शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनआयटी गोवा येथे नवोन्मेष, डिझाइन आणि उद्योजकता प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन

Posted On: 30 APR 2024 2:50PM by PIB Mumbai

गोवा, 30 एप्रिल 2024

 

एनआयटी अर्थात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, गोवा येथे काल, 29 एप्रिल 2024 रोजी, नवोन्मेष, डिझाईन आणि उद्योजकता (आयडीई) प्रशिक्षण शिबीराचे (टप्पा III) उद्घाटन करण्यात आले. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाचे संचालक प्रदीप ढगे, गोवा सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विवेक कामत, गोव्यातील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. जैस्वाल यांच्या उपस्थितीत या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन झाले.  मान्यवरांनी उद्घाटन समारंभात स्टार्ट-अप आणि नवउद्योजकीय कौशल्ये विकसित करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, डिझाइन आणि नवउद्योजकीय कौशल्य विकसित करणे हे या प्रशिक्षण शिबीराचे उद्दिष्ट आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालय, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) अर्थात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाद्वारे (MIC) देशभरात 9 ठिकाणी या  प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीतील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (AICTE) मुख्यालयाचे अध्यक्ष प्रा. टी.जी. सीताराम, यांनी  दूरदृश्य प्रणालीमार्फत या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले.

एनआयटी गोव्याच्या कायमस्वरूपी प्रांगणात आयोजित  या उपक्रमासाठी पुढाकार घेणारे गोव्यातील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे नोडल अधिकारी डॉ. ललत इंदू गिरी आणि  भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या नवोन्मेष विभागाचे संचालक प्रदीप ढगे यांनी  प्रतिभेचे संवर्धन  आणि नवउद्योजकतेला चालना देण्यासाठी संस्थेची कटिबद्धता  अधोरेखित केली.

2500 हून अधिक विद्यार्थी नवोन्मेषक आणि नवोन्मेष राजदूत यांचा सहभाग असलेला, हा उपक्रम भारतातील नवोन्मेष आणि उद्योजकतेची संस्कृती उत्प्रेरित करण्यासाठी सज्ज आहे.

29 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत नियोजित, नवोन्मेष, डिझाईन आणि नवउद्योजकता (आयडीई) प्रशिक्षण शिबीराचा तिसरा टप्पा भारतातील 9 ठिकाणी एकाच वेळी होत आहे.  यात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था गोवा देशातील प्रतिष्ठित आठ यजमान संस्थांच्या मदतीने नवोन्मेष आणि नवउद्योजकीय शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत  आहे. या आठ संस्थांमध्ये महाराजा अग्रसेन विद्यापीठ बद्दी, एमिटी विद्यापीठ रायपूर आणि बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात वक्ते आणि डिझाइन तज्ञ या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करत आहेत. यामुळे सहभागींना उत्पादन डिझाइन, एर्गोनॉमिक्स, डिझाइन विचारसरणी आणि पिचिंग कौशल्ये यांची आजच्या व्यवसायाच्या  गतिमान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची माहिती मिळेल.

नवोन्मेष, डिझाईन आणि नवउद्योजकता (IDE) प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या सहभागींना,  नवउद्योजकता शिक्षणाला पाठबळ  देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वाधवानी फाऊंडेशनच्या सहयोगाने  प्रत्यक्ष, अनुभवात्मक शिक्षणावर केंद्रित असलेला 5-दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येत आहे.  या कार्यक्रमात स्टार्टअप संस्थापकांच्या प्रेरक चर्चांचा समावेश असेल. या चर्चेत विशेषत्वाने स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) चे  माजी विद्यार्थी, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील विद्यार्थ्यांना नवउद्योजकतेच्या क्षेत्रात कारकीर्द सुरू करण्यासाठी प्रेरणा देतील.

संपूर्ण प्रशिक्षण शिबिरामध्ये, सहभागींना त्यांच्या नवकल्पना प्रदर्शित करण्याची, वास्तविक-जगातील अंतर्दृष्टीसाठी स्थानिक भेटी देण्याची आणि स्टार्टअप संस्थापक, इनक्यूबेटर, आयपी तज्ञ,  ज्ञान संस्था, विशेष गुंतवणूकदार, यांचा समावेश असलेल्या तज्ञ मंडळीसमोर आपल्या कल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी  मिळणार आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात एकूण 16 प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या प्रशिक्षण शिबिरात चार हजारहून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते.

 

* * *

PIB Panaji | S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 2019145) Visitor Counter : 92


Read this release in: English