तसेच स्थानिक डॉक्टरांना एन्जियोप्लास्टी तंत्रज्ञान देखील शिकवले. त्यांनी शेकडो पदवीधर आणि पदव्युत्तर डॉक्टरांना कार्डियोलॉजीचे शिक्षण दिले आहे.एंजियोप्लास्टीच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांना फ्रान्स, जपान,चीन,इटली,अमेरिका,श्रीलंका आणि सिंगापूरमध्ये शिक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.एलटीएमजी सायन रुग्णालयात,आपल्या कार्यकाळात त्यांनी हजारो रुग्णांवर मोफत उपचार केले आणि कार्डियोलॉजीच्या उच्च-स्तरीय तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्यावर उपचार केले आहेत. त्यांनी जसलोक आणि एलटीएम मेडिकल कॉलेज, मुंबई या दोन्ही रुग्णालयात अत्याधुनिक हृदय विभाग स्थापन केले.
आपल्या उल्लेखनीय कारकिर्दीदरम्यान, डॉ. मेहता यांच्या नावे अनेक कामगिरींची नोंद आहे.ते असे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी 1973 मध्ये पहिली ऍन्जियोग्राफी आणि 1988 मध्ये एंन्जियोप्लास्टी; 1973मध्ये नवजात शिशुंची पहिल्यांदा कॅथेटेरायजेशन प्रक्रिया; 1974-75 मध्ये पहिली बंडल इलेक्ट्रोग्राफी; महाराष्ट्रात 2 डी-इकोकार्डियोग्राफी सुरू केली. त्यांनी तीव्र मायकोकॉर्डियल इन्फेक्शनमध्ये प्राथमिक एन्जियोप्लास्टी सुरू करण्यात अग्रणी भूमिका बजावली आणि 1993 मध्ये याच विषयावर पहिला पेपर प्रकाशित केला. ते 2002 मध्ये भारतात मेडिकेटेड ड्रग एल्यूटिंग स्टेंट प्रत्यारोपण करणारे पहिले व्यक्ती आहेत, परक्यूटेनियस कार्डियो-पल्मनरी सपोर्ट असिस्टेड एन्जियोप्लास्टी सुरू करणाऱ्या अग्रणी लोकांमध्ये त्यांचा समावेश आहे आणि 2013 मध्ये पश्चिम भारतात ट्रान्स-कॅथेटर एओर्टिक व्हाल्व रिप्लेसमेंट करणारे ते पहिले व्यक्ती आहेत.
डॉ.मेहता यांनी कार्डियोलॉजी आणि मानव सेवेतील आपल्या योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. हे पुरस्कार आहेत 2004 मधील पद्मश्री पुरस्कार; 2004 मधील महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र गौरव पुरस्कार; एंड्रियास ग्रुएन्त्जिंग मेमोरियल अवॉर्ड; नवी दिल्लीत एआईसीटी 2012 मध्ये गोल्डन कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड; मुंबईत प्रथम आईजेसीटीओ मीटमध्ये जीवनगौरव पुरस्कार; सीएसआय संमेलन 2018 मध्ये आणि आशिया पॅसिफिक व्हॅस्क्युलर इंटरवेंशन कूस सोसायटीद्वारे जीवनगौरव पुरस्कार; कंटीन्युअस मेडिकल एजुकेशन ऍवार्ड ऍन्ड समिट 2019 द्वारे "द्रोणाचार्य ऑफ इंटरवेंशनल कार्डियोलॉजी" पुरस्कार; 2020 मध्ये जसलोक हॉस्पिटल ऍन्ड रिसर्च सेंटरचे विश्वस्त आणि व्यवस्थापनाकडून पहिला जसलोक रत्न पुरस्कार; टाईम्स हेल्थकेयर लीडर्स अवार्ड, 2021 मध्ये कार्डियोलॉजीत उत्कृष्टता पुरस्कार; कार्डियोलॉजी क्षेत्रात प्रशंसनीय योगदानासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने विशेष पुरस्कार.
