दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

गोवा येथील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या 24 व्या स्थापना दिनानिमित्त आज महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल यांनी वेब लिंकद्वारे अंटार्क्टिका मधील भारती स्टेशन येथे भारती शाखा टपाल कार्यालयाचे केले उद्‌घाटन

Posted On: 05 APR 2024 10:06PM by PIB Mumbai

मुंबई, 5 एप्रिल 2024

दुर्गम स्थानाला उर्वरित जगाशी जोडण्यासाठी महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के.शर्मा, यांनी आज वेब लिंकद्वारे अंटार्क्टिका मधील भारती स्टेशन येथे भारती शाखा टपाल कार्यालयाचे उद्‌घाटन केले. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राच्या 24 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून या अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारती स्टेशनवरील पोस्टकार्डचेही प्रकाशन करण्यात आले.

उद्‌घाटनपर भाषणात के.के. शर्मा यांनी या महत्वपूर्ण टप्प्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करताना भारती शाखा टपाल कार्यालय हे अंटार्क्टिकामध्ये स्थापन होणारे तिसरे टपाल कार्यालय असल्याचे नमूद केले. पहिले टपाल कार्यालय 1984 मध्ये दक्षिण गंगोत्री येथे स्थापन करण्यात आले, त्यानंतर दुसरे टपाल कार्यालय 1990 मध्ये मैत्री स्टेशनवर स्थापन करण्यात आले. 40 वर्षांनंतर भारती शाखा टपाल कार्यालय सुरू केल्याने जगभरातील अगदी दुर्गम भागातही सेवा देण्याची टपाल विभागाची बांधिलकी अधोरेखित होते. हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन शक्य करण्यासाठी सर्व सहभागींच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आणि प्रियजनांशी पत्रांच्या देवाणघेवाणीद्वारे अर्थपूर्ण संवाद सुलभ करण्यासाठी भारती शाखा टपाल कार्यालयात तैनात असलेल्या पोस्टमास्टरवर विश्वास व्यक्त केला.

वेब लिंक द्वारे भारती शाखा टपाल कार्यालयाचे उदघाटन हे भौगोलिक अडथळे दूर करून अंटार्क्टिकामधील दळणवळण आणि कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी, वैज्ञानिक शोध मोहिमेला चालना देण्यात महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते.

पोस्टमास्टर जनरल, मेल आणि बीडी अमिताभ सिंह, महाराष्ट्र मंडळाचे संचालक (मुख्यालय) अभिजीत बनसोडे, गोव्याच्या एनसीपीओआर चे संचालक डॉ. थमन मेलोथ, समूह संचालक (अंटार्क्टिक ऑपरेशन) डॉ. शैलेंद्र सैनी, समूह संचालक डॉ. राहुल मोहन, गोवा विभागाच्या टपाल सेवेचे संचालक आर. पी. पाटील, महाराष्ट्र मंडळाच्या व्यवसाय विकास विभागाचे सहाय्यक पोस्टमास्तर जनरल डॉ. सुधीर जाखरे, गोवा विभागाच्या टपाल कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक एस. व्ही. एल. एन. राव, महाराष्ट्र मंडळाच्या टपाल सेवेचे (पीएसआर) सहाय्यक संचालक यादगिरी जी. न्यालपेल्ली, आणि मैत्री स्टेशन आणि भारती स्टेशनचे टीम लीडर या कार्यक्रमादरम्यान दूरस्थ माध्यमातून उपस्थित होते.

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017296) Visitor Counter : 88


Read this release in: English