शिक्षण मंत्रालय

सागरी संशोधन क्षेत्रातील भागीदारीला चालना देण्यासाठी आयआयटी गोवातर्फे भारत-फ्रान्स कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 30 APR 2024 5:52PM by PIB Mumbai

गोवा, 30 एप्रिल 2024

 

आयआयटी गोवातर्फे 17 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत गोव्यात ‘सागरी संशोधन आणि तंत्रज्ञान – भारत आणि फ्रान्स यांच्यासाठी सहयोगात्मक संशोधनाच्या दिशा आणि फलित’ या विषयावर भारत-फ्रान्स कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. भारताच्या नील अर्थव्यवस्थेसंदर्भातील योजनांमध्ये योगदान देऊ शकतील अशा उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.   अत्याधुनिक शास्त्रीय संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापित भारत-फ्रान्स केंद्र (सीईएफआयपीआरए) या दोन्ही देशांच्या संयुक्त संस्थेने या कार्यशाळेसाठी निधी दिला. भारत आणि फ्रान्सच्या सरकारांकडून निधी पुरस्कृत ही संयुक्त भारत-फ्रान्स संस्था आहे. या कार्यशाळेमध्ये आयआयटी गोवाच्या अध्यक्षतेखाली जीओएटी (गोवा अटलांटिक) भागीदारी बैठक झाली.   त्यामध्ये फ्रान्सच्या ब्रेस्त प्रांतातील  अनेक शैक्षणिक  तसेच संशोधन संस्था सहभागी झाल्या. ईकोल नवाले, युनिव्हर्सिटे ऑक्सिडेंटल दे ब्रेगाटने (युबीओ), निकोल नॅशनाले द इंजिनीयर्स दे ब्रेस्त  (ईएनआयबी), ईएनएसटीए ब्रेटाने, ब्रेस्त  टेक्नोपोल यांसारख्या विविध फ्रेंच संस्था तसेच Exail सारख्या कंपन्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.

या कार्यशाळेचे महत्त्व विषद करत, आयआयटी गोवाचे संचालक प्रा.बी.के.मिश्रा यांनी फ्रान्समधील सागरी संशोधन क्षेत्राचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या ब्रेस्त प्रांतातील  संस्थांशी सहयोगी संबंध वाढत असल्याबद्दल आनंद  व्यक्त केला.  केंद्र सरकारच्या नील अर्थव्यवस्थेच्या संकल्पनेला अनुरूप ठरतील असे गोव्याच्या शिक्षण, संशोधन आणि स्टार्ट अप परिसंस्थेला होणारे संभाव्य लाभ त्यांनी अधोरेखित केले.  गेल्या वर्षी फ्रान्समध्ये झालेल्या चर्चेदरम्यान प्रस्तावित  ‘सागरी विज्ञान  आणि तंत्रज्ञान’ क्षेत्रातील संयुक्त पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू  करण्यासंदर्भातील योजनांविषयी प्रा.मिश्रा यांनी उपस्थितांना अधिक माहिती दिली.

आयआयटी गोवा मधील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे प्रमुख प्रा. शरद सिन्हा यांनी फ्रान्समधील सागरी तंत्रज्ञान सप्ताह 2022 सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर संस्थेच्या सक्रिय सहभागाविषयी सांगितले.   CEFIPRA आणि भारतातील फ्रेंच दूतावास यांच्या साहाय्याने  फ्रेंच संस्थांसोबत सुरू असलेल्या प्रकल्पांवर त्यांनी प्रकाश टाकला. वैज्ञानिक आणि शैक्षणिक सहकार्याचे संलग्नक प्रा . फिलीप मॉरीन यांनी या कार्यशाळेदरम्यान फ्रान्समधील शिष्यवृत्ती आणि उच्च अभ्यासाच्या संधींवर चर्चा केली.

कार्यशाळेच्या फलितांचे कौतुक करताना, CEFIPRA चे संचालक प्रा. नितीन सेठ यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये भारत-फ्रेंच सहकार्याला चालना देण्याऱ्या केंद्राच्या भूमिकेचे कौतुक केले.  त्यांनी नील  अर्थव्यवस्थेशी संबंधित संयुक्त शैक्षणिक कार्यक्रमांवरील चर्चेचे कौतुक केले तसेच दोन्ही देशांमध्ये वैज्ञानिक आणि उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ अधिक सक्षम  करण्याच्या क्षमतेवर भर दिला.

इकोले नेवले येथील आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या संचालक कॅथरीन बेलिस यांनी आयआयटी गोवा आणि फ्रेंच नौदल  अकादमीसह इतर शैक्षणिक भागधारक यांच्यातील फलदायी बैठकीचे कौतुक केले.  

कार्यशाळेचा समारोप आयआयटी गोवाच्या नेतृत्वाखाली गोवा अटलांटिक भागीदारीच्या निर्मितीने झाला. या भागीदारीत फ्रान्सच्या ब्रेस्त  भागातील अनेक शैक्षणिक आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे.  सहभागींमध्ये Exail सारख्या कंपन्यांसह इकोले नेवले,  युनिव्हर्सिटे ऑक्सिडेंटल दे ब्रेगाटने  (UBO), आणि ब्रेस्त  टेक्नोपोल सारख्या उल्लेखनीय फ्रेंच संस्थांचा समावेश होता.

आयआयटी गोवा येथे आयोजित सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील भारत-फ्रान्स  कार्यशाळा, भारत-फ्रान्स  संबंध मजबूत करण्यात  महत्त्वपूर्ण दुवा ठरली.  तसेच जागतिक सागरी समुदायाच्या फायद्यासाठी वैज्ञानिक सहकार्याला पुढे नेण्याप्रति दोन्ही राष्ट्रांची वचनबद्धता यातून अधोरेखित झाली. 

 

* * *

PIB Panaji | S.Kakade/Sanjana/Shraddha/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 2019192) Visitor Counter : 126


Read this release in: English