*****
श्री प्यारेलाल रामप्रसाद शर्मा
प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या जोडीतील एक श्री प्यारेलाल रामप्रसाद शर्मा भारतीय चित्रपट संगीतातील सर्वात प्रसिद्ध व्हायोलिन आणि पियानोवादकांपैकी एक मानले जातात. त्याशिवाय ते चित्रपट विश्वातील सर्वात यशस्वी संगीतकार आणि दिग्दर्शकांपैकी एक आहेत.
3 सप्टेंबर 1940 रोजी जन्म झालेले श्री प्यारेलाल शर्मा प्रसिद्ध ट्रंपेट वादक पंडीत रामप्रसाद शर्मा यांचे पुत्र आहेत, ज्यांनी गोव्याचे प्रसिद्ध व्हायोलिन वादक श्री ऍन्थनी गोन्साल्विस यांच्यासोबत त्यांना व्हायोलिन वादनाचे बारकावे शिकवले.
श्री प्यारेलाल शर्मा यांनी दिवंगत श्री लक्ष्मीकांत यांच्या साथीने 1950 च्या दशकापासून 2000 च्या दशकापर्यंत, 6 दशकांहून अधिक काळ सक्रीय राहात संगीत दिले. त्यांनी 800 पेक्षा जास्त हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आणि प्रत्येक दशकात ब्लॉकबस्टर संगीत दिले. त्यांचे संगीत दिग्दर्शन असलेला पारसमणी हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधील “वो जब याद आये'’ आणि “हंसता हुआ नुरानी चेहरा” ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. यानंतर बाद राजश्री प्रॉडक्शनचा चित्रपट "दोस्ती" (1964) ची गाणी "चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे” आणि “राही मनवा” देखील याच मार्गावर चालली. या जोडीला "दोस्ती" साठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
दिवंगत श्री लक्ष्मीकांत यांच्या साथीने श्री प्यारेलाल शर्मा यांनी मिलन, शागीर्द, इन्तकाम, दो रास्ते, जीने की राह, शोर, बॉबी, रोटी कपड़ा और मकान, सत्यम् शिवम् सुंदरम, अमर अकबर ऍन्थनी, सरगम, कर्ज़, एक दूजे के लिए, तेज़ाब, उत्सव यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिले. दिग्गज गायिका लता मंगेशकर आणि मोहम्मद रफ़ी यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक अनुक्रमे 712 आणि 379 गाणी त्यांच्यासाठी गायली आणि किशोर कुमार तसेच आशा भोसले यांनी अनुक्रमे 402 आणि 494 गाणी त्यांच्यासाठी गायली जी कोणत्याही संगीतकारासाठी गायलेल्या गाण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी मुकेश, मन्ना डे आणि महेंद्र कपूर यांच्यासारखे दुसरे प्रमुख गायक आणि अलका याज्ञिक, उदित नारायण, के.जे.येसुदास, एसपी बालसुब्रमण्यम, अनुराधा पौडवाल यांच्यासारख्या आजच्या आजच्या गायक-गायिकाच्या गाण्यांना देखील संगीत दिले. 250 पेक्षा जास्त चित्रपटांना प्रसिद्ध गीतकार आनंद बख्शी यांच्या सोबत मिळून त्यांनी हिंदी चित्रपटातील काही सर्वाधिक लोकप्रिय गीते दिली.
84 वर्षांच्या वयात श्री प्यारेलाल शर्मा सर्वोत्तम युवा आयकॉन प्रमाणे आजही पूर्वीसारखेच प्रासंगिक आणि ऊर्जावान आहेत. जगभरात आपल्या अनेक मेगा- ब्लॉकबस्टर स्टेज शो व्यतिरिक्त त्यांनी एक सिम्फनी, 'ओम शिवम' #1 आणि #2 ला संगीत दिले, जे 4 जून 2016 रोजी जर्मनीत लिपझिगमध्ये एमडीआर क्लासिकच्या जागतिक दर्जाच्या संगीतकारांनी सादर केले.
