गृह मंत्रालय

राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राम नाईक आणि दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त यांना अनुक्रमे सार्वजनिक कार्य आणि कला या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात पद्मभूषण पुरस्कार केले प्रदान


डॉ. मनोहर कृष्णा डोळे (मेडीसिन), डॉ. झहीर इशाक काझी (साहित्य आणि शिक्षण) तसेच कल्पना मोरपारिया (व्यापार आणि उद्योग) यांना देखील नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

Posted On: 22 APR 2024 7:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली/मुंबई, 22 एप्रिल 2024

 

सार्वजनिक कार्य, या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राम नाईक यांना आणि कला क्षेत्रातील योगदानासाठी दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त यांना आज नवी दिल्ली येथे नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींकडून पद्मभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींनी डॉ. मनोहर कृष्णा डोळे (मेडीसिन), डॉ. झहीर इशाक काझी (साहित्य आणि शिक्षण) तसेच कल्पना मोरपारिया (व्यापार आणि उद्योग) यांना देखील नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
महाराष्ट्रातील पुरस्कारविजेत्यांचे जीवन आणि कार्य यावर टाकलेला संक्षिप्त दृष्टीक्षेप पुढीलप्रमाणे आहे:

श्री राम नाईक (पद्मभूषण)

श्री राम नाईक हे एक प्रख्यात राजकारणी आहेत.

महाराष्ट्रातील सांगली येथे 16 एप्रिल 1934 रोजी जन्मलेल्या श्री. नाईक यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे शालेय शिक्षण घेतले, पुणे विद्यापीठातून त्यांनी बी. कॉम. केले आणि मुंबई विद्यापीठातून एल.एल.बीची  पदवी मिळवली. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आर.एस.एस.) कार्यकर्ते आहेत. त्यांनी आकर्षक मोबदला देणाऱ्या कारकिर्दीचा त्याग करून 1969 मध्ये भारतीय जनसंघाचे संघटन सचिव म्हणून पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी आपले संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित केले आहे.

श्री. नाईक हे मुंबईत सलग आठ निवडणुका जिंकणारे एकमेव व्यक्ती आहेत, जे बोरिवली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (1978-1985)आमदार म्हणून विजयी झाले आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा(1989-2004) खासदार म्हणून विजयी झाले. मतदारांसमोर वार्षिक कामगिरी अहवाल सादर करून श्री. नाईक यांनी उत्तरदायित्वाच्या लोकशाही सिद्धांताचे पालन केले आणि 2014 मध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल झाल्यानंतरही ही पद्धत त्यांनी कायम ठेवली. मुंबई शहराचे इंग्रजीमध्ये बॉम्बे आणि हिंदीमधील बंबई  हे नाव बदलून त्या ऐवजी मुंबई हे मूळ मराठी नाव करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात त्यांना यश मिळाले. उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैझाबादचे नाव अयोध्या असे बदलले. 1992 पासून संसदेत ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ गायनाची प्रथा सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या पुढाकाराने 24 जानेवारी हा दिवस उत्तर प्रदेश दिन म्हणून जाहीर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. MPLADS अर्थात खासदार निधी ही त्यांची संकल्पना असून त्यामुळे प्रत्येक खासदाराला आपापल्या मतदारसंघात लहान विकास प्रकल्प हाती घेणे शक्य झाले. स्तनपानाचा प्रसार आणि ‘बेबी फूड’च्या जाहिरातींवर बंदी घालणारे त्यांचे खाजगी सदस्याचे विधेयक सरकारने स्वीकृत केले आणि त्याचा कायदा तयार झाला.