श्री प्यारेलाल शर्मा यांनी दिवंगत लक्ष्मीकांत यांच्या सोबत दोस्ती, मिलन, जीने की राह, अमर अकबर ऍन्थनी, सत्यम शिवम सुंदरम, सरगम, कर्ज़ यासाठी आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम संगीतासाठीचे सर्वाधिक 7 फिल्मफेयर पुरस्कार मिळवले आहेत आणि सर्वाधिक 25 वेळा नामांकन मिळवले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांनी अमर अकबर ऍन्थनी, सत्यम शिवम सुंदरम, सरगम आणि कर्ज़ या चित्रपटांसाठी लागोपाठ फिल्मफेयर पुरस्कार मिळवले.
*****
श्री कुन्दन रमणलाल व्यास
श्री कुन्दन रमणलाल व्यास हे जन्मभूमी वर्तमानपत्र समूहाचे मुख्य संपादक आहेत. भारताच्या स्वतंत्रता समराच्या काळात दूरद्रष्टे स्वातंत्र्य सेनानी अमृतलाल सेठ यांच्या द्वारे सुरू करण्यात आलेली ही वर्तमानपत्रे स्वातंत्र्य लढ्यात बिनीचे शिलेदार होती. या वर्तमानपत्र समूहात मुंबईतून प्रकाशित होणारे जन्मभूमी (90 वर्ष), राजकोटमधून प्रकाशित होणारे (102 वर्ष), भुजमधून प्रकाशित होणारे कच्छमित्र (75 वर्ष), आणि देशातील पहिले अर्थ विषयक वर्तमानपत्र व्यापार (गुजराती आणि हिंदी) यांचा समावेश आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांचा सहा दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रतिष्ठित व्यापारी संघटनांशी त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत.
5 डिसेंबर 1941 रोजी जन्म झालेल्या व्यास यांनी मुंबई विद्यापीठातून मानवता आणि विधी या विषयात पदवीचे शिक्षण प्राप्त केले होते. त्यांना पत्रकारितेत रस होता आणि त्यांनी 1961-62 या वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. ते 1964 या वर्षात जन्मभूमी समूहात सामिल झाले होते. 1967 सालात नवी दिल्लीतील जन्मभूमी न्यूज ब्युरोच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तीन दशकांहून अधिक काळासाठी त्यांना अगदी जवळून राजकारणातील घडामोडी, आर्थिक आणि सामाजिक विकासाचा साक्षीदार बनण्याची आणि या क्षेत्राचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली. त्यांचे दैनंदिन राजकीय समालोचन “दिल्ली दरबार” वाचकांमध्ये फारच लोकप्रिय होते.
1969 सालात झालेल्या राजकीय उलथापालथीचेही व्यास साक्षीदार होते आणि त्यांनी याचे वार्तांकन देखील केले होते. त्यांच्या वार्तांकनाने राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला. 1971 मध्ये झालेल्या युध्द काळात त्यांनी युद्ध बातमीदार म्हणून काम केले. त्यांनी भारतात आणि परदेशात आयोजित महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संमेलनाचे वार्तांकन केले होते. त्यांना “दीर्घ आणि विशिष्ट सेवेसाठी” संसदेची मान्यता प्राप्त झाली होती. ते लोकसभेच्या (1978-1980) पत्रकार कक्ष सल्लागार मंडळाचे सदस्य होते. ते लोकसभेच्या (1993-94) माननीय अध्यक्षांद्वारे नियुक्त पत्रकार सल्लागार समितीचे संयुक्त सचिव देखील होते. 1996 मध्ये त्यांना जन्मभूमी वर्तमानपत्र समूहाच्या मुंबई येथील समूह संपादक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
आपल्या समृद्ध अनुभवातून त्यांनी गुजराती भाषेत काही पुस्तके लिहिली आहेत, जसे की, "कारगिल कथा अने व्यथा": एका युद्ध बातमीदाराच्या रूपात आपल्या अनुभवावर आधारित; "दिल्ली दरबार – नेहरू थी नरेन्द्र मोदी" : ऐतिहासिक आणि राजकीय घटनांचे दोन खंड, आणि "एक पत्रकार नी व्यवसाय कथा : एका पत्रकाराची आत्मकथा“. ते भारतीय पत्रकार परिषदेचे सदस्य (2004-2011) आणि (2014-2017), भारतीय भाषा समाचार संघाचे अध्यक्ष (2003-2005), भारतीय वर्तमानपत्र सोसायटीचे अध्यक्ष (2010-2011) तसेच एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य होते.
व्यास यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी गौरवण्यात आले आहे, ज्यामधे संयुक्त राष्ट्र मुख्यालय, न्यूयॉर्क यांची डेग हॅमर्स्कजॉल्ड शिष्यवृत्ती (1976), लोकमान्य टिळक पुरस्कार (2014), डॉ. हरिवंशराय बच्चन पत्रकार पुरस्कार (2003) आणि प्रियदर्शिनी पुरस्कार (1999) प्रमुख आहेत.
*****
श्री उदय विश्वनाथ देशपांडे
श्री उदय विश्वनाथ देशपांडे ‘मल्लखांब विश्व गुरू’ या नावाने प्रसिद्ध आहेत. ते मुंबईत दादर येथील श्री सैनार्थ व्यायाम मंदिर या 98 वर्ष जुन्या अति प्रतिष्ठित, अग्रणी शारीरिक शिक्षण संस्थेत गेल्या 42 वर्षांपासून मानद महासचिव आणि मुख्य प्रशिक्षक आहेत. ते जागतिक मल्लखांब संघाचे व्यवस्थापक संचालक आणि मानद सचिव देखील आहेत. या संघाच्या माध्यमातून त्यांनी दोन मल्लखांब जागतिक स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत 15 देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. अन्य देशात राष्ट्रीय मल्लखांब संघ सुरू करण्यात ते महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत.
20 जुलै 1953 रोजी जन्माला आलेल्या देशपांडे यांनी सीमा शुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात सेवा बजावली आणि 2013 मध्ये उपायुक्त पदावरून ते सेवानिवृत्त झाले. शैशवावस्थेपासूनच त्यांचा कुस्ती आणि मल्लखांब या क्रीडा प्रकारांकडे विशेष ओढा होता. भारतातून लोप पावत असलेल्या मल्लखांब या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी ते संपूर्ण वेळ समर्पित आहेत. मल्लखांब हा व्यक्ती, समुदाय आणि समस्त मानवजातीला स्वस्थ, निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्यासाठी सहाय्यक आहे, ही मल्लखांब या क्रीडा प्रकाराची क्षमता त्यांनी खूप आधीच जाणली होती. वयाची 18 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी मल्लखांब या क्रीडा प्रकाराला पुनरुज्जीवित करुन प्रोत्साहन देण्याचा प्रण केला होता आणि या दिशेने त्यांनी संपूर्ण मनोयोगाने अथक परिश्रम देखील केले.