श्री. नाईक हे रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते असून ते रेल्वे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) झाले. त्यांनी रेल्वे व्यतिरिक्त गृहराज्यमंत्रीपद, नियोजन आणि कार्यक्रम अंमलबजावणी तसेच संसदीय कामकाज राज्यमंत्रीपदही भूषवले आहे. सुमारे 80 लाख मुंबईकर प्रवाशांच्या कल्याणासाठी त्यांनी मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन(MRVC)ची स्थापना केली. मुंबईमध्ये जगातील पहिली महिला विशेष उपनगरी रेल्वेगाडी सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द भारतातील पेट्रोलियम क्षेत्राचे सुवर्णयुग म्हणून ओळखली जाते. त्यांनी देशात इंधनामध्ये इथेनॉल मिसळण्याची सुरुवात केली. त्यांच्या कार्यकाळात कारगील युद्ध आणि संसद हल्ल्यातील हुतात्म्यांच्या विधवांना/ अवलंबून असणाऱ्यांना 439 पेट्रोल पंप आणि एलपीजी वितरकपदांचे वितरण करण्यात आले.

श्री. नाईक यांनी मच्छिमार, कुष्ठरोग पीडित व्यक्ती आणि तारापूर अणुऊर्जा प्रकल्प 3 व 4 यांमुळे प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या समस्यांसाठी देखील आवाज उठवला आहे. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांनी त्यांनी मनोरी-गोराई बेटांना समुद्राखालून पाईपलाईन नेऊन पाणीपुरवठा केला आणि समुद्रात टॉवर उभारून अर्नाळा बेटावरील किल्ल्याला वीजपुरवठा केला. त्यामुळे मच्छिमार बांधव त्यांना प्रेमाने प्रकाशदाता म्हणून हाक मारतात. त्यांनी मराठी दैनिक सकाळमध्ये त्यांचे आत्मचरित्र देखील लिहिले. त्यांचे एकत्रिकरण करण्यात आले आणि ‘चरैवेती चरैवेती!!’ या नावाने पुस्तक प्रकाशित करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारचा लक्ष्मीबाई टिळक आत्मचरित्र पुरस्कार, उत्तर प्रदेशातील हिंदी-ऊर्दू साहित्य पुरस्कार समितीचा साहित्य शिरोमणी पुरस्कार यांसारख्या अनेक साहित्य पुरस्कारांचे श्री. नाईक हे मानकरी आहेत. कांची कामकोटी पीठमच्या जगद्गुरू शंकराचार्यांचा राष्ट्रीय महत्त्व पुरस्कार, सामाजिक परिवर्तनासाठी  ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ हा महाराष्ट्र पुरस्कार, जीवन साधना, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांचे देखील ते मानकरी आहेत.

 

श्री. दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त (पद्मभूषण)

श्री. दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ राजदत्त हे अशा प्रणेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्या कार्यामुळे मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. “चित्रपट हे केवळ मनोरंजनासाठी नाहीत तर सामाजिक संदेश देण्यासाठी आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणूनही त्यांचा वापर होऊ शकतो.” हा विचार मनात ठेवून त्यांनी मराठी चित्रपट उद्योगात एखाद्या योग्याप्रमाणे 60 वर्षांहून अधिक काळ काम केले आहे.

21 जानेवारी 1932 मध्ये अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे जन्म झालेल्या राजदत्त यांनी वर्धा येथील जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स मधून बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण घेतले. बालपणापासूनच  ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(आरएसएस) स्वयंसेवक राहिले आहेत.

श्री राजदत्त यांनी आचार्य विनोबा भावे( पवनार आश्रम) यांच्या कार्यात सहभाग घेतला. ते प्राध्यापक ठाकूरदास बंग यांच्यासोबत सेवाग्रामजवळच्या गोपुरी कुष्ठरोग केंद्र आणि बाबा आमटे यांच्या आनंदवन आश्रमात जाऊन कुष्ठरोग्यांची सेवा करत असत. गोवा मुक्ती संग्राम आणि दादरा नगर हवेली चळवळीत सहभागी झालेले ते एक स्वातंत्र्यसैनिक आहेत. त्यांनी अडीच महिन्यांचा तुरुंगवास भोगला. पदवीधर झाल्यानंतर दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी पत्रकार म्हणून आणि दैनिक भारत पुणे मध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम केले. 