50 वर्षांच्या काळात देशपांडे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, भारतातील प्रत्येक राज्याचा दौरा केला आणि सर्व सामाजिक आणि आर्थिक समूहांसाठी हजारो मल्लखांब कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. ऐवढेच नाही तर ते समाजाच्या शेवटच्या स्तरावर असलेल्या व्यक्तींपर्यंत देखील पोहोचले आहेत. 52 हून अधिक देशातील 1000 हून अधिक मल्लखांब चाहत्यांना प्रशिक्षण देण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी आशिया, युरोप आणि अमेरिका या तीन खंडांचा दौरा करून अनेक मल्लखांब कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. त्यांनी देशभरात केवळ मल्लखांब केंद्रांची स्थापना केली नाही तर मल्लखांबाचे प्रशिक्षण आणि सूचनांसाठी नियम पुस्तिका तयार करून मानकीकृत प्रशिक्षण देखील सुनिश्चित केले. त्यांनी या क्षेत्रात संशोधनाचा प्रारंभ केला आणि शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार केला. त्यांनी मल्लखांब या विषयावर अनेक भाषांमध्ये प्रचुर लेखन केले आहे. या क्षेत्रातील त्यांच्या योगदानात बारीक दस्तऐवज निर्माण प्रक्रिया आणि एका कार्य संस्थेची निर्मिती यांचा समावेश असून याचा लाभ भारताच्या भावी पिढ्यांना होणार आहे. यामध्ये मल्लखांबाची आंतरराष्ट्रीय “नियम पुस्तिका” आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धांमध्ये निर्णय संबंधातील मानदंड निर्धारित करणे यांचा समावेश आहे.
देशपांडे यांनी अनेक सीमा भेदून हे काम केले आहे. प्रौढांना आणि जेष्ठ नागरिकांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देणारे ते पहिले व्यक्ती आहेत. पुरुष प्रधान क्रीडा प्रकारात मुली आणि महिलांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पारंपरिक रितीने पुरुषांचा क्रीडा प्रकार मानला गेलेल्या मल्लखांबात महिलांनीही आपला हात आजमावावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी दृष्टीहीन, दिव्यांग मुले, अनाथ आणि आदिवासींनाही मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले. याप्रकारे ते या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा लोकांपर्यंत देखील पोहोचले ज्यांच्याशी संपर्क साधणे कठीण होते. भारत सरकार, भारतीय ऑलिम्पिक संघ आणि भारत सरकारचे रेल्वे मंत्रालय यांच्याकडून मल्लखांबाला क्रीडा प्रकाराच्या रुपात मान्यता मिळावी यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांनी एका मल्लखांब अर्जुन पुरस्कार विजेत्यासह 15 शिव छत्रपती पुरस्कार विजेते, 3 शिव छत्रपति सर्वश्रेष्ठ प्रशिक्षक पुरस्कार विजेते यांना मार्गदर्शन केले आहे.
देशपांडे यांनी मल्लखांबासारख्या पारंपरिक व्यायाम प्रकाराला खेळाचे स्वरूप मिळवून देण्याचे काम केले. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल सामान्य लोकांना फारच कमी माहिती होती आणि आज मात्र त्यांच्या कार्याला जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे. मल्लखांब या क्रीडा प्रकाराला 50 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये आयोजकाच्या रुपात मिळालेले शिव छत्रपती पुरस्कार, सर्वश्रेष्ठ प्रशिक्षकाला दिला जाणारा दादोजी कोंडदेव पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकार द्वारे प्रदान केला जाणार जीवन गौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.
*****
डॉ चंद्रशेखर महादेवराव मेश्राम
डॉ. चंद्रशेखर महादेवराव मेश्राम हे प्रतिभावान मेंदू विकार तज्ज्ञ आहेत. क्लिनिकल न्युरोलॉजी, सार्वजनिक आरोग्य जागृती, शैक्षणिक नेतृत्व, संशोधन, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेले हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे.