मद्रास (चेन्नई) येथे ‘चांदोबा’ या बाल मासिकासाठीही त्यांनी काम केले. येथे त्यांनी त्यांचे गुरू चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे यांची भेट घेतली आणि 7 वर्षे त्यांच्यासोबत काम केले. गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी त्यांच्या गुरूच्या नावावरून 'राज' आणि स्वतःच्या नावावरून 'दत्त' असे राजदत्त या टोपणनावाने 1967 पासून स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शित करण्यास सुरुवात केली. त्यांनी 30 हून अधिक चित्रपट (मराठी आणि हिंदी) दिग्दर्शित केले. मधुचंद्र, देवकी नंदन गोपाला, शापित, पुढचं पाऊल, अष्टविनायक, माफीचा साक्षीदार, अंजाम, दूरी, सर्जा आदि त्यापैकी काही चित्रपट आहेत.

राजदत्त यांनी गोट्या, विनायक दामोदर सावरकर, राजगड, दुर्गा भागवत, डॉ. पंजाबराव देशमुख आणि इतर अनेक मालिका, टेलिफिल्म्स, माहितीपट दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी अनुदान समितीचे ज्युरी सदस्य म्हणून काम केले असून 'जागतिक मराठी परिषदे'साठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 'आनंद वनभुवनी' या दिमाखदार लाईट अँड साउंड स्टेज शोचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘आरएसएस’ची सांस्कृतिक शाखा असलेल्या संस्कार भारतीचे ते 10 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. वयाच्या 92व्या वर्षीही ते आपली आवड जोपासत असून सिनेसृष्टीत त्यांनी ‘अभिनयाची’ दुसरी इनिंग सुरू केली आहे. 

श्री राजदत्त यांना मराठीतील सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मसाठी तीन 'राष्ट्रीय पुरस्कार' मिळाले- शापित 1982; पुढचं पाऊल 1985 आणि सर्जा 1987, या तीन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांसह त्यांना 13 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, शापितसाठी फिल्मफेअर पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, झी गौरव जीवनगौरव पुरस्कार, नवरत्न पुरस्कार, राजकमल कला मंदिर व्ही. शांताराम पुरस्कार, राजा परांजपे प्रतिष्ठान पुरस्कार, ग.दि.माडगूळकर आणि इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रशियन कौन्सिलने शापित साठी राज दत्त यांचा सत्कार केला. ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क महोत्सवात त्यांचे तीन चित्रपट निवडले गेले आणि ते दोनदा 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या' ज्युरी सदस्यांपैकी एक होते.

 

डॉ. मनोहर कृष्ण डोळे (पद्मश्री)

डॉ. मनोहर कृष्ण डोळे हे एक अनुकरणीय व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी ग्रामीण भारतातील वंचित आणि आदिवासी समुदायांना मोफत नेत्रसेवा देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे.

22 नोव्हेंबर 1928 रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डोळे यांनी 1953 मध्ये पुणे विद्यापीठातून आयुर्वेदात पदवी संपादन केली. मूलभूत आरोग्य सेवा पायाभूत सुविधा उभारून प्रदेशातील आरोग्य सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी त्यांनी 31व्या वर्षी शहरापासून 80 किमी दूर डोंगराळ आणि दुर्गम जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या गावात जाण्याचा निर्णय घेतला. स्वत: नेत्र शल्यचिकित्सक नसले तरी, मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व ही या प्रदेशाची मुख्य समस्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तेथे 1982 मध्ये मोहन ठुसे नेत्र रुग्णालय आणि संशोधन संस्था स्थापन केली. रुग्णालयाने ग्रामीण महाराष्ट्रातील कमी वस्तीच्या दुर्गम भागात  मोफत मासिक नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली. याद्वारे, त्यांनी रुग्ण ओळखून फिरत्या नेत्र देखभाल व्हॅनद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया, लेन्स बसवणे, शस्त्रक्रियापूर्व आणि पश्चात तपासणी आणि चष्म्यासह सर्व वैद्यकीय उपचार तसेच त्यांना भोजन, निवास आणि समुपदेशन प्रदान करून दृष्टिदोष दूर झालेल्या रुग्णांना त्यांच्या घरी परत सोडण्याची विनामूल्य व्यवस्था केली. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागात दारोदारी जाऊन 25,000 हून अधिक मोफत नेत्र तपासणी शिबीरे भरवली आहेत. या रुग्णालयाने ग्रामीण महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक रुग्णांची तपासणी केली आहे आणि आदिवासी जाती-जमातीतील 1,75,000 हून अधिक आदिवासी व्यक्तीवर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील दुर्गम भागात राहणाऱ्यांच्या  पूर्णपणे मोफत नेत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत.

या क्षेत्रातील डॉ. डोळे यांच्या प्रयत्नांची दखल घेत, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशन यांनी संशोधन क्षमता विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावर 6,000 संस्थांपैकी 40 संस्थांपैकी एक म्हणून या प्रकल्पाची निवड केली. याशिवाय जागतिक बँकेने 14 लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. ग्रामीण भागातील पहिली रक्तपेढी आणि नेत्रपेढी त्यांनी स्थापन केली. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया न करणाऱ्या प्रदेशातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांतील रूग्णांवर हे रूग्णालय उपचार करते. महिला रूग्णांवर उपचार करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे, कारण महिलांमध्ये मोतीबिंदूचे प्रमाण अधिक आहे. केंद्र सरकारच्या 'नॅशनल प्रोग्रॅम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस' (एनपीसीबी) अर्थात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 1976 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. वर्ष 2000 पासून, याद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रशिक्षणाचा दोन वर्षांचा यशस्वी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) कार्यक्रम पूर्ण केलेले 250 अधिछात्र (फेलो) आहेत.

डॉ. डोळे यांचे रुग्णालय हे नेत्र प्रत्यारोपणासाठी एक अग्रणी संस्था असून ग्रामीण भागातील पहिली रक्तपेढी आणि नेत्रपेढी येथे आहे. ही नेत्रपेढी देशभरातील 100 नेत्रपेढीच्या साखळीचा एक भाग असून ती नागपूरच्या गुरुजी नेत्रपेढी द्वारे चालवली जाते. डॉ. डोळे यांनी, संबंधित क्षेत्रीय संशोधनानंतर आणि सुनियोजित पद्धतीने, नेत्र तपासणी शिबिरे (अगदी सुदूर आणि दुर्गम भागातही) आयोजित केली. याचा सर्वसामान्य भारतीय नागरिकांना मोठा फायदा झाला.

डॉ. डोळे यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात राष्ट्रीय टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी 2014 साली डी लिट पदवी, 2016 साली शिवनेरी भूषण पुरस्कार,
2008 साली सर्वाधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र राज्यसरकारतर्फे सत्कार,
2006 चा सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचा आणि पुणे महानगरपालिकेतर्फे दिला जाणारा नागरी पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे. 

 

डॉ. झहीर इशाक काझी (पद्मश्री) 

डॉ. झहीर इशाक काझी हे 1874 मध्ये स्थापन झालेल्या देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक समूह अंजुमन-इ-इस्लामचे अध्यक्ष आहेत. ते शिक्षण, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रसिद्ध आहेत.

26 जानेवारी 1954 रोजी जन्मलेल्या डॉ. काझी यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून (मुंबई विद्यापीठ) एमबीबीएस पदवी संपादन केली आणि नंतर मुंबईतील टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयातून रेडिओलॉजी आणि डीएमआरडीमध्ये पदव्युत्तर एमडी पूर्ण केले. त्यांना नंतर एफ.एम.आर.आय - अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हानिया विद्यापीठ आणि एम.ए.आय.यु.एम - प्रिसेप्टर अल्ट्रासाऊंड - अमेरिकेच्या फिलाडेल्फिया येथील थॉमस जेफरसन विद्यापीठ यांच्या फेलोशिप कार्यक्रमाद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. 