9 जुलै 1954 ला जन्म झालेले डॉ. मेश्राम यांनी नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आणि चंदीगड इथल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इथून एम डी (मेडिसिन) आणि डी एम (न्युरोलॉजी) पदवी प्राप्त केली. न्युरोलॉजिस्ट आणि नागपूरच्या ब्रेन अॅन्ड माइंड संस्थेचे संचालक म्हणून सध्या ते काम पाहतात. बँकॉक, मराकेश, स्टॉकहोम, व्हिएन्ना, सेन्टीयागो, क्योटो आणि दुबई मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्युरोलॉजी (डब्ल्यूएफएन)च्या प्रतिनिधी परिषद बैठकीत ते राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते. डब्ल्यूएफएनचे संविधान आणि उपनियम समिती आणि वैज्ञानिक कार्यक्रम समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. डब्ल्यूएफएनच्या उष्णकटिबंधीय आणि भौगोलिक न्युरोलॉजी स्पेशालिटी गटाचे विश्वस्त आणि अध्यक्ष ही उच्च पदेही त्यांनी भूषवली आहेत. 123 सदस्य देश असलेल्या या प्रतिष्ठीत शैक्षणिक संस्थेत 65 वर्षात विश्वस्त म्हणून काम करणारे ते पहिले भारतीय न्युरोलॉजिस्ट आहेत. 2013-14 मध्ये इंडियन अॅकाडमी ऑफ न्युरोलॉजीचे ते राष्ट्रीय अध्यक्ष होते.
डॉ मेश्राम यांना सार्वजनिक आरोग्य शिक्षण आणि जागृतीपर कार्यक्रम यामध्ये विशेष रुची आहे. मस्तिष्काघात, अपस्मार, स्मृतीभंश, कंपवात, ऑटीझम, डोकेदुखी, मस्तिष्क संसर्ग यासारख्या आजारांवर गेल्या अनेक वर्षांपासून ते बैठका, रेडीओ- संवाद, दूरचित्रवाणी, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्याख्याने आणि वर्तमानपत्रांमधल्या लेखांच्या माध्यमातून जागृती करत आहेत. जनजागृती करणारे 400 लेख त्यांनी प्रकाशित केले आहेत. WFN-IAN न्युरो संसर्ग वेबीनार शृंखला या शैक्षणिक उपक्रमाचे ते अभ्यासक्रम संचालक आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा यांचे आयोजन त्यांनी केले असून गेली 11 वर्षे त्यांनी दरवर्षी 6 विषयांवर सीएमई आयोजित केल्या आहेत. आशियाई गरीब देशांमधल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी भारतात प्रशिक्षणासाठी न्युरोलॉजी विभागाला भेटी सुरु केल्या.
eNeurologicalSci या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाचे ते सहाय्यक संपादक आणि न्युरोसायन्स विश्वकोशाचे विभाग संपादक आहेत. नियतकालिकांमध्ये त्यांची 63 प्रकाशने आहेत. 18 आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन चाचण्यांसाठी ते प्रमुख अन्वेषक होते आणि या आधारावर अपस्मार आणि कंपवात या आजारावरच्या उपचारांसाठी दोन नव्या औषधांना अमेरिकेच्या ‘एफडीए’ची मंजुरी मिळाली. बाबा आमटे यांची महारोगी सेवा समिती, विदर्भ साहित्य संघ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, नागपूरचे ते विश्वस्त आहेत. गरीब प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबरोबरच निवासी कला शिबिरांकरिता विद्यार्थ्यांसाठी ते पुरस्कर्ताही राहिले आहेत. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे ते संस्थापक अध्यक्ष असून या माध्यमातून त्यांनी नागपूरमध्ये सहा ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, चित्रपट रसग्रहण कार्यशाळा, दोन भारतीय चित्रपट महोत्सव आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 2018 मध्ये नागपूर महापालिकेद्वारा स्वच्छ भारत अभियानासाठी ते नागपूरचे सदिच्छादूत होते.
डॉ. मेश्राम अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत, ज्यामध्ये प्राप्तीकर विभागाचा ‘सन्मान’ पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना’ पुरस्कार, ‘इन्स्पायरिंग न्युरोलॉजिस्ट ऑफ द कंट्री’ पुरस्कार, ‘प्रोफेशनल आयकॉन ऑफ विदर्भ’ पुरस्कार, आरोग्य सुश्रुषा सर्वोत्कृष्टतेसाठी ‘लोकमत टाईम्स असामान्य योगदान’ पुरस्कार, ‘डॉ. वानकर सुवर्ण पदक’ आणि इंडियन अॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीद्वारे ‘आयएमए’ आणि ‘एफआयएएन जीवन गौरव’ पुरस्कार यासारखे सन्मान समाविष्ट आहेत.
डॉ शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर
डॉ. शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाज, विशेषकरून दिव्यांग आणि निराधार मुलांसाठी समर्पित केले आहे.
14 फेब्रुवारी 1942 मध्ये जन्मलेल्या डॉ. पापळकर यांनी दिव्यांगाना आश्रय देण्यासाठी एक अनोखे मात्र अतिशय खडतर काम हाती घेतले. 1990 मध्ये अमरावती शहरापासून 50 किलोमीटरवर असलेल्या वज्जर या लहानश्या शहरात त्यांना 25 एकर जमीन मिळाली. या ओसाड जमिनीवर त्यांनी ‘दिव्यांग आणि निराधार मुलांसाठी स्वर्गीय अंबादासपंत अनाथालय’ सुरु केले. सुरवातीला आश्रमात देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या केवळ चार दिव्यांग मुली होत्या. पापळकर यांनी या चारही मुलींना आश्रमात आश्रय दिला आणि तेव्हापासून समाजकल्याणाचे हे व्रत सुरु झाले.
आज त्यांच्या आश्रमात 98 मुली आणि 25 मुलगे आहेत. डॉ पापळकर यांनी या मुलांना आश्रय तर दिलाच पण त्याचबरोबर त्यांना त्यांची ओळखही दिली. आज आश्रमातल्या या 123 मुलांची आधार कार्ड आहेत, ज्यावर पित्याचे नाव डॉ. शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर लावले आहे.
डॉ. पापळकर यांनी या मुलांचे केलेले संगोपन म्हणजे समाजापुढे घालून दिलेले एक आदर्श उदाहरण आहे. या सर्व मुलांची जबाबदारी निभावतानाच त्यांनी आणखी एक कार्य केले आहे, आश्रमातल्या विवाह योग्य मुला-मुलींना जीवनाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी सामाजिक व्यवस्थेच्या आधारे चांगल्या कुटुंबात त्यांचे विवाह केले. आतापर्यंत त्यांच्या 21 मुली आणि 3 मुलांची लग्ने थाटामाटात आणि जनसहभागाने झाली आहेत. त्यांच्या आश्रमात वाढलेल्या 12 मुलांना सरकारी नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. आश्रमातली सर्व 123 दिव्यांग मुले प्रधानमंत्री जनधन योजनेची लाभार्थी आहेत.
1990 मध्ये वैराण जमिनीवर सुरु झालेला हा आश्रम आज सुमारे 15,000 हिरव्यागार झाडांनी बहरला आहे, डॉ. पापळकर या 123 दिव्यांग मुलांच्या मदतीने या झाडांची निगा राखतात. डॉ. पापळकर यांचे कार्य आणि जीवन म्हणजे समाजासाठी एक आदर्श ठरला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना मानद डी.लिट ने सन्मानित केले आहे.
डॉ. पापळकर यांनी ‘वज्जर मॉडेल’ हे दिव्यांग मुलांसाठी स्वयं सहाय्य आणि ओळख देणारे एक यशस्वी मॉडेल निर्माण केले आहे, जिथे मुले एकमेकांची देखभाल करतात आणि सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग चोखाळतात. दिव्यांग मुलांसाठी समर्पित कार्याद्वारे ते सामाजिक दायित्व आणि कटीबद्धतेचे प्रतिक आणि भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहेत.
Jaydevi PS/S.Pophale/N.Chitale/S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020115)
Visitor Counter : 243