ते बॉम्बे रुग्णालय आणि हिंदुजा रुग्णालयासह मुंबईच्या प्रतिष्ठित रुग्णालयांशी जोडलेले आहेत. त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत सौदी अरेबियातील मदिना येथील किंग फहद रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणूनही काम केले आहे. 

डॉ. काझी यांचा अंजुमन-ए-इस्लामसोबतचा 30 वर्षांचा परिवर्तन घडवणारा प्रवास जनरल कौन्सिलपासून सुरू झाला, जिथे त्यांनी तिब्बिया वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अध्यक्ष म्हणून तसेच साडेतीन वर्षे मानद सरचिटणीस या महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अंजुमन-ए-इस्लामने विस्तार, बळकटीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्कृष्टता याद्वारे विविध स्वरूपात मोठा विकास साधला आहे. त्यांच्या कार्यकाळात नवीन संस्था सुरु झाल्या. विद्यमान संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली. सर्व संस्थांना प्राधिकरणाकडून मान्यता मिळण्यासाठी प्रेरित करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून, महिलांसाठीच्या दोन अनाथाश्रमांचे, एक मुंबईतील अंधेरी परिसरातील वर्सोवा आणि दुसरे पुण्यातील बंड गार्डन येथील अनाथाश्रमांचे बाल न्याय कायद्याच्या अनुषंगाने महिलांसाठी ‘ए’ श्रेणीच्या आश्रमात रूपांतर केले. 85% पेक्षा जास्त महिलांची संस्था प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात त्यांनी घेतलेला पुढाकार हा खऱ्या अर्थाने महिलांच्या सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. गेल्या 15 वर्षांत अध्यक्ष म्हणून त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने संस्थेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड म्हणून ओळख मिळवून दिली. त्यांनी आर्थिक स्थैर्याकडे लक्ष दिले, प्रक्रिया  सुव्यवस्थित केल्या, अमेरिका आणि ब्रिटन मध्ये (ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ अंजुमन - ओएफए) परदेशी संस्थांची स्थापना केली आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), अमेरिका आणि वेस्टमिन्स्टर विद्यापीठ, ब्रिटन यांसारख्या प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठांबरोबर काम केले.

डॉ. काझी यांची कायम उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे, त्यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी तसेच भारत सरकारसाठी विविध समित्यांवर प्रतिष्ठित पदे भूषवली आहेत. त्यांनी अल्पसंख्याक शिक्षणाच्या राष्ट्रीय देखरेख समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अल्पसंख्याक योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणाऱ्या उपसमितीचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक शिक्षण विकास समितीचे सदस्य म्हणूनही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मुंबईतील शूरपार्का एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष, ठाण्यातील आयडियल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष आणि गोव्यातील गोवा विद्या प्रसारक मंडळाचे एक प्रतिष्ठित सदस्य म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात  महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य म्हणून त्यांची व्यवस्थापन श्रेणीत निवड करण्यात आली.

डॉ. काझी यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय शिक्षण प्रणालीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने "जीवन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानित केले. 2015 मध्ये ‘जायंट्स इंटरनॅशनल’ने शिक्षण क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने त्यांना 2020 मध्ये ‘सर सय्यद उत्कृष्टता  राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित केले.

 

कल्पना मोरपारिया (पद्मश्री)

कल्पना मोरपारिया या  भारताच्या बँकिंग क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असून त्यांची चार दशकांहून अधिक काळ अशी उल्लेखनीय  कारकीर्द आहे. या काळात त्यांनी वित्तीय सेवांमध्ये असाधारण नेतृत्व आणि कौशल्य दाखवले. मुंबई विद्यापीठातून कायदा आणि विज्ञानमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या कल्पना मोरपारिया यांनी व्यावसायिक क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

30 मे 1949 रोजी जन्मलेल्या मोरपारिया यांचा जेपी मॉर्गन या वित्त विषयक संस्थेच्या भारताच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकाळ, कॉर्पोरेट सेवा केंद्रे आणि नंतर आसियान  देशांच्या कामांची जबाबदारी त्यांचे  धोरणात्मक कौशल्य आणि ग्राहक सेवेप्रति वचनबद्धतेचे उदाहरण आहे. विविध व्यवसाय विभाग एकत्रित करण्यात, नेतृत्व विकासाला चालना देण्यात आणि अंतर्गत हितधारकांमध्ये समन्वय प्रस्थापित करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

जेपी मॉर्गन मध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यापूर्वी मोरपारिया यांची आयसीआयसीआय बँकेत उल्लेखनीय कारकीर्द राहिली आहे, जिथे त्या लीगल असोसिएट पदावरून संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत पोहचल्या, जे भारताच्या वित्तीय परिदृश्यात त्यांचे  महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करते. ट्रेझरी स्थापन करण्यापासून ते नियामक संबंध, गुंतवणूकदार संबंध, अडचणीत सापडलेल्या मालमत्तेसाठी (दाभोळ पॉवर कंपनीसह) उपाययोजना आणि आयसीआयसीआय समूहाच्या मुख्य प्रवक्त्या म्हणून काम करण्यापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने पार पाडल्या. विलीनीकरणातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे आयसीआयसीआय बँक त्यावेळची भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक बनली आणि एक दूरदर्शी नेता म्हणून त्यांची ओळख अधिक दृढ झाली.

कार्यकारी भूमिकांव्यतिरिक्त, मोरपारिया यांनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, एचएसबीसी होल्डिंग्स पीएलसी, आणि फिलिप मॉरिस इंटरनॅशनल इंक यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून अमूल्य योगदान दिले आहे. शिक्षण, कौशल्य विकास आणि लेखा परीक्षण गुणवत्ता वाढीवर केंद्रित प्रशासकीय मंडळे आणि परिषदांमध्ये कार्यरत असतानाच मानवतावादी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. या काळात, कंपनी कायदा, कॉर्पोरेट प्रशासन आणि मर्यादित दायित्व भागीदारी या क्षेत्रांमध्ये भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक समित्यांच्या त्या प्रमुख सदस्य होत्या. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांनी स्थापन केलेल्या लेखापरीक्षण सल्लागार मंडळाच्याही त्या सदस्य होत्या.

कल्पना यांच्या उत्कृष्ट कामगिरीला व्यापक मान्यता मिळाली आहे. 2006 मध्ये फोर्ब्स मॅगझिनने '100 सर्वात शक्तिशाली महिला' पैकी एक आणि 2008 मध्ये फॉर्च्यून मॅगझिनने आंतरराष्ट्रीय व्यापारातील 50 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांना गौरवले होते. बिझनेस टुडे द्वारे सात वर्षे त्या  भारतीय व्यवसायातील 25 सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक होत्या. 2013 मध्ये त्यांना  12व्या केल्विनेटर GR8 महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; 2013 मध्ये व्यवसायातील नेतृत्वासाठी लॉरिअल पॅरिस फेमिना महिला पुरस्कार; 2011 मध्ये युवा अनस्टॉपेबल यूथ आयकॉन पुरस्कार; फिक्की फ्लो द्वारा वुमन फिलांथ्रोपिस्ट पुरस्कार 2010-2011; ‘एशिया सेंटर फॉर कॉर्पोरेट गव्हर्नन्स अँड सस्टेनेबिलिटी’ द्वारे सर्वोत्कृष्ट महिला संचालक पुरस्कार 2013 पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन फॉर मॅनेजमेंट वुमन अचिव्हर ऑफ द इयर 2012-2013’ आणि ‘असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल वेल्थ मॅनेजमेंट ऑफ इंडिया’ द्वारे 2019 साठी वित्त क्षेत्रातील भारताच्या अव्वल 100 महिला म्हणून देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 

* * *

JPS/S.Nilkanth/Shailesh/Vasanti/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018493) Visitor Counter : 57


Read this release in